Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 6 March, 2010

आशिष शिरोडकरांसह पाच पोलिस निलंबित

ड्रग माफियांशी साटेलोटे भोवले; अटक होण्याचीही शक्यता
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): अमली पदार्थ विरोधी पथकात काही महिन्यांपूर्वी सेवा बजावणारे पोलिस निरीक्षक, हवालदार व अन्य तीन पोलिस शिपाई ड्रग माफियांशी साटेलोटे ठेवून ड्रग व्यवसायात गुंतले असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. निरीक्षक आशिष शिरोडकर, पोलिस हवालदार हुसेन शेख, पोलिस शिपाई साईश पोकळे, संजय परब व संदीप परब ऊर्फ (कामीण) यांना निलंबित करून या प्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला असल्याचे कामत यांनी सांगितले. यावेळी गृहमंत्री रवी नाईक, पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी व अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधीक्षक वेनू बन्सल उपस्थित होते.
अटाला या ड्रग माफियाची व्हिडिओ क्लिप इंटरनेटवर झळकल्याने वरील पोलिस संशयाच्या घेऱ्यात आले होते. त्याचप्रमाणे गेल्या महिन्यात अटक करण्यात आलेला इस्रायली ड्रग माफिया "दुदू' याच्याशीही या पोलिसांचे साटेलोटे होते व सदर पोलिस त्याला संरक्षण पुरवण्यासाठी त्याच्याकडून लाखो रुपयांची लाच घेत होते, अशी खळबळजनक माहिती तपासात उघडकीस आली होती. अटाला याने तर, सदर अधिकारी जप्त करून न्यायालयाच्या कोठडीत ठेवण्यात येत असलेलाच अमली पदार्थ आपल्याला आणून विकत असल्याचा धक्कादायक आरोप केला होता. हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप सिद्ध झाल्यास या पोलिस अधिकाऱ्यांना अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत अटक होण्याचीही शक्यता नाकारता येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
"या पोलिसांवर आरोप झाल्यानंतर त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करण्यात आले आहेत. त्यात सदर पोलिस ड्रग माफियांशी संबंध ठेवून होते, असे प्रथमदर्शनी सिद्ध होत असल्याने त्यांना निलंबित करण्यात येत आहे' असे यावेळी श्री. कामत यांनी सांगितले. "कोणत्याही परिस्थितीत ड्रग माफियांना गोव्यात थारा न देण्याचा निर्धार गोवा पोलिसांनी केला आहे. त्यामुळे किनारी भागांवर करडी नजर ठेवली जाणार आहे. कायद्याने घालून दिलेल्या वेळेनंतरही शॅक किंवा रेस्टॉरंट सुरू ठेवणाऱ्यांवरही कडक कारवाई केली जाईल,' असे पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले. पोलिसांनी ड्रग माफियांचा खातमा करण्याचा विडाच उचलला असल्याने ड्रग व्यवसायाचे अड्डे असलेल्या शॅक्स आणि अन्य ठिकाणी अचानक धाड घालून तपासणी केली जाणार आहे. शॅक्समधूनही अमली पदार्थाची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असल्याचे श्री. बस्सी म्हणाले.
यावर्षी २० फेब्रुवारी २०१० पर्यंत अमली पदार्थ विरोधी पथकाने २१ गुन्हे नोंद केले असून सुमारे १ कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला आहे. ही मोहीम अशीच सुरू ठेवली जाणार असल्याचेही यावेळी श्री. बस्सी म्हणाले. त्याचप्रमाणे, जेरबंद असलेल्या "दुदू' याला "व्हीआयपी ट्रीटमेंट' देण्यात येत असल्याचे वृत्त सपशेल खोटे असून त्याला अशी कोणतीही सुविधा देण्यात येत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
मध्यवर्ती नियंत्रण कक्ष लवकरच स्थापन होणार
राज्य सरकारने केलेल्या मागणीनुसार पणजी शहरात मध्यवर्ती पोलिस नियंत्रण कक्ष स्थापन करण्याची परवानगी मिळाली असून त्यासाठी केंद्र सरकारकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले. नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या राज्यांच्या अंतर्गत सुरक्षा बैठकीच्यावेळी श्री. कामत यांनी मध्यवर्ती नियंत्रण कक्षाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यासाठी केंद्राकडून पाच कोटी रुपयांचा निधीही मागितला होता. तो निधी मंजूर झाल्याचे पत्र केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांच्याकडून आल्याची माहिती श्री. कामत यांनी यावेळी दिली. या नियंत्रण कक्षासाठी ६० वाहने घेतली जाणार असून शहरांत आणि ग्रामीण भागांत गस्त घालण्यासाठी त्यांचा वापर केला जाणार आहे.
-----------------------------------------------------------------
दोघा पत्रकारांची नावेही लवकरच उजेडात
२००५ ते २००७ या काळात दोन पत्रकार ड्रग माफियांशी संबंध ठेवून होते, अशी माहिती "दुदू' याच्या चौकशीत उघड झाली असून याबद्दल पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांना विचारले असता योग्य वेळी आम्ही ती नावे घोषित करू, असे ते म्हणाले.
-----------------------------------------------------------------
'कोकेन - युरिया' प्रकरणही भोवणार
कोकेन म्हणून पकडण्यात आलेला अमली पदार्थ प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत "युरिया' खत असल्याचे सिद्ध झाल्यानेही निरीक्षक आशिष शिरोडकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाच्या हाती याविषयी धक्कादायक माहिती लागलेली असून ती येत्या काही दिवसांत उघड होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

किमान २७५ द्या, अन्यथा 'गोवा बंद'

गोवा कामगार परिषदेचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा
कामगारांच्या जेलभरो आंदोलनामुळे पणजीत चक्काजाम

- महागाईवर नियंत्रण मिळवा
- कंत्राटी पद्धत तात्काळ रद्द करा
- पेट्रोल व डिझेलवाढ रद्द करा
- किमान २७५ वेतन त्वरित लागू करा

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): गोव्याचे कामगारमंत्री ज्योकीम आलेमाव हे स्वतःच कामगार कायद्याचे उल्लंघन करीत आहेत, त्यामुळे या पदावर राहण्याचा त्यांना कोणताच अधिकार राहत नाही. सर्वसामान्य कामगारांच्या जगण्याशी थेट संबंधित असलेला किमान वेतनाचा विषय केवळ कामगारमंत्र्यांनी भांडवलदारांसमोर लाळघोटेपणा चालवल्यामुळेच रखडला आहे. येत्या ११ मार्च रोजी किमान वेतन समितीची बैठक आहे. या बैठकीत कामगार संघटनांनी मागणी केलेल्या २७५ रुपये प्रतिदिन किमान वेतन निर्णयावर शिक्कामोर्तब झाले नाही, तर "गोवा बंद'ची हाक देणार, असा इशारा गोवा कामगार परिषदेतर्फे देण्यात आला.
केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणांचा जाहीर निषेध करण्यासाठी आज राज्यभरातील सर्व कामगार संघटनांतर्फे गोवा कामगार परिषदेच्या झेंड्याखाली व्यापक सत्याग्रह व जेलभरो आंदोलन छेडण्यात आले. राजधानीत कदंब बसस्थानकासमोरील क्रांती चौकात हजारोंच्या संख्येने ठाण मांडून बसलेल्या कामगारांनी याठिकाणी झालेल्या जाहीर सभेतून केंद्र व राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या सभेनंतर कामगारांनी काढलेल्या मोर्चामुळे मांडवीच्या दोन्ही पुलांवरील वाहतुकीची कोंडी झाल्याने चक्काजाम होण्याचा प्रकारही घडला. या मोर्चात सहभागी झालेल्या हजारो कामगारांनी जेलभरो आंदोलनात भाग घेऊन स्वतःला अटक करवून घेतली.
क्रांती चौकात आज आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत विविध कामगार संघटनांच्या नेत्यांनी कामगारांच्या पिळवणुकीबाबत व केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणांबाबत जाहीरपणे आग ओकली. "आयटक' चे ज्येष्ठ नेते राजू मंगेशकर यांनी कामगारमंत्री ज्योकीम आलेमाव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. सध्या राज्यात १०३ रुपये प्रतिदिन किमान वेतन देण्यात येते. कामगारमंत्री ज्योकीम आलेमाव यांच्या घरातील कुत्र्याला लागणाऱ्या दिवसाच्या मांसासाठी तरी हे १०३ रुपये पुरतील काय, असा खडा सवालच त्यांनी यावेळी केला. कामगारांनी गाळलेल्या घामावर केवळ स्वतःची तुंबडी भरणाऱ्या उद्योजकांची कामगारांना २७५ रुपये प्रतिदिन वेतन देण्याची ऐपत नसेल तर त्यांनी खुशाल आपल्या उद्योगांना टाळे ठोकावे, असे सडेतोड आव्हानही त्यांनी दिले. कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी आपल्या आक्रमक भाषणात कामगारांच्या सतावणुकीबाबत चिंता व्यक्त केली. देशात असंघटित कामगारांची संख्या वाढत आहे व कंत्राटी पद्धतीच्या नावाखाली खुद्द सरकारही कामगारांचे शोषण करीत आहे, असे ते म्हणाले. महागाईचा उच्चांक वाढत असताना कामगारांच्या हातात पडणारा तुटपुंजा पगार कस्पटासमान भासतो आहे. ही गंभीर परिस्थिती पाहता कामगारांना किमान २७५ रुपये प्रतिदिन वेतन मिळायलाच हवे, अन्यथा सर्व उद्योग व आस्थापने बंद पाडली जातील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. किमान वेतन निश्चित करण्याबाबत मालकवर्ग अरेरावीवर उतरला आहे व त्यांचीच तळी उचलून धरणारे कामगारमंत्रीही कामगारांना धमक्या देत असल्याची टीका त्यांनी केली.
पुतू गांवकर यांनीही किमान वेतनाबाबत सर्व संघटना ठाम असल्याचा पुनरुच्चार केला. सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे व या सरकारचे सोंग उघडे पाडण्यासाठी कामगारांनी आपली एकजूट दाखवायला हवी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. युवा कामगार नेते ऍड. ह्रदयनाथ शिरोडकर यांनी कामगारांच्या हक्कांसाठी प्रसंगी विधानसभेवर मोर्चा न्यावा लागेल, असा इशारा दिला. राज्यात ७० टक्के शेतकरीवर्ग शेतीव्यवसायात असताना त्यांच्यासाठी धोरण निश्चित करण्याचा विचार सरकारच्या मनात येत नाही; मात्र केवळ काही ठरावीक खाण मालकांचे हित जपण्यासाठी मुख्यमंत्री कामत खाण धोरण जाहीर करणार आहेत, असा टोलाही त्यांनी हाणला. या अन्यायाविरुद्ध सर्व लोकांनी आपापसातील सर्व मतभेद विसरून केवळ कामगार या नात्याने एकत्रित येण्याचा निर्णय घेतला तरच सर्व राजकीय नेत्यांना सुतासारखे सरळ करणे सहज शक्य आहे, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी गोविंद भोसले, सुभाष नाईक जॉर्ज, ऍड. कुबल आदींची भाषणे झाली. सुरुवातीला गोवा कामगार परिषदेचे निमंत्रक ऍड. सुहास नाईक यांनी प्रास्ताविक केले व त्यांनीच आभारही व्यक्त केले. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. उपअधीक्षक देऊ बाणावलीकर, निरीक्षक संदेश चोडणकर आदी मोर्चेकऱ्यांवर नजर ठेवून होते. जेलभरो आंदोलन होणार असल्याची चाहूल पोलिसांना लागल्याने पूर्वीच कदंब बसगाड्यांची व्यवस्था करून ठेवण्यात आली होती. सर्व कामगारांना पोलिस मुख्यालयात नेल्यानंतर मग सोडण्यात आले.
----------------------------------------------------------------
मांडवी पूल व कदंब बसस्थानकाच्या परिसरात यापुढे आंदोलनांवर निर्बंध
राजधानीत आंदोलनासाठी मांडवी पूल व कदंब बसस्थानक परिसराचा वापर होत असल्याने त्याचा मोठा फटका सर्वसामान्य जनतेला होतो. वाहतूक कोंडीमुळे सगळ्यांची गैरसोय होते व आंदोलनकर्ते आक्रमक झाल्यास त्यांना पांगवणेही कठीण होऊन बसते. त्यामुळे या जागा यापुढे आंदोलनांसाठी वापरण्यास निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिली. त्यासंबंधी आज गृहमंत्री रवी नाईक यांच्याशी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

दोन्ही वैमानिकांना साश्रू नयनांनी निरोप

नौदलातर्फे मानवंदना
वास्को, दि. ५ (प्रतिनिधी): तीन दिवसांपूर्वी हैद्राबाद येथे हवाई कसरती करत असताना गोव्याच्या नौदल तळावरील विमान कोसळून त्यात मृत्युमुखी पडलेल्या सुरेश मौर्य व राहुल नायर या दोन्ही वैमानिकांच्या पार्थिवांवर आज सडा येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. वास्कोतील आय. एन. एस. गोमंतक ह्या नौदलाच्या तळावरील परेड मैदानावर अंत्यसंस्कारांपूर्वी त्यांना शेवटची मानवंदना तसेच श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गोवा नौदलाचे ध्वजाधिकारी सुधीर पिल्ले, नौदलाचे शेकडो अधिकारी, कर्मचारी व उपस्थित होते.
आज सकाळी आय. एन. एस. गोमंन्तक येथून १०.४५ च्या सुमारास दोन्ही वैमानिकांची अंत्ययात्रा निघणार असल्याने सकाळी ९च्या सुमारास शेकडो नौदलीय अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी तसेच अन्य सशस्त्र दलाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना मानवंदना देण्यासाठी उपस्थिती लावली होती.
वैमानिक सुरेश मौर्य यांची पत्नी अर्चना, आई सुभद्रादेवी, वडील (निवृत्त नौदल अधिकारी) रामनरेश तसेच त्यांचे अन्य कुटुंबीय आणि वैमानिक राहुल नायर यांची पत्नी लक्ष्मी, तीन वर्षाचा मुलगा रोहन, आई सरस्वती, वडील (निवृत्त नौदलीय अधिकारी) राधाकृष्ण व त्यांचे कुटुंबीय यांचीही यावेळी उपस्थिती होती.
आय. एन. एस. जीवंती इस्पितळात ठेवण्यात आलेले दोन्ही वैमानिकांचे मृतदेह परेड मैदानावर आणण्यात आल्यानंतर प्रथम गोवा नौदलाचे ध्वजाधिकारी सुधीर पिल्ले यांनी या दोन्ही वीरांना श्रद्धांजली अर्पण करून नंतर त्यांना सलामी दिली. यावेळी गोवा तटरक्षक दलाचे प्रमुख एम. एस. डांगी, दाबोळी विमानतळाचे संचालक डी. पॉल मणिक्कम, राज्यसभेचे खासदार राजीव चंद्रशेखर, नौदलाचे इतर वरिष्ठ अधिकारी व इतरांनी त्यांना सलामी दिली. सकाळी १०.४५ च्या सुमारास ह्या दोन्ही वीरांची अंत्ययात्रा येथून निघाली.
बोगदा येथील स्मशानभूमीत अंतिम विधी करण्यापूर्वी दोन्ही वैमानिकांना सलामी शस्त्र, टोपी उतार, उलटा शस्त्र अशा विविध प्रकारांनी मानवंदना देण्यात आली. यानंतर तीन फेऱ्यांनी हवेत गोळ्या झाडण्यात आल्या. याचवेळी त्यांच्या पार्थिवावर घालण्यात आलेले राष्ट्रध्वज कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी स्थानिकांनीही स्मशानभूमीत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

वास्कोत प्रवासी बस ओहोळात कोसळली

वास्को, दि. ५ (प्रतिनिधी): भरवेगाने वास्कोच्या दिशेने येत असलेल्या मिनिबस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने सदर बस गोवा शिपयार्डसमोर असलेल्या ओहोळात आज सकाळी उलटली. या अपघातात बसमधून प्रवास करत असलेले २७ प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने जीवितहानी मात्र टळली. जखमींना उपचारांसाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये बहुतांश महिला व विद्यार्थ्यांचा समावेश असून अपघातानंतर वास्को अग्निशामक दलाने तसेच पोलिसांनी अथक प्रयत्नाअंती उलटलेल्या बसमधून सर्व जखमींना सुरक्षित बाहेर काढले.
आज सकाळी ११.१० च्या सुमारास हा अपघात घडला. बिर्लाहून प्रवाशांना घेऊन वास्कोच्या दिशेने येत असलेली मिनिबस (क्रः जीए ०२ टी ४८९७) गोवा शिपयार्डच्या आधी लागणाऱ्या साकवावर पोहोचली असता बसचालकाचा ताबा सुटला व सदर बस सुमारे १२ फूट खोल ओहोळात कोसळून उलटली. प्रत्यक्षदर्शींनी त्वरित वास्को पोलिसांना अपघाताची माहिती देऊन उलटलेल्या बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. वास्को पोलिसांनी व वास्को अग्निशामक दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन अपघातग्रस्त झालेल्या बसमधून जखमींना बाहेर काढले व १०८ रुग्णवाहिका आणि गोवा शिपयार्डच्या रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना इस्पितळात दाखल केले.
वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर अपघातात एकूण २७ प्रवासी जखमी झाले असून यात ४ वर्षाच्या बालिकेसहित पुरुष, महिला व विद्यार्थिवर्गाचा समावेश आहे. बस चालक फिरोज आगा गाडी चालवत असताना अचानक "फिट' आली असल्याचा अंदाज व्यक्त करून त्यांनी याबाबत अधिक तपास चालवला आहे.
दरम्यान, सदर अपघातात जखमी झालेल्या १६ जणांना गोमेकॉ येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले, चार जणांना खासगी इस्पितळात तर काहींना प्रथमोपचार करून घरी पाठवण्यात आले आहे. काहींना चिखलीच्या कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. वास्कोचे निरीक्षक ब्राज मिनेझीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वैभव नाईक पुढील तपास करीत आहेत.
-------------------------------------------------------------
जखमी प्रवाशांची नावे
जोत्स्ना शिवराम (१९), सिद्धार्थ रामन (२०), किरण भारद्वाज (१९), देवकी (२५), रामचंद्र मळीक (४५), सुनिता सावंत (४५), अब्दुल रजाक (२२), मारिया लुईस (४०), निलव्वा चंद्रगी (५८), नागप्पा जुग्रांद्रि (४३), तारा नाईक (४३), मालिनी वाझ (१९), आफरीन (२०), मिलिंदा चंद्रशेखर चलवादी, रामेश्वर रमाकांत नाईक (४०), मिनी शशिधरन (३८), धारा लमाणी (२८), काली श्रीराम, जोस रॉबर्टो, सुषमा डिसोझा (४), रोनाल्डो लेविस, शैलेश विवेक, फिरोज महम्मद अली, साधू चोपडेकर व चालक फिरोज आगा.

Friday 5 March, 2010

नवा प्रादेशिक आराखडा ६ महिन्यांत जाहीर होणार

गोवा बचाव अभियानाच्या दणक्यानंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही
- मुख्य नगर नियोजकांवर प्रश्नांची सरबत्ती
- मुख्यमंत्र्यांना मडगावातून पुन्हा पणजीत बोलावले

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): प्रादेशिक विकास आराखड्याच्या विषयावरून गोवा बचाव अभियानातर्फे आज अचानक आक्रमक पवित्रा घेण्यात आला. मुख्य नगर नियोजक मुराद अहमद यांना पाटो येथील नगर नियोजन कार्यालयात घेराव घालून प्रादेशिक आराखड्याला होत असलेल्या विलंबाचा जाब विचारल्यानंतर अभियानाने आपला मोर्चा थेट मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या आल्तिनो येथील सरकारी बंगल्यावर वळवला. मोर्चाला सामोरे जावे लागेल, या भीतीने मडगावला धूम ठोकलेल्या मुख्यमंत्र्यांना "ते परत येईपर्यंत दारासमोर ठाण मांडू', असा इशारा देऊन आल्तिनोवर पाचारण करण्याचीही घटना घडली. ते आल्यानंतर व "येत्या सहा महिन्यांत प्रादेशिक विकास आराखडा २०२१ जाहीर करू', असे ठोस आश्वासन पदरात पाडून घेतल्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले.
वादग्रस्त प्रादेशिक विकास आराखडा २०११ जनआंदोलनानंतर २००६ साली रद्द करण्यात आला. या आंदोलनानंतर सर्व लोकांना विश्वासात घेऊन सरकारतर्फे नव्या आराखड्याचे काम सुरू करण्यात आले. नवा प्रादेशिक आराखडा २०२१ तयार करण्यासाठी राज्य सरकारने खास कृती दल स्थापन करूनही या आराखड्याची अधिसूचना जारी करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप अभियानातर्फे करण्यात आला. या विलंबाबद्दल जाब विचारण्यासाठी आज अभियानातर्फे नगर नियोजन खात्यावर भव्य मोर्चा नेण्यात आला. प्रादेशिक आराखडा २०११ रद्द झाला खरा, पण या आराखड्याअंतर्गत विविध ठिकाणी दिलेले परवाने व त्याचबरोबर पर्यावरणीय दृष्टीने संवेदनशील क्षेत्रांतही बांधकामांना आंधळेपणाने मान्यता देण्यात येत असल्याने मोर्चेकरी नागरिकांनी श्री. मुराद यांना चांगलेच धारेवर धरले. डॉ. ऑस्कर रिबेलो, सॅबीना मार्टिन्स, मिंगेल ब्रागांझा, आनंद मडगावकर, पेट्रिशिया पिंटो, प्रजल साखरदांडे आदी पदाधिकारी व विविध भागांतून आलेले नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. नवा आराखडा निश्चित होईपर्यंत सर्व वादग्रस्त बांधकामांना स्थगिती देण्यात यावी, अशी मागणीही यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली. प्रादेशिक आराखड्यासंबंधी स्थानिक पंचायत व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सूचना सादर केल्या आहेत व त्यांचा अभ्यास सुरू असल्याने विलंब झाला, अशी सबब श्री. मुराद यांनी यावेळी पुढे केली. काही पंचायत तथा नागरिकांनी अवाजवी सूचना व मागण्या केल्या आहेत व त्यामुळे आराखड्याबाबत सखोल अभ्यास करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, हे काम मार्गी लावण्यासाठी व कामाला चालना मिळवून देण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पंचायत पातळीवरील प्रस्तावांचा अभ्यास करण्यासाठी खात्याच्या मदतीसाठी अभियानाकडून काही लोकांची शिफारस करण्याचेही ठरले. गोवा बचाव अभियानाकडून ठेवलेल्या मागण्या धोरणात्मक असल्याने त्या सरकारसमोर सादर करू, असेही यावेळी श्री. मुराद यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांना माघारी बोलावले
नगर नियोजन खात्यावरील मोर्चानंतर गोवा बचाव अभियानाकडून हा मोर्चा थेट मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या आल्तिनो येथील सरकारी बंगल्यावर नेण्याचे ठरवण्यात आले. यावेळी अभियानाच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना भेटण्यासाठी येतो, असे सांगितले. आल्तिनो येथील बंगल्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी या मोर्चाला सामोरे जावे लागेल, या भीतीने तिथून काढता पाय घेण्याचे ठरवले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अभियानाचा एक कार्यकर्ता अगोदरच मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर पोहोचला व त्याने मुख्यमंत्री घराबाहेर पडत असल्याचे फोटो काढले. मोर्चेकरी येत असल्याचे कळवूनही मुख्यमंत्री बाहेर पडल्याने संतप्त मोर्चेकऱ्यांनी ते येईपर्यंत तिथून न हालण्याचा निर्धारच केला. या घटनाक्रमामुळे पोलिसांवर मात्र बराच पेचप्रसंग निर्माण झाला. उत्तर गोवा अधीक्षक बॉस्को जॉर्ज, उपअधीक्षक देऊ बाणावलीकर, उपविभागीय अधिकारी केरकर, निरीक्षक संदेश चोडणकर, विश्वेश कर्पे आदी अधिकारी पोलिस फौजफाट्यासह यावेळी हजर होते. डॉ. ऑस्कर रिबेलो यांनी मुख्यमंत्र्यांशी मोबाईलवरून संपर्क साधला व त्यांना मोर्चेकरी लोकांच्या भावना कळवल्या. आपण उद्या भेटू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगताच उपस्थित मोर्चेकऱ्यांचा संताप अनावर झाला. मुख्यमंत्री परत येईपर्यंत जाग्यावरून हालणार नाही, असा हेकाच त्यांनी लावल्याने तसा संदेश मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात आला. शेवटी मुख्यमंत्र्यांना मडगावहून परत पणजीला येणे भाग पडले. यावेळी ते बरेच त्रासलेले दिसत होते. त्यांनी सुरुवातीला आपल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर अभियानाच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी पाचारण केले आणि येत्या सहा महिन्यांत नवा प्रादेशिक आराखडा जाहीर करू, असे आश्वासन त्यांनी दिले. प्रत्येक महिन्यात तालुकानिहाय नकाशा जाहीर करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रांतील बांधकामांवर बंदी आणण्यासंबंधीचा विषय संचालक मंडळ बैठकीत सादर करून तसा आदेश जारी करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. वादग्रस्त प्रकल्पांबाबतची प्रकरणे खात्याच्या नजरेस आणून दिल्यास त्यांची वैधता तपासून पाहिली जाईल, असे ते म्हणाले.
तर सागरी सेतू हवाच कशाला!
गोवा बचाव अभियानाचे नेते डॉ. ऑस्कर रिबेलो हे आज बरेच आक्रमक बनले होते. सरकारकडून सर्वसामान्य जनतेची सुरू असलेली फरफट निषेधार्ह असून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आता तरी याकडे गांभीर्याने पाहावे, असे ते वारंवार मोबाईलवरून मुख्यमंत्र्यांना सांगत होते. मोर्चेकरी येतील याची माहिती असूनही मुख्यमंत्र्यांनी बंगल्यावरून काढता पाय घेतल्याने ते आल्याशिवाय मोर्चेकरी शांत होणार नाहीत, असे डॉ. रिबेलो यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले असता त्यांनी आपण मडगावला पोहोचलो आहोत, असे सांगितले. फक्त दहा मिनिटांपूर्वी पणजीहून सुटलेले मुख्यमंत्री एवढ्या लवकर मडगावला पोहोचत असतील तर सागरी सेतू हवाच कशाला, असे म्हणून डॉ. रिबेलो यांनी त्यांची हवाच काढून घेतली.

कृपालू महाराज आश्रमात चेंगराचेंगरी; ६५ मृत्युमुखी

उत्तरप्रदेशातील प्रतापगढची घटना
प्रतापगढ, दि. ४ : उत्तरप्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यातील मानगढस्थित संत कृपालू महाराजांच्या आश्रमात भंडारा सुरू असताना अकस्मात मंदिराचे प्रवेशद्वार आणि मंडप कोसळल्याने काही भाविक दबले गेले व जीव वाचविण्याच्या नादात चेंगराचेंगरी झाली. यामध्ये ६५ भाविकांचा मृत्यू झाला, तर जवळपास चारशे भाविक जखमी झाले आहेत. जखमींमधील शंभर भाविकांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये ३७ महिला आणि २६ बालकांचा समावेश आहे. आत्तापर्यंत ४३ मृतांची ओळख पटलेली आहे.
कुंडा मानगढ येथील राम जानकी मंदिरात संत कृपालू महाराजांच्या पत्नीच्या श्राद्धानिमित्त भंडारा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाविकांचा महापूर उसळला होता. जवळपास १३ ते १५ हजार भाविक यावेळी उपस्थित होते. भंडाऱ्यादरम्यान भक्तांना मोफत कपडे आणि भांडी वाटायला सुरुवात होताच, मंदिराच्या प्रवेशद्वारातून एकाच वेळी हजारो भाविक आत शिरले आणि एकच गोंधळ उडाला आणि अकस्मात मंडप आणि प्रवेशद्वार कोसळले. त्याखाली काही जण दबले गेले व चेंगराचेंगरी झाली. यात ६५ जण मृत्युमुखी पडले असून, चारशे जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी शंभर जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर प्रतापगढ आणि अलाहाबादच्या इस्पितळांत उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत ४३ मृतांची ओळख पटली असून मृतांमध्ये महिला आणि बालकांची संख्या मोठी आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
कृपालू महाराजांचा आश्रम पाच ते सात हेक्टर परिसरात पसरलेला असून याठिकाणी नेहमीच भाविकांची मोठी गर्दी उसळलेली असते. चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन भाविकांना सुरक्षित बाहेर काढले, असे सूत्रांनी सांगितले.
भाविकांनी मात्र या दुर्घटनेसाठी कार्यकर्त्यांनाच जबाबदार धरले आहे. अत्यंत ढिसाळ नियोजनामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याचा त्यांचा आरोप आहे. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी या संपूर्ण घटनेची चौकशी सुरू केली आहे.

'जी-७'ला धडा शिकवणार!

एका मंत्र्याला वगळण्याचा कॉंग्रेसचा ठाम निर्धार
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाचा वापर करून "ग्रुप ऑफ सेव्हन' अर्थात जी-७ गटाने सुरू केलेल्या दादागिरीला थोपवण्याचा निर्णय कॉंग्रेस श्रेष्ठींनी घेतला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे अरिष्ट टळल्यानंतर लगेच "जी-७' गटाला धडा शिकवण्याची जय्यत तयारी कॉंग्रेसने चालवली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी कोणत्याही परिस्थितीत या गटाशी प्रतारणा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे आसन डळमळीत करण्याची खेळी "जी-७' गटाने आखल्याने येत्या काळात सरकाराअंतर्गत द्वंद्व रंगण्याची शक्यता आहे.
मगोचे नेते तथा वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांना डच्चू देऊन त्यांच्या जागी पुन्हा एकदा कुंभारजुव्याचे आमदार पांडुरंग मडकईकर यांची वर्णी लावण्याची पूर्ण तयारी मुख्यमंत्री कामत यांनी केली होती. अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीचे केंद्रीय नेते शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांचा दबाव वापरून "जी-७' गटाने हा डाव उधळून लावला होता. या घटनेनंतर "जी-७' च्या सर्व सातही नेत्यांनी भेटून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना अक्षरशः दमच भरल्याने कॉंग्रेस पक्षाची पूर्ण नाचक्की झाली होती. कॉंग्रेस श्रेष्ठींनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. ढवळीकरांवरील कारवाईला कॉंग्रेस श्रेष्ठींनीच हिरवा कंदील दाखवला होता, त्यामुळे शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांची मध्यस्थी ही थेट कॉंग्रेस श्रेष्ठींनाच आव्हान ठरल्याने कॉंग्रेसने हा प्रतिष्ठेचा विषय बनवला आहे. सध्या जिल्हा पंचायत निवडणुका व त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याने तोपर्यंत धीर धरण्याचे ठरले आहे. एकदा हा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे अरिष्ट दूर झाले, की या "जी-७' गटाचे वर्चस्व उधळून टाकण्याची तयारी कॉंग्रेसने आखली आहे.
"जी-७' गटानेही आपली ताकद सिद्ध करून दाखवण्याचा चंग बांधला आहे. या गटाशी प्रतारणा करून मुख्यमंत्र्यांनी एकही निर्णय घेतला तर त्यांना या पदावरून खाली खेचल्याशिवाय गप्प राहणार नाही, असा निर्धार "जी-७' गटाने केला आहे. विद्यमान कॉंग्रेस सरकारचे भवितव्य हे या गटावरच अवलंबून आहे, त्यामुळे या गटाची उपेक्षा करणे सरकारला अजिबात परवडणारे नाही, अशी माहितीही सूत्रांनी दिली.
दिगंबर- मडकईकर भेट
पांडुरंग मडकईकर यांच्या शपथविधी सोहळ्याच्या "फियास्को'नंतर पहिल्यांदाच आज मडकईकर व मुख्यमंत्री कामत यांची आल्तिनो येथील बंगल्यावर बराच वेळ बैठक झाल्याची माहिती मिळाली आहे. मडकईकर यांची मंत्रिपदावर वर्णी लावण्यास खुद्द श्रेष्ठींनी मान्यता दिल्याने मुख्यमंत्रीही पेचात सापडले आहेत. कोणत्याही परिस्थितीत अर्थसंकल्पानंतर मडकईकर यांची वर्णी मंत्रिमंडळात लागेल, असा विश्वास त्यांनी यावेळी श्री. मडकईकर यांना दिला, अशीही खबर आहे. येत्या काळात ढवळीकरांचा डच्चू अटळ आहे व मडकईकरांचा मंत्रिमंडळ समावेशही निश्चित झाल्याचेच यावेळी सूत्रांकडून कळते.

'त्या' साट्यालोट्यांचा आज पर्दाफाश होणार

४८ तासांत तपास पूर्ण
करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): अमली पदार्थ व्यवसायातील माफियांशी पोलिस अधिकाऱ्याचे असलेले साटेलोटे धडधडीतपणे उघडकीस आल्याने गृहमंत्रालयात एकच खळबळ माजली असून या प्रकरणाची चौकशी येत्या ४८ तासांत पूर्ण करण्याचे आदेश पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांना देण्यात आले आहेत. सदर आदेश आज दुपारी राज्याचे गृहमंत्री रवी नाईक यांनी दिले.
इस्रायली माफियांशी संबंध ठेवून, त्यांना संरक्षण देऊन त्यांच्याकडून पैसे उकळणारे पोलिस अधिकारी आणि अन्य काही पोलिसांच्याविरुद्ध बरेच पुरावे सध्या तपास पथकाच्या हाती लागले असून उद्यापर्यंत "दूध का दूध, पानी का पानी' होणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. तब्बल एक तास पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांच्याशी चर्चा केल्यानंतर गृहमंत्री रवी नाईक यांनी येत्या ४८ तासांत या प्रकरणाचा "पर्दाफाश' होणार असल्याचा दावा केला.
यापूर्वी अमली पदार्थ विरोधी पथकाचे निरीक्षक म्हणून सेवा बजावत असलेले आणि सध्या जुने गोवे पोलिस स्थानकात असलेले निरीक्षक आशिष शिरोडकर यांचे या प्रकरणात नाव पुढे आले आहे. ते या प्रकरणात दोषी असल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाणार असल्याचे आज पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांनी सांगितले. "हा प्रकार गंभीर स्वरूपाचा असून ड्रग माफियांशी संबंध ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. सध्या इंटरनेटवर झळकत असलेल्या त्या "फुटेज'ची आम्ही तपासणी करीत असून तपासाअंती योग्य तो निर्णय घेतला जाईल' असे आज सकाळी श्री. बस्सी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
"संगणक विषयातील तज्ज्ञ मंडळी त्या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहत आहेत. मी तुम्हांला खात्री देऊ शकतो की येत्या ४८ तासांत योग्य ती कारवाई केली जाईल', असे श्री. नाईक यांनी सांगितले. "असे घडायला नको होते. या पथकातील पोलिस अधिकारी हे लोकांची सेवा करण्यासाठी व ड्रग माफियांना जेरबंद करण्यासाठी असतात. तेच अधिकारी अशा पद्धतीने वागायला लागल्यास ते कदापि सहन केले जाणार नाही', असेही श्री. नाईक यावेळी म्हणाले.
२००८ मध्ये अटाला या ड्रग माफियाच्या केलेल्या "स्टिंग ऑपरेशन'मुळे पोलिस आणि ड्रग माफियांचे साटेलोटे असल्याचे उघडकीस आले आहे. अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिस अधिकारी कशा पद्धतीने "ड्रग पॅडलर'ना संरक्षण पुरवतात, त्यानंतर पकडण्यात आलेल्या "पॅडलरना' सोडण्यासाठी लाखो रुपये आणि अमली पदार्थ कसे घेतात, ही सर्व माहिती याच स्टिंग ऑपरेशनमुळे उघड झाली आहे. सदर स्टिंग ऑपरेशन हे खुद्द अटाला याच्याच प्रेयसीने केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. "यू ट्यूब'वर झळकत असलेल्या या व्हिडिओसोबतच आज आणखी एक व्हिडिओ इंटरनेटवर झळकायला लागला असून, त्यात सदर पोलिस अधिकाऱ्याने अटाला याच्या शिवोली येथील घरी येऊन एक लाख रुपये आणि दोन ग्रॅम कोकेन घेऊन गेल्याचीही बाबही उघड झाली आहे. त्यावेळी त्या पोलिस अधिकाऱ्याबरोबर दोन पोलिस शिपाईही आले होते, असे अटाला आपल्या बाजूला बसलेल्या व्यक्तीला सांगत आहे.

'ती' महत्त्वपूर्ण फाईलच गायब

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): पोलिस अधिकारी आणि ड्रग पेडलर यांचे संबंध असल्याची प्रसिद्धी माध्यमांत छापून येणाऱ्या बातम्यांची महत्त्वपूर्ण फाईलच अमली पदार्थविरोधी पथकाच्या मुख्यालयातून गायब झाली आहे!
पोलिस आणि अमली पदार्थ व्यवहारात गुंतलेल्या लोकांचे असलेले साटेलोटे या विषयावर अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांची कात्रणे काढून त्याची फाईल तयार करण्यात आली होती. ती फाईल गेल्या काही महिन्यांपासून गायब असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. सध्या प्रसिद्धी माध्यमांत झळकत असलेले पोलिस अधिकारी व काही पोलिस शिपाई यांची अनेक प्रकरणे प्रसिद्ध झाली आहेत. १९९४ पासूनची कात्रणे सदर फायलीत ठेवण्यात आली होती.
अमली पदार्थविरोधी पथकातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमली पदार्थविरोधी पथकातील पोलिस निरीक्षकाची बदली झाल्यापासून ही फाईल गायब झाली आहे. सदर फाईल पोलिस स्थानकात होती, असेही सूत्रांनी सांगितले. ही फाईल सरकारी नसली तरी ती अत्यंत महत्त्वाची होती. कारण त्यात अनेक पोलिस अधिकारी आणि शिपायांबद्दलची माहिती गोळा करून ठेवण्यात आली होती.
"दुदू याला अटक झाल्याने आणि त्यानंतर काही पोलिस अधिकारी तसेच पोलिस शिपायांची नावे उघड झाल्याने त्या फायलीत असलेली माहिती उपयुक्त ठरली असती. कारण त्यात उत्तर गोव्यातील ड्रग पेडलर तसेच त्यांच्याशी मैत्री ठेवून असलेल्या पोलिसांची नावे उपलब्ध होती. २००५ ते २००७ या दरम्यान प्रसिद्धी माध्यमानी दुदू आणि अमली पदार्थविरोधी पथकातील "कामिण' नामक हवालदार आणि अन्य पोलिसाचे साटेलोटे असल्याच्या अनेक बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या.
दरम्यान, सदरफाईल गायब असल्याची माहिती खरी असली तरी, त्यावर कोणतीही प्रतिक्रीया व्यक्त करण्यास अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधीक्षक वेणू बन्सल यांनी नकार दिला.

कारापूर येथे रिक्षा उलटली, २० जखमी

शिमगोत्सवाच्या आनंदावर विरजण
डिचोली, दि. ४ (प्रतिनिधी): शिमगोत्सवातील रोमटामेळाचा एक गट छोट्या मालवाहू रिक्षेने कोठीवाडा - कारापूर येथून सर्वण येथे जात असताना अचानक रिक्षा रस्त्याच्या डाव्या बाजूला उलटल्याने झालेल्या अपघातात तब्बल २०जण जखमी झाले असून त्यातील ९ जणांना गंभीर दुखापत झाल्याने बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात हालवण्यात आले आहे. या अपघातात काहींच्या पायांना व हातांना गंभीर दुखापत झाली आहे. सर्व प्रवासी कारापूर परिसरातील असून ऐन शिमगोत्सवात हा अपघात झाल्याने शिमगोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे.
कोठीवाडा येथून जीए - ०४ १७१५ या क्रमांकाच्या मालवाहू छोट्या रिक्षातून शिमगोत्सवासाठी रोमटामेळाचा एक गट ढोल, ताशे घेऊन सर्वण येथे जाण्यासाठी निघाला होता. कारापूर कोठीवाडा येथील टॉवरच्या अलीकडे सदर रिक्षा पोहोचली असता वळणावर तिचा तोल गेल्याने ती तीन गटांगळ्या खात रस्त्याच्या बाजूला उलटली. या रिक्षात सुमारे ९ ते २५ वयोगटातील तब्बल २० जणांचा समावेश होता.
अपघात होताच एकच खळबळ माजली. लागलीच १०८ वाहनाला पाचारण करण्यात आले. डिचोली अग्निशामक दल, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या साहाय्याने जखमींना साखळी इस्पितळात हालविण्यात आले.
अपघातातील जखमींपैकी आतिश गावकर, उमेश सावंत, नीलेश गुरव, विठ्ठल परवार, नारायण गुरव, पंकराज परवार, भिकाजी गावकर, साईराज गावकर, विराज गावकर यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना बांबोळी इस्पितळात हालविण्यात आले. यातील काहीजणांच्या हाताला व पायाला फ्रॅक्चर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
उर्वरित जखमींपैकी जयेश सातार्डेकर, विजयकुमार गावकर, साई संतोष गावकर, नारायण पेडणेकर, साहील गावकर, विशाल वायंगणकर, सूर्या गुरव, अनंत गावकर, जयेश गावकर, आदींवर साखळी येथील इस्पितळात उपचार सुरू आहेत

कॉंग्रेस पुरस्कृत उमेदवारांना आता घरी बसवा: प्रा. पार्सेकर

पणजी, दि. : राज्यात भ्रष्टाचार, गुन्हेगारी, महागाई, ड्रग माफियांचा सुळसुळाट, बेकायदा खाण व्यवसाय इत्यादी समस्यांनी गंभीर स्वरूप धारण केले असून सध्या गोव्यात चाललेली ही बजबजपुरी थांबवण्यासाठी अशा प्रकरणांत गुंतलेल्या कॉंग्रेस आमदारांनी राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीत पाठिंबा देऊन ठिकठिकाणी उभ्या केलेल्या उमेदवारांना खड्यासारखे वेचून बाहेर काढून टाका, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गोव्यातील सुजाण मतदारांना केले आहे.
राज्यात कॉंग्रेस सरकार सत्तेवर आल्यापासून खून, बलात्कार तसेच दरोडेखोरीचे प्रकार वाढत चालले आहेत. मादक द्रव्य तसेच अमली पदार्थांचा व्यवहार तर राजरोसपणे चालत असून या व्यवसायात सरकारमधील काही व्यक्ती तसेच पोलिस अधिकारीही गुंतले आहेत. त्यांना सरकारचे पाठबळ लाभत असल्यामुळे गोव्यातील कायदा व सुव्यवस्था पार बिघडली आहे. बरेच मंत्री गोव्याचे वाटोळे करून भ्रष्टाचाराच्या मार्गाने पैसा कमावण्यात गुंतले आहेत. बेकायदा खाणींनी तर गोव्याचे अस्तित्वच धोक्यात आणले असून विद्यमान सरकारमधील मंत्र्यांच्या वरदहस्तानेच त्यांना मोकळे रान मिळाले आहे, असा घणाघाती आरोप प्रा. पार्सेकर यांनी केला आहे.
राज्यात महागाईने कळस गाठला असून आम आदमीचे जिणे कठीण होत चालले आहे. महागाईवर नियंत्रण आणण्यास सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. अशा परिस्थितीत होत असलेली जिल्हा पंचायत निवडणूक म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या ठरलेल्या पतनाची नांदीच असून या सुवर्णसंधीचा लाभ सुजाण गोमंतकीयांनी घेतलाच पाहिजे असे प्रा. पार्सेकर यांनी म्हटले आहे. या निवडणुकीत कॉंग्रेसच्या भ्रष्ट मंत्री तसेच आमदारांनी उभ्या केलेल्या उमेदवारांच्या विरोधात मतदान करून कॉंग्रेसच्या भ्रष्ट राजवटीला आता जनता कंटाळली आहे असा संदेश त्यांच्यापर्यंत पोचवा. त्यासाठी कॉंग्रेस पुरस्कृत उमेदवारांना खड्यासारखे वेचून बाहेर काढून टाकल्यास गोव्यातील जनतेला भ्रष्ट सत्ता नको हे सिद्ध होईलच शिवाय भाजप सरकारच गोव्याला स्थिर व स्वच्छ प्रशासन देऊ शकते अशी भावना निर्माण होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
या सर्व बाबींचा विचार करून भाजप तसेच भाजपच्या पाठिंब्यावर ठिकठिकाणी उभ्या असलेल्या उमेदवारांनाच प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्षांनी केले आहे.

दान करण्याची सवय असावी लागते: पर्रीकर

'गोवादूत'तर्फे काणकोण पूरग्रस्तांना निधीचे वाटप
काणकोण, दि. ४ (प्रतिनिधी): भिक्षा व भीक या दोन परस्परविरोधी बाबी असून या दोहोंपेक्षा दातृत्व श्रेष्ठ असते; दान करण्याची सवय असावी लागते, नपेक्षा ती लावावी लागते. काणकोण पूरग्रस्तांना मदत करण्याच्या कामी "गोवादूत'ने पुढाकार घेतला ही कौतुकास्पद गोष्ट असून त्यासाठी "गोवादूत'चे आपण मनापासून अभिनंदन करतो. आज "गोवादूत'ने गरजूंपर्यंत ही मदत पोहोचवण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केले.
काणकोण पूरग्रस्तांसाठी "गोवादूत'ने जमवलेल्या मदतनिधीच्या वितरणाचा कार्यक्रम आज (४ रोजी) अर्धफोंड येथे आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. येथील श्रीबलराम निवासी विद्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात श्री. पर्रीकर यांच्या समवेत स्थानिक आमदार रमेश तवडकर, "गोवादूत'चे संचालक ज्योती धोंड व सागर अग्नी, विलास कामत, गोवा खाजगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर, पैंगीणचे माजी सरपंच कुष्टा तळपणकर व विद्यमान सरपंच महेश वारीक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दि. २ ऑक्टोबर २००९ रोजी आलेल्या प्रलयकारी भूकंपात नुकसान झालेल्या आवळी, बड्डे, कुस्के, येडा, पणसुलेमळ व अवे येथील १२९ शेतकऱ्यांना सुमारे ४ लाख रुपयांच्या मदतनिधीचे वितरण करण्यात आले. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, आमदार तवडकर, पैंगीणचे माजी सरपंच कुष्टा तळपणकर व विद्यमान सरपंच महेश वारीक यांनी याप्रसंगी धनादेशांचे वाटप केले.
दया गावकर यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. सागर अग्नी यांनी केलेल्या प्रास्ताविकात "गोवादूत'ने सामाजिक बांधीलकीतूनच हा निधी उभारल्याचे स्पष्ट केले. आमदार तवडकर यांनी "गोवादूत'च्या या उपक्रमाचे कौतुक करून स्थानिकांच्या वतीने धन्यवादही दिले. १५०० शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जांवर अजूनही कार्यवाही सुरू असून सरकारने अनेकांना अतिशय अल्प मदत दिली असल्याचे ते म्हणाले.

Thursday 4 March, 2010

प्रवीण महाजन यांचे ब्रेन हॅमरेजने निधन

ठाणे, दि. ३ : भाजप नेते प्रमोद महाजन यांची निर्घृण हत्या केल्यामुळे जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेले त्यांचे बंधू प्रवीण महाजन यांचे आज सायंकाळी येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले. ते ५० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सारंगी, पुत्र व कन्या असा परिवार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते. त्यांचा मृत्यू ब्रेन हॅमरेजने झाल्याचे ज्युपिटर रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे.
११ डिसेंबर रोजी प्रवीण यांना अचानक चक्कर आली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १२ तारखेला ते कोमात गेले. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच आज त्यांचे निधन झाले.
घरगुती वादातून दि. २२ एप्रिल २००६ रोजी प्रमोद यांच्या मुंबईतील घरात प्रवीण यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचा खून केला होता. त्यानंतर त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. ११ डिसेंबरपूर्वी ते पॅरोलवर सुटले असतानाच त्यांना अचानक ब्रेन हॅमरेज झाले.
प्रमोद महाजन हत्या खटल्याच्या वेळी प्रवीण महाजन यांनी प्रमोद यांच्यावर अनेक खळबळजनक आरोप केले होते. परंतु, त्यावेळी न्यायालयाने ही सुनावणी इन कॅमेरा असल्याचे जाहीर केल्याने त्या आरोपांचा उलगडा होऊ शकला नाही. त्यामुळे प्रमोद महाजन यांच्या हत्येमागील खरे कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे.
"माझा अल्बम' - प्रवीणचे पुस्तक
दरम्यान, तुरुंगात असतानाच्या काळात प्रवीण यांनी "माझा अल्बम' नावाचे आठवणीवजा पुस्तकही लिहिले. त्याचे एक प्रकरण मुंबईतील एका वृत्तपत्राने छापल्याने खळबळही उडाली होती. हे पुस्तक प्रवीणने बंधू प्रमोद यांना केंद्रस्थानी ठेवून लिहिले होते. यात प्रमोद यांच्या संदर्भातील काही प्रसंग वादग्रस्त ठरतील असे आहेत. प्रवीणच्या गेल्या ३० वर्षांतील आठवणी सांगणाऱ्या या पुस्तकातून महाजनांच्या कुटुंबाविषयी, त्यांचे परस्पर नातेसंबंध, राजकारण, कटू प्रसंग याविषयी उलगडा होतो. प्रवीणच्या या पुस्तकात प्रमोद केंद्रस्थानी असल्याने "माझा अल्बम'ने वाचकांचे लक्ष वेधून घेतले. प्रमोद महाजनांचा खुनी म्हणून अटक झाल्यानंतर प्रवीणविषयी अनेक प्रवाद उठले होते. त्यांचे निराकरण व्हावे या हेतूने पुस्तक लिहिल्याचे त्यांनी या पुस्तकात म्हटले आहे.

'जी-७' च्या दादागिरीमुळे कॉंग्रेस गोटात तीव्र असंतोष

श्रेष्ठींच्या भूमिकेकडे सर्वांची नजर
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): राज्यातील कॉंग्रेस आघाडी सरकारातील कॉंग्रेसेतर "ग्रुप ऑफ सेव्हन' नेत्यांच्या वाढत्या दादागिरीमुळे कॉंग्रेस विधिमंडळ गट व प्रदेश कार्यकारिणीत प्रचंड असंतोष धुमसत असून त्याला चिंतेची किनारही लाभली आहे. या गटाची सध्याची रणनीती पाहता कॉंग्रेसबरोबर सत्तेत राहून या पक्षाला नामोहरम करण्याची त्यांची व्यूहरचना आता हळूहळू ठळक होत चालली आहे. या गटाला कशा पद्धतीने हाताळावे, असा यक्षप्रश्न कॉंग्रेससमोर उभा ठाकला असून दिल्लीतील कॉंग्रेस श्रेष्ठी याबाबत नेमकी काय भूमिका घेतात याकडेच त्यांची नजर लागून राहिलेली आहे.
आघाडी सरकारात घटक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, मगो, युगोडेपा व अपक्ष आमदार अशा सातही नेत्यांनी आपला वेगळा दबावगट तयार केला आहे. विशेष म्हणजे या गटाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा आधार घेत पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नेतृत्व मान्य केले आहे, त्यामुळे कॉंग्रेसला या गटाचा दबाव सहजपणे झुगारून टाकणेही कठीण बनणार आहे. या गटाकडून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना थेट आव्हान दिले जात असल्याने कामत कॉंग्रेस पक्षाची पत कितपत सांभाळू शकतील, अशी भीती आता व्यक्त होऊ लागली आहे. नेतृत्व बदलाच्या मागणीवरून या गटाने यापूर्वीच कॉंग्रेस पक्षातील काही आमदारांना आपल्या बाजूने वळवल्याने या गटाला उघडपणे थोपवणेही कामत यांना शक्य होणार नाही. आपली खुर्ची सांभाळण्यासाठी आता मुकाट्याने या गटाची दादागिरी सहन करावी की कॉंग्रेसची प्रतिष्ठा जपावी, अशा द्विधा मनःस्थितीत मुख्यमंत्री कामत सापडले आहेत.
प्रदेश कॉंग्रेस पातळीवर या गटाविरोधात प्रचंड असंतोष पसरला असला तरी सत्ता शाबूत ठेवण्याच्या दृष्टीने या गटाविरोधात उघडपणे मतप्रदर्शन करण्याचे धाडस कुणीही पदाधिकारी करत नसल्याने पक्षातील अस्वस्थता वाढली आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता कायम राखणे गरजेचे आहे व त्यासाठी काही प्रमाणात मानहानी सहन करणे अपरिहार्य आहे, असे मत एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केले. प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांच्या मवाळ भूमिकेवरही पक्षातील अनेक पदाधिकारी नाराज असल्याचीही वार्ता पसरली आहे. राज्यातील कॉंग्रेसचे भवितव्य सांभाळायचे असेल तर पक्षाची प्रतिष्ठा जपणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली या गटाची दादागिरी सहन केली तर भविष्यात कॉंग्रेसच्या बालेकिल्यांवर हा गट घुसखोरी करेल व त्यात पक्षाचेच नुकसान होईल, अशी चिंताही अनेकांना सतावत आहे. नेतृत्व बदलाने या विषयावर तोडगा निघत असेल तर त्यासाठी ती तयारी देखील प्रदेश कॉंग्रेसने दर्शवली आहे, अशीही खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
राज्यातील या घटनाक्रमांबाबत कॉंग्रेस श्रेष्ठींना अवगत करण्यात आले आहे. पक्षाचे प्रभारी बी. के. हरिप्रसाद यांच्याकडे याप्रश्नी तोडगा काढण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. हरिप्रसाद याप्रसंगी नेमकी काय भूमिका घेतात व हा घोळ कसा संपुष्टात आणतात याकडेच कॉंग्रेसजनांची नजर लागून आहे.

दाबोळी तळावरील नौदलाचे विमान हैदराबादेत कोसळले

दोन वैमानिकांसहित तिघांचा मृत्यू
हैदराबाद, दि. ३ : हवाई कसरत करताना गोवास्थित नौदलाचे "सूर्यकिरण' हे विमान आज हैदराबादेतील एका इमारतीवर कोसळले. या अपघातात वैमानिक सुरेश मौर्य आणि त्याचा सहकारी (को-पायलट) राहुल नायरचा मृत्यू झाल्याची माहिती नौदलाच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे. अपघातात इमारतीतील एकाचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सदर लढाऊ विमान हे भारतीय नौदलाच्या गोव्यातील दाबोळी हवाई तळावरील (आयएनएस हंसा) सागर पवन एरोबेटिक्स टीमचे होते. सागर पवन ही भारतीय नौदलाची हवाई (एरोबेटिक्स) प्रात्यक्षिके दाखवणारी टीम आहे.
हैदराबादमध्ये आज नौदलाच्या विमानांची सांघिक कवायत होती. सागर पवन एरोबेटिक्स टीमतर्फे ही कवायत केली जाणार होती. चार विमानांच्या या संघातील एक विमान हा शो सुरू असतानाच बेगमपेट विमानतळाजवळील बोवनपल्ली भागातील एका तीन मजली इमारतीवर कोसळले. अपघातात विमानातील दोन वैमानिक मृत्युमुखी पडले. तर ज्या इमारतीवर हे विमान कोसळले त्यातील एकाचा मृत्यू झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर इमारतीतून काळ्या धुराचे लोट दिसत होते.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, की त्यांनी एक मोठा आवाज ऐकला आणि हे विमान खाली येताना दिसले. यावेळी आकाशात धुराचा मोठा लोटही दिसून आला. विशेष म्हणजे या एअर शो दरम्यान नागरी वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री के. रोसय्याही उपस्थित होते. त्यांच्या समोरच हा अपघात घडला.
नौदलप्रमुख निर्मल मेहता यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. हवाई कसरत करताना वैमानिकाला हे विमान वर उचलता आले नाही. पण त्याने कमीत कमी नुकसान होईल, असा मार्ग अवलंबला.
२००३ मध्ये स्थापन केलेल्या सागर पवन टीमने गोव्यात गेल्या १९ फेब्रुवारीला "मिग २९ के' ला हवाई दलात सामील केल्याबद्दल एअर शोमध्ये सहभाग नोंदवला होता. जगात नौदलाच्या दोनच एरोबेटिक्स टीम आहेत. त्यात अमेरिकेची ब्ल्यू एंजल्स व भारताची सागर पवन आहे.
दरम्यान, भारतीय सुरक्षा दलाच्या संदर्भात गेल्या काही दिवसांत घडलेली ही तिसरी दुर्घटना आहे. २७ फेब्रुवारीला हवाई दलाचे सारंग हे हेलिकॉप्टर जैसलमेरमध्ये सराव करताना अपघातग्रस्त झाले होते. हवाई दलाच्याच सूर्यकिरण हवाई प्रदर्शन दलाच्या एका वैमानिकाचा २१ जानेवारी २००९ ला अपघाती मृत्यू झाला होता. तो सुद्धा एमके२ हेच विमान उडवत होता. १८ मार्च २००६ ला सूर्यकिरण विमान बिदरजवळ अपघातग्रस्त झाले होते. त्यात विंग कमांडर धीरज भाटिया व स्वाड्रन लीडर शैलेंद्र सिंह यांचा मृत्यू झाला होता.

'यू ट्यूब' वरील धक्कादायक व्हिडिओ क्लिपमुळे पर्दाफाश

पोलिस-ड्रग माफियांचे घनिष्ठ संबंध उघडकीस
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): जप्त करून न्यायालयाच्या अखत्यारीत ठेवण्यात येणारा अमली पदार्थ खुद्द अमली पदार्थ विरोधी पथकातील एक पोलिस निरीक्षकच नंतर चोरून ड्रग पॅडलरना विकत असल्याची सनसनाटी माहिती उघडकीस आली आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल आणि विश्वासार्हतेबद्दल पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या घटनेमुळे गोव्यात एकच खळबळ उडाली आहे.
इंटरनेटवरील "यू ट्यूब' वर इस्रायली ड्रग माफिया अटाला याच्यासोबतच्या संभाषणावरून ही माहिती उघडकीस आली आहे. यात अमली पदार्थ विरोधी पथकात असलेले निरीक्षक आशिष शिरोडकर कशा पद्धतीने ड्रग विक्री करीत होते आणि ते कसे ड्रग विक्री करणाऱ्या माफियांना संरक्षण देत होते, हे सरळसरळ उघड झाले आहे.
ड्रग माफिया "दुदू' अमली पदार्थ विरोधी पथकाच्या हाती लागल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस यायला सुरुवात झाली आहे. या "यू ट्यूब' वरील संभाषणाबद्दल पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांना विचारले असता "या यू ट्यूबची विश्वासार्हता तपासून पाहिल्यानंतरच त्यावर प्रतिक्रिया दिली जाईल' असे ते म्हणाले.
यू ट्यूबवरील "त्या' "व्हिडिओ क्लिपनुसार' ड्रग माफिया अटाला याने सध्या जुने गोवे पोलिस स्थानकात असलेले निरीक्षक आशिष शिरोडकर हे आपल्याला अमली पदार्थ पुरवीत असल्याचा आरोप केला आहे. हे संभाषण तो एका "साई' नामक तरुणाशी करीत आहे. छापा टाकून जप्त करण्यात येणारा अमली पदार्थ पंचनामा करून न्यायालयाच्या कोठडीत ठेवला जातो. तो कोठडीतला अमली पदार्थ चोरून आपल्याला पुरवला जात असल्याचे त्याने म्हटले आहे. सदर व्हिडिओ इंटरनेटवर २० एप्रिल २००८मध्ये "अपलोड' करण्यात आला आहे.
या क्लिपमध्ये अटाला म्हणतो, "जिल्हा पोलिसांनी मला पकडल्यास मी कायमचा तुरुंगात जाणार. परंतु, "एएनसी'ने (अमली पदार्थ विरोधी पथक) पकडल्यास घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. येथे मला कोणीही हात लावू शकत नाही. अमली पदार्थ विरोधी पथकही! कारण त्यांना मी भरपूर पैसा पुरवतो.' हे संभाषण स्पष्टपणे सदर व्हिडिओ क्लिपवर' ऐकायला मिळते.
मोडक्या तोडक्या इंग्रजीत बोलताना ड्रग माफिया अटाला पुढे म्हणतो की, "आता माझ्या गळाला एक मोठा अधिकारी लागलेला आहे. तो म्हापसा येथील न्यायालयातून भरपूर अमली पदार्थ घेऊन येतो. एकदा तेथे अर्धा किलो "कोकेन' ठेवलेला होता. तेथे हा अधिकारी गेला आणि त्याने तो चोरून आणून मला दिला. पकडण्यात येणारा ड्रग न्यायालयात जातो. त्यानंतर तो ड्रग जाळून नष्ट करण्यासाठी या अधिकाऱ्याकडे दिला जातो. परंतु, तो माझ्यापर्यंत येतो'
सदर पोलिस अधिकारी आपल्याला पहिल्यांदा भेटला त्यावेळी त्याने आपल्याकडून १० "एक्सटसी' गोळ्या घेतल्या होत्या आणि मनात नसताना आपल्याला त्या द्याव्या लागल्या होत्या, असाही आरोपही अटाला यांनी केला आहे. ""त्यानंतर आम्ही चांगले मित्र बनलो'' असे तो पुढे साई या व्यक्तीला सांगतो.
या विषयी पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांना विचारले असता, त्यांनी "नो कॉमेंटस' असे उद्गार काढले. तर, अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधीक्षक वेनू बन्सल यांना विचारले असता, यावर आपल्याला काहीही बोलायचे नसल्याचे त्यांनी सांगितले.
-----------------------------------------------------------------
या वादग्रस्त व्हिडिओ क्लिपिंगच्या संदर्भात पोलिस महानिरीक्षक भीमसेन बस्सी यांना विचारायला गेलेल्या पत्रकारांना सुरुवातीला त्यांनी भेटायचेच टाळले. त्यानंतर मिळालेल्या भेटीनंतर त्यांनी आपल्याला या व्हिडिओबद्दल काहीही माहिती नसल्याची भूमिका घेऊन ही गोष्ट पहिल्यांदाच तुमच्याकडून ऐकत असल्याचे सांगितले. त्यामुळे काही मिनिटांत त्या व्हिडिओची एक सीडी प्रत त्यांना सादर करण्यात आली. त्याबरोबर ते गडबडले आणि ती सीडी पाहिल्यावर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इंधन दरवाढीवरून संसदेत 'भडका'

नवी दिल्ली, दि. ३ : केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीच्या निर्णयावरून आज अपेक्षेप्रमाणे संसदेच्या दोन्ही सभागृहात भडका उडाला. पेट्रोल- डिझेलच्या किंमती कमी झाल्याच पाहिजेत, अशी विरोधकांची घोषणाबाजी लोकसभा - राज्यसभेत घुमली आणि अवघ्या काही मिनिटांतच दोन्हीकडचे कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
गेल्या आठवड्यात, २६ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली होती. त्याचा तात्काळ निषेध करत विरोधकांनी सभात्याग केला आणि तिथेच ही दरवाढ स्फोटक ठरणार, हे स्पष्ट झाले.
होळी - रंगपंचमीच्या चार दिवसांच्या सुट्टीनंतर संसदेचे कामकाज आज सुरू झाले आणि रस्त्यावरचा "राडा' दोन्ही सभागृहात पेटला. लोकसभा सभापती मीरा कुमार यांनी प्रश्नोत्तरांचा तास पुकारताच समाजवादी पार्टीचे खासदार हौद्यात उतरले आणि त्यांनी प्रचंड घोषणाबाजी सुरू केली. भाजप खासदारही त्यांच्या पाठोपाठ मैदानात आले आणि आवाज चांगलाच वाढला. विरोधकांचा हा पवित्रा पाहून मीरा कुमार यांनी सभागृहाचे कामकाज तासभर तहकूब करणेच पसंत केले. राज्यसभेतही असाच प्रकार बघायला मिळाला.
दरम्यान, कॉंग्रेस संसदीय पक्षाची बैठक आज होणार असून त्यावेळी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी कॉंग्रेस खासदारांना इंधनाचे अर्थकारण समजावून सांगणार आहेत. कारण कॉंग्रेस खासदारांनीही पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला तीव्र विरोध केला आहे. महागाई विरोधात देशातील सर्वच विरोधी पक्ष नेत्यांनी एकत्र येत भारत बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. महागाईवर नियंत्रण ठेवण्यात सरकारला अपयश आले असल्याचा आरोप "एनडीए'चे संयोजक शरद यादव यांनी केला आहे. आंदोलनाची निश्चित तारीख ठरली नसून, लवकरच त्याची घोषणा केली जाणार असल्याचे यादव यांनी स्पष्ट केले आहे.
आयातीतील घोटाळ्यामुळे साखर कडू झाली!
साखरेच्या वाढत्या भावामागे आयातीत झालेला घोटाळा कारणीभूत असल्याची राळ उडवून देत विरोधकांनी आज राज्यसभेत सरकारला चांगलेच धारेवर धरले. दरम्यान, कृषिमंत्री शरद पवारांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला.
दरवाढीच्या प्रश्नावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. विशेषतः भाजप आणि डावे पक्ष या निमित्ताने एकत्र आले होते. पवारांच्या काळात साखरेचा "महाघोटाळा' झाल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रश्नाला उत्तर देताना, "संबंधित काळात सरकारतर्फे एक किलोभरही साखर आयात करण्यात आलेली नाही, असा खुलासा पवारांनी केला. पण विरोधक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.
दरवाढीच्या प्रश्नावरून विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज आज तीन वेळा तहकूब करावे लागले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनी, साखर आयात करून ती खासगी विक्रेत्यांच्या हाती सोपविण्यात सरकारची संशयास्पद भूमिका दिसते आहे, असा आरोप केला.

विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी पवारांनी तासभर भाषण केले. पण त्यात त्यांना अनेक मुद्यांवर विरोधकांनी घोषणाबाजी करत, प्रतिप्रश्न करत अडविण्याचे धोरण ठेवले. साखरेच्या आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरित होणाऱ्या अन्नधान्यांच्या किमतींबाबत विचारलेल्या प्रश्नांना पवार बगल देत आहेत, असा विरोधकांचा आक्षेप होता.

डाळी, पीठे, बटाटे आणि कांदे या पदार्थांच्या किमती खाली आल्या आहेत असा दावा करून सरकारने गहू व तांदूळ यांची किमान आधारभूत किंमत गेल्या पाच वर्षांत सत्तर टक्क्यांनी वाढविली आहे. मात्र, तरीही काही अपरिहार्य कारणांचा महागाईवर परिणाम होत असल्याचे पवार म्हणाले.

जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात राहाव्यात म्हणून सरकारने अनेक उपाय योजले आहेत आणि यापुढेही या दिशेने पावले उचलण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

अंगावर माड पडून मांद्रेत एकाचा मृत्यू

पेडणे,दि. ३ (प्रतिनिधी): मांद्रेचे माजी उपसरपंच रतिनाथ शेटगावकर हे आज (दि.३) संध्याकाळी आपल्या दुचाकीवरून घरी जात असता मधलामाज मांद्रे पाट्याजवळ वाळलेला माड त्यांच्या डोक्यावर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या अपघातातून दुचाकीच्या मागे बसलेला इसम मात्र सुदैवाने बचावला.
पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज ३ रोजी संध्याकाळी ६.३० वा. श्री. शेटगावकर हे आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना मधलामाज पाट्याजवळ पोहोचले असता तेथे असलेला एक वाळलेला माड अचानक कोसळला व नेमका त्यांच्या डोक्यावर पडला. त्या आघाताने रस्त्यावर पडलेले शेटगावकर रक्तबंबाळ झाले. त्यांना प्रथम १०८ रुग्णवाहिकेने म्हापसा येथील आझिलो इस्पितळात नेण्याचे ठरले; मात्र नंतर त्यांची गंभीर परिस्थिती पाहून त्यांना बांबोळी येथे नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

सुनील गावस्करच सर्वश्रेष्ठ : सोबर्स

मुंबई, दि. ३ : जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज कोण, यावरून सध्या जरी सचिन तेंडुलकर याचा विलक्षण बोलबाला होत असला तरी वेस्ट इंडिजचे महान अष्टपैलू सर गारफिल्ड उर्फ गॅरी सोबर्स यांच्या मते सुनील गावस्कर हाच विश्वातील सर्वोत्तम फलंदाज होय. १९७० च्या दशकात सनीने (सुनीलचे लाडके टोपणनाव) ज्या धैर्याने सलामीला येऊन मायेकल होल्डिंग, अँडी रॉबर्टस्, कॉलिन क्राफ्ट आणि जोएल गार्नर या अक्षरशः आग ओकणाऱ्या चौकडीचा सामना केला त्यास तोड नाही. त्यामुळे मी पाहिलेला सर्वोत्तम फलंदाज कोण, असा प्रश्न मला विचाराल तर झोपेतही माझे हेच उत्तर असेल की, सनी द ग्रेट! १९७१ साली सनीने वेस्ट इंडिजविरुद्ध आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा श्रीगणेशा केला आणि पहिल्याच मालिकेत त्याने आमच्या भात्यातील हवा काढून घेताना १५४.८० अशा डोळे दीपवणाऱ्या सरासरीने तब्बल ७७४ धावांची बरसात केली. १९७१ साली अजित वाडेकर याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विंडिजला त्यांच्या भूमीत जाऊन खडे चारले होते. त्या ऐतिहासिक विजयाच्या सुखद स्मृती आजही जुन्याजाणत्या क्रिकेटप्रेमींच्या काळजात रुंजी घालत आहेत. तेव्हा रेडिओवरून धावते समालोचन ऐकण्यातही आगळा थरार होता. रात्री आठच्या सुमारास समालोचन सुरू व्हायचे आणि रात्री बारापर्यंत ते ऐकवले जायचे. पुढचा भाग दुसऱ्या दिवशी सकाळी ऐकायला मिळायचा. तोसुद्धा क्रिकेटप्रेमी कान देऊन ऐकायचे. ते दिवसच असे मंतरलेले होते. त्या ऐतिहासिक घटनेला चाळीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मुंबईत खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वाडेकर व त्या चमूतील खेळाडूंना गौरवण्यात आले. याप्रसंगी सोबर्स यांना प्रमुख पाहुणे या नात्याने आवर्जून पाचारण करण्यात आले होते. हा कार्यक्रम पार पडल्यावर ७३ वर्षीय सोबर्स यांनी प्रसारमाध्यमांशी सुसंवाद साधताना आपली मते गप्पांच्या ओघात मांडली. ते म्हणाले, सर व्हिव रिचर्डस्, ब्रायन लारा किंवा सचिन तेंडुलकर यांच्यापैकी कोणलाही कमी लेखण्याचा माझा अजिबात उद्देश नाही. आपापल्या जागी ही मंडळी श्रेष्ठ आहेत. पोरसवद्या सनीने जेव्हा विंडिजमध्ये पाय ठेवला तेव्हा मलासुद्धा जाणवले नाही या कोवळ्या मुलात एवढी गुणवत्ता ठासून भरलेली असेल आणि त्याला प्रतिभेचे अलौकिक वरदान लाभले असेल. तथापि, जेव्हा त्याची बॅट बोलू लागली तेव्हा मी थरारून गेलो. समीक्षक किंवा क्रिकेटपटूंना विविध खेळाडूंची परस्परांशी तुलना करण्याचा मोह आवरत नाही. मला अशी तुलना आवडत नाही. ज्या जमान्यात सर डॉन ब्रॅडमन आणि डेनिस क्रॉंप्टन खेळले तो काळ तर आणखी वेगळा होता. जरा कल्पना करा त्या काळी बाऊन्सर्स म्हणजेच उसळत्या चेंडूंच्या संख्येवर मर्यादा नव्हती. षटकातील सर्व चेंडू उसळते किंवा शरीरभेदी असले तरी त्याला मान्यता लाभली होती. फलंदाजाभोवती कितीही खेळाडूंचे कडे केले तरी चालू शकत होते. त्यावरही निर्बंध नव्हते. नोबॉलचे नियमही आजच्यासारखे कडक नव्हते. दिवसभरात ७२ षटकांचा खेळ व्हायचा. हेल्मेट, आर्म गार्ड यासारख्या सुविधांचा पत्ताच नव्हता. खेळपट्ट्या झाकून ठेवण्याची बातच नव्हती. मग मला सांगा अशा परिस्थितीत सनी गावस्करपेक्षा महान फलंदाज कोणी असू शकेल काय? सध्याच्या खेळाडूंबाबत म्हणाल तर मला दिल्लीचा "डॅशिंग' सलामीवर वीरेंद्र सेहवागची हातोडामय फलंदाजी भयंकर आवडते. या दणकेबाज सलामीवीराचे राजेशाही फटके पाहून मला माझ्या फलंदाजीची राहून राहून आठवण येते. त्याच्या नजाकतदार फलंदाजीने साऱ्या जगाला मोहित केले आहे. अशीच दणकेबाज फलंदाजी कधी काळी कृष्णाम्माचारी श्रीकांत करत असे.
सध्याच्या २०-२० क्रिकेटबद्दल ते म्हणाले, मनोरंजन म्हणून हा आगळा प्रकार ठीक आहे. मात्र त्यामुळे कसोटी क्रिकेटचा गळा घोटला जाणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. कारण "कसोटी' हेच क्रिकेटचे खरे सौंदर्य आहे आणि आत्माही!
--------------------------------------------------------------------
महान अष्टपैलू 'सर' गारफिल्ड सोबर्स
खुद्द सोबर्स यांची महती काय आणि कशी वर्णावी? त्यांनी ९३ कसोटी सामन्यांत ८०३२ धावा कुटताना तब्बल २६ शतके ठोकली. त्यांची सरासरी ५८ अशी देखणी आहे. जोडीला त्यांनी २३५ गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. शिवाय त्यांनी अशा क्षणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले की, जेव्हा ते सर्वोच्च स्थानावर होते; जसे पट्टीच्या गवयाला गाणे कधी संपवावे याचे नेमके भान असते. जेव्हा त्यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली तेव्हा त्यांचे जगभरातील हजारो चाहते ढसाढसा रडले. ठरवलेच असते तर सोबर्स यांनी ब्रॅडमन यांचा विक्रम मोडून आणखीही शतके ठोकली असती. म्हणूनच जगातील सर्वोत्तम अष्टपैलू हा किताब त्यांना सन्मानपूर्वक देण्यात आला आणि "सर' ही मानाची पदवीदेखील!

Wednesday 3 March, 2010

पेट्रोल दरवाढीवरून आज संसद दणाणणार

'संपुआ' सरकारच्या कोंडीसाठी विरोधकांची वज्रमूठ
नवी दिल्ली, दि. २ : पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीवरून भारतीय जनता पक्षासह सर्व विरोधी पक्षांनी केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारची संसदेत उद्या (बुधवारी) जबरदस्त कोंडी करण्याची व्यूहरचना आखली आहे. भाजपने आज नवी दिल्लीत महागाईविरोधात भव्य मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व इंद्रकुमार मल्होत्रा यांनी केले होते.
तब्बल चार दिवसांनंतर उद्या संसदेचे कामकाज सुरू होईल. आपली रणनीती पक्की करण्यासाठी सकाळी भारतीय जनता पक्षाने खास बैठकीचे आयोजन केले आहे. तशीच बैठक भारतीय कम्युनिस्ट पक्षानेही आयोजिली आहे. इंधन दरवाढीखेरीज भारतीय जनता पक्षाने अन्नधान्याच्या वाढत्या किमतीवरूनही जोरदार आवाज उठवण्याचे ठरवले आहे.
केंद्र सरकारने या मुद्यावर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे त्याचे आम्ही स्वागतच करतो; मात्र या सरकारने गरिबांची जी फसवणूक चालवली आहे त्याचे काय, असा सवाल भाजपचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी केला. त्यांचा रोख प्रामुख्याने इंधन दरवाढीच्या दिशेने होता. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी या दरवाढीची झळ आम आदमीला बसणार नसल्याचे सूतोवाच केले असले तरी या असल्या तर्कटांवर विश्वास ठेवण्यास भाजप अजिबात तयार नाही. शुक्रवारी केंद्रीय अंदाजपत्रक लोकसभेत सादर केले जात असताना तमाम विरोधकांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे केंद्र सरकार आतून हादरले आहे. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी वरवर जरी आपण या दरवाढीवर ठाम असल्याचे दाखवले असले तरी त्यांनाही विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे आपल्या घोषणेचा नव्याने विचार करावा लागेल, असे चित्र दिसू लागले आहे. त्यातच तृणमूल कॉंग्रेस आणि द्रविड मुन्नेत्र कळहम या "संपुआ'मधीलच मित्र पक्षांनी कॉंग्रेसला घरचा आहेर दिल्यामुळे कॉंग्रेस या मुद्यावर एकाकी पडत चालली आहे. डावे पक्ष, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, तेलगू देसम, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी अशा सर्वांनीच इंधन दरवाढीला कडाडून विरोध दर्शवला आहे. यातील समाजवादी पार्टी आणि राजदने "संपुआ' सरकारला बाहेरून पाठिंबा दिला आहे. बिजू जनता दल आणि जयललिता यांच्या अद्रमुकलादेखील या महागाईविरोधी रणनीतीत सहभागी करून घेण्याचे प्रयत्न प्रमुख विरोधी पक्षांनी सुरू केले आहेत. मात्र, कॉंग्रेसचे प्रवक्ते शकील अहमद यांनी सांगितले की, लोकशाहीत मतभेद असतातच. कॉंग्रेस व मित्र पक्ष यांच्यात फूट पाडण्याचे स्वप्न जरी विरोधक पाहत असतील तरी ते कधीच यशस्वी होणार नाही. अर्थसंकल्पावरील आभारदर्शक ठरावावेळी विरोधकांनी जरी कपात प्रस्ताव आणला तरी तो संमत होणे अशक्य आहे.
तरीही सरकारमध्येच राहू : तृणमूल, द्रमुक
कोलकाता/चेन्नई : केंद्रातील "संपुआ' सरकारने पेट्रोल व डिझेलच्या किमतीत जी वाढ केली आहे ती जनहित लक्षात घेता मागे घेण्यात यावी, अशी मागणी आम्ही केलेली असली तरी या मुद्यावर सरकारमधून बाहेर पडण्याचा आमचा विचार नाही. सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. आम्ही सरकारमध्येच राहू, असे रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल कॉंग्रेस पक्षाने तसेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक या पक्षांनी आज स्पष्ट केले आहे. आम्ही "संपुआ' सरकारमध्ये असून यापुढेही राहू, असे ममता बॅनर्जी यांनी आज कोलकाता येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. आम्हांला कोणत्याही वादात पडावयाचे नाही. लोकशाही पद्धतीत विविध राजकीय पक्षांची विविध मते असतात; त्यामुळेच आमच्या पक्षानेही पेट्रोल व डिझेलसंदर्भात आपले मत व्यक्त केले आहे.
तिकडे तामिळनाडूत चेन्नई येथे द्रमुकचे मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांची मुलगी कानिमोझी यांनीही ममता बॅनर्जी यांच्यासारखेच विचार व्यक्त केले. युती सरकारमध्ये वेगवेगळी मते असू शकतात. परंतु, अशी विरोधाभासी मते व्यक्त झाली म्हणजे सरकारमध्ये फूट पडली, असा याचा अर्थ नाही. अनेक मुद्दे असे आहेत की ते आम्हांला एक ठेवतात आणि हेच महत्त्वाचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आमदार आले बैलगाडी, सायकलवर!
हैदराबाद : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा निषेध करण्यासाठी आज आंध्रप्रदेशातील विरोधी पक्षाच्या आमदारांनी चक्क सायकल आणि बैलगाडीचा वापर करीत विधानसभा गाठली. तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. या अनोख्या आंदोलनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे आमदारही सहभागी झाले होते. त्यांनी हातात आपापल्या पक्षांचा झेंडा घेतला होता. सायकल आणि बैलगाडीवर स्वार होऊन आलेल्या या आमदारांनी केंद्र सरकारला पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. सभागृहात पोहोचल्यानंतरही या आमदारांनी आपली मागणी लावून धरीत कामकाज ठप्प केले.
दुसरीकडे तिरुअनन्तपुरम् येथे भाजप आणि डाव्या पक्षांनी महागाईच्या विरोधात "बंद'चे आवाहन केले होते. या "बंद'मुळे जनजीवन प्रभावित झाले. या आंदोलनाला व्यापारी संघटना आणि व्यावसायिकांनीही पाठिंबा दिला होता.
---------------------------------------------------------------------
दरवाढीवर कॉंग्रेस ठाम
इंधन दरवाढ कमी करण्यास आज झालेल्या कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत नकार देण्यात आला. "संपुआ'च्या अध्यक्ष सोनिया गांधी, पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आदी नेते यावेळी उपस्थित होते. काही मंत्र्यांचा तसेच घटक पक्षांचा विरोध असला तरी ही दरवाढ अटळ असल्याचे समर्थन कॉंग्रेस पक्षाने केले आहे.

'जी-७' गटाचा मुख्यमंत्र्यांना सणसणीत दम

'जी-७' व प्रदेश कॉंग्रेसच्या ओढाताणीत
मुख्यमंत्री कामत यांची अभूतपूर्व कोंडी

पणजी, दि. २ (प्रतिनिधी): "ग्रुप ऑफ सेव्हन' अर्थात "जी -७'च्या एकाही मंत्र्याला हात लावायचे धाडस कराल तर पस्तावाल! आणि यदा कदाचित तसा प्रयत्न झालाच तर हा गट सरकारला पाठिंबा देण्याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यास मोकळा असेल, असा सणसणीत दम "जी- ७' गटाने मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना भरला. या गटाच्या एकाही सदस्याच्या विकासकामांत कोणताही अडथळा येता कामा नये किंवा त्यांना कोणत्याही कामांत आर्थिक कमतरता भासता कामा नये, अशी तंबीच या गटाने दिली. दरम्यान, सरकारांतर्गत प्रदेश कॉंग्रेस व कॉंग्रेसेतर असे दोन गट निर्माण झाल्याने या दोन्ही गटांना सामोरे जाताना मुख्यमंत्री कामत यांची मात्र त्रेधातिरपीट उडालेली असून त्यांची विलक्षण कोंडी झाली आहे.
"ग्रुप ऑफ सेव्हन' या नावाखाली एकत्रित झालेल्या कॉंग्रेसेतर नेत्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या सरकारी निवासस्थानी झाली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते तथा पर्यटनमंत्री मिकी पाशेको, महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा, आमदार नीळकंठ हळर्णकर, मगोचे नेते वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर व आमदार दीपक ढवळीकर, आरोग्यमंत्री विश्वजित राणे व शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर लगेच सव्वा दोन वाजता या सातही जणांनी थेट मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या सरकारी बंगल्यावर धडक देऊन त्यांची भेट घेतली. तिथे सुमारे चाळीस मिनिटे चाललेल्या प्रदीर्घ बैठकीत अलीकडेच घडलेल्या शपथविधी सोहळ्याचे पडसाद उमटल्याचीही खबर आहे. त्या विषयावरून या गटाने मुख्यमंत्र्यांना खडे बोल सुनावल्याची खबरही सूत्रांनी दिली. कामत यांनी या गटात फूट पाडण्यासाठी वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांना डच्चू देऊन कुंभारजुव्याचे आमदार पांडुरंग मडकईकर यांची मंत्रिपदी वर्णी लावण्याचा घाट घातला होता. मात्र, आता यापुढे अशा प्रकारची कोणतीही शक्कल लढवल्यास ती अजिबात सहन केली जाणार नाही. या गटाचा पूर्ण पाठिंबा कॉंग्रेसला असेल; पण जर का या गटातील एकाही मंत्र्याला हात लावण्याचा प्रयत्न झाला तर तो अजिबात सहन करणार नाही व तसे घडल्यास पुढील सर्व घडामोडींस मुख्यमंत्रीच जबाबदार असतील, अशी गर्भित धमकीच या गटाने मुख्यमंत्र्यांना दिली असल्याचे कळते.
या गटाने आपले श्रेष्ठी म्हणून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नेतृत्व मान्य केले आहे. शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून ढवळीकरांवरील गंडांतर टाळल्याने आता या गटालाही हत्तीचे बळ चढले आहे. पवार यांनी केलेल्या सुतोवाचाची जाणीव मुख्यमंत्र्यांना करून देण्यासाठीच ही भेट घेतली गेल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी अधिक स्पष्टपणे बोलण्याचे टाळले. "जी-७' हा गट एकसंध आहे व या गटाचा कॉंग्रेस सरकारलाच पाठिंबा राहील, असे सांगण्यासाठीच गटाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे ते म्हणाले. वाहतूकमंत्री ढवळीकर यांनी मात्र या गटातील एकाही मंत्र्याला हात लावायला मिळणार नाही हे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसमोर स्पष्ट केल्याचे सांगितले. आरोग्यमंत्री विश्वजित राणे व शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी मात्र याप्रसंगी पत्रकारांशी बोलण्याचेच टाळले.
आपले कुटुंबच आध्यात्मिक
वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या पत्नी ज्योती ढवळीकर यांचा संबंध सनातन संस्थेशी आहे. मडगाव बॉंबस्फोट प्रकरणात त्यांना गोवण्याचे कारस्थान सरकार दरबारी सुरू आहे व त्यावरूनच ढवळीकर यांचेही मंत्रिपद काढून घेण्याची शक्कल कॉंग्रेसने लढवली होती, अशीही खात्रीलायक माहिती मिळाली आहे. ढवळीकर यांच्या पत्नीबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेकडेही कागदपत्रे सोपवण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सुदिन ढवळीकर यांना यासंबंधी विचारले असता, त्यांनी आपल्या पत्नीबाबत पसरलेल्या वृत्तांबाबत आपल्याला काहीच माहीत नाही, असे सांगितले. आपले कुटुंब पूर्वापारपासून म्हणजेच गेली साडेतीनशे वर्षे आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहे. आपली पत्नी आध्यात्मिक प्रवचने देते व कार्यक्रमांतही सहभागी होते. कुटुंबाची हीच परंपरा सध्या सुरू आहे व यापुढेही सुरू राहील, असेही ते म्हणाले. दरम्यान, सुदिन ढवळीकर यांचे प्रतिस्पर्धी गृहमंत्री रवी नाईक यांच्या इशाऱ्यावरच हा प्रकार सुरू आहे, असेही उघडपणे बोलले जात आहे. पण त्याबाबत आपल्याला काहीही खबर नाही, असे ते म्हणाले.

...आणि पेडणे पोलिसांनी पत्रादेवी चेकनाका गुंडाळला

पणजी, पेडणे दि. २ (प्रतिनिधी): राज्याच्या सीमांवर असलेल्या पोलिस चेकनाक्यांवर वाहतूकदारांची पोलिसांकडूनच होणारी लुबाडणूक लक्षात घेऊन सरसकट वाहने अडवून तपासणी न करता एखाद्या वाहनासंदर्भात खास माहिती मिळाल्यावर किंवा संशयित वाहनांचीच तपासणी केली जावी, असा स्पष्ट आदेश आज पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांनी काढला. परंतु, पत्रादेवी येथे असलेल्या चेकनाक्यांवरील पोलिसांनी या आदेशाचा चुकीचा अर्थ काढत सरळ चेकनाकाच गुंडाळला. ही चूक लक्षात येईपर्यंत तब्बल चार तास पत्रादेवी चेकनाक्यावर कोणत्याही वाहनाची तपासणी झाली नाही. दरम्यान, हा प्रकार लक्षात येताच उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी सदर चेकनाका पूर्ववर सुरू करण्याचा त्वरित आदेश दिला.
राज्याच्या सीमांवर असलेल्या चेकनाक्यांवर शेजारील राज्यांतून वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडून पैसे आकारून त्यांना प्रवेश दिला जात असे. यातून एका महिन्याला हजारो रुपयांचा गल्ला उभा केला जात होता. अनेक वेळा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या चेकनाक्यांवर छापा टाकून पैसे जप्त केले आहेत. तसेच, काही पोलिस शिपाई आणि हवालदारांनाही निलंबित करण्याची कारवाई केली आहे.
पत्रादेवी चेक नाक्यावरील गोंधळासंदर्भात पेडणे पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई व उपअधीक्षक सॅमी तावारीस यांना विचारले असता "वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चेकनाक्यावरील पोलिस हालवण्यात आहे'' असे त्यांनी सांगितले. पत्रादेवी येथील पोलिस चेकनाका दिवसेंदिवस वादग्रस्त ठरत होता.
एकच चर्चा
आज २ मार्च रोजी सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने या चेकनाक्यावर अचानक धाड घालून तपासणी केल्याची चर्चा या भागातून ऐकायला मिळत होती. मात्र अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. या विषयी निरीक्षकांना विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.
उत्तर गोव्यातील महाराष्ट्रात येण्या-जाण्यासाठी ही प्रमुख गेट आहे. पत्रादेवी येथील मुख्य चेकनाका गेट हटवल्यास भविष्यात बेकायदा कारवाया, दारूची बेकायदा वाहतूक, स्फोटक पदार्थ आदींची वाहतूक बिनधास्त होण्याची शक्यता आहे. दहशतवादी कारवाया करणारे संशयित राज्यात सहज प्रवेश करतील अशी भीतीही व्यक्त होते आहे.
----------------------------------------------------------------
गृहमंत्र्यांनी लक्ष घालावे: बाबू
पंचायतमंत्री बाबू आजगांवकर यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना गृहमंत्री रवी नाईक यांनी जातीने लक्ष घालून पत्रादेवी नाका पूर्ववत कार्यरत करण्याची मागणी केली. चेकनाका बंद करणे म्हणजे गैर कारवायांना प्रोत्साहन देण्यासारखे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
२ मार्चपासून चेक नाका बंद करण्यापूर्वी मागच्या ३ महिन्यांपासून पत्रादेवी पोलिस चौकीही बंद करण्यात आली होती.

'ती मी नव्हेच'

वादग्रस्त लेख आपण लिहिला
नसल्याचा तस्लिमाचा दावा

बंगळूर, दि. २ : वादग्रस्त बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांच्या लेखावरून कर्नाटकमध्ये वादंग उसळले असताना, तो वादग्रस्त लेख आपण लिहिलेलाच नाही, असा खुलासा तस्लिमा यांनी केला आहे. कर्नाटकातील वृत्तपत्रात माझ्या नावाने प्रसिद्ध झालेला लेख मी लिहिलेलाच नाही. माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी तसेच जातीय विद्वेष वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक हे लिखाण प्रसिद्ध करण्यात आले असल्याचा आरोप तस्लिमाने केला आहे.
तस्लिमाच्या वादग्रस्त लेखावरून कर्नाटकातील शिमोगा आणि हसन शहरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. परंतु तो लेख आपण लिहिलेलाच नसल्याचा खुलासा तस्लिमाने आज प्रसिद्धीपत्रक काढून केला. कर्नाटकात सोमवारी ज्या घटना घडल्या, त्यामुळे मला धक्का बसला आहे. मला असे कळले की, कर्नाटकातील एका वृत्तपत्राने छापलेल्या माझ्या एका लेखावरून हा हिंसाचार उसळला. परंतु माझ्या संपूर्ण आयुष्यात मी कधीच कर्नाटकातील वृत्तपत्रासाठी लिखाण केलेले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
माझ्या कोणत्याही लेखात प्रेषित मोहम्मद हे बुरख्याच्या प्रथेच्या विरोधात होते, असे मी कधीही लिहिलेले नाही. त्यामुळे वृत्तपत्रातील लेख हा तोडून मोडून लिहिलेला आहे. माझी प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न पद्धतशीरपणे सुरू आहेत. समाजात जाणीवपूर्वक विद्वेष पसरवण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असेही तस्लिमा यांनी म्हटले आहे.

नव्या कॅसिनो जहाजांना मांडवी नदीत प्रवेश नको

सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर
उच्च न्यायालयाकडून ताशेरे

पणजी, दि. २ (प्रतिनिधी): मांडवी नदीत असलेल्या सहा तरंगत्या कॅसिनोंमुळे अन्य जहाज वाहतुकीला त्रास होत असल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य सरकार एका बाजूने सादर करते आणि दुसऱ्या बाजूने नवीन कॅसिनोला मांडवी नदीत प्रवेश करण्यासाठी परवानगी देते. सरकारच्या या दुटप्पी धोरणावर कडक ताशेरे ओढत यापुढे मिरामार ते मांडवी पूल या पट्ट्यात कोणत्याही नवीन तरंगत्या कॅसिनोला परवानगी देऊ नका, असा स्पष्ट आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला.
नवीन दाखल झालेल्या या जहाजाला आधीच आग्वादच्या खाडीत का पाठवले नाही, असाही प्रश्न यावेळी करण्यात आला. यावेळी सरकारकडून न्यायालयाला समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याने याविषयीची याचिका निकालात काढली जात नाही तोवर अन्य कोणत्याही कॅसिनोला परवानगी देऊ नका, असा स्पष्ट आदेश आज गोवा खंडपीठाने दिला.
नुकताच "गोवन सॉर्त' हा तरंगता कॅसिनो मांडवी नदीच्या पात्रात दाखल झाला असून त्याला मधोमध जागा देण्यात आली आहे. आठ दिवसांपूर्वी हे जहाज याठिकाणी दाखल झाले असले तरी त्याला दोन वर्षांपूर्वी परवानगी देण्यात आली होती, अशी माहिती यावेळी ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांनी न्यायालयाला दिली. दोन वर्षांपूर्वी परवानगी दिली असली तरी, ही परवानगी कॅसिनो जहाजाला मांडवी नदीत नांगर टाकण्यासाठी दिली होती का, असा सवाल यावेळी खंडपीठाने केला. त्यावर कोणतेही समाधानकारक उत्तर सरकारकडून मिळाले नाही. सध्या मांडवी नदीत असलेल्या पाच कॅसिनो जहाजांना राज्य सरकारने आग्वादच्या खाडीत जाण्याचे आदेश दिले आहेत. तर, या आदेशाला कॅसिनो कंपन्यांनी आव्हान दिले असून त्या ठिकाणी जाण्यास स्पष्ट नकार दर्शविला आहे.
गेल्यावेळी राज्य सरकारने मांडवी नदीत असलेल्या कॅसिनो कंपन्यांकडून राज्य सरकारला भरपूर महसूल मिळत असल्याने त्यांना दिलेले परवाने रद्द करण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले होते.

समर्पित वृत्ती व अविरत श्रमानेच 'सारस्वता'ची शतकपूर्ती सफल

राज्यपालांचे गौरवोद्गार
म्हापसा, दि. २ (प्रतिनिधी): ज्ञान देण्याबरोबरच मुलांमध्ये प्रामाणिकपणा, शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्त्वगुण निर्माण करण्यात शिक्षकांची भूमिका फार मोठी आहे. आपल्याला ज्ञान देणाऱ्या समाजाप्रति असलेल्या बांधिलकीची जाणीव ठेवून मुलांनी आपली जबाबदारी पार पाडावी, विघातक शक्तींशी लढा देत असतानाच आपले चारित्र्य घडविण्यावरही भर द्यावा, असे आवाहन आज राज्यपाल एस.एस.सिद्धू यांनी आज येथे केले. सारस्वत विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यानिमित्त ते बोलत होते. उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संस्थेने शतकापर्यंत यशस्वी वाटचाल केल्यामागे ज्यांचे अविरत प्रयत्न आणि समर्पित वृत्ती आहे, ते सर्वजण अभिनंदनास पात्र आहेत असे सिद्धू म्हणाले. गोव्याला चांगली शैक्षणिक व्यवस्था लाभली आहे. पूर्वप्राथमिक ते विद्यापीठ पातळीपर्यंतचे शिक्षण या प्रदेशात उपलब्ध असले तरी त्याचा दर्जा वाढविण्याची गरज आहे,असे त्यांनी सांगितले. सध्याचे जग हे एक गाव बनले आहे, जेथे सर्वोत्तम असेल तेच चालते, यासाठी मानवी विकासासाठी आवश्यक असे चांगले शिक्षण मिळायला हवे, तरच आपण देशपातळीवर व जागतिक आव्हानांना सामोरे जाऊ शकू,असे सिद्धू पुढे म्हणाले.
विभक्त कुटुंब, आश्रम, मंदिरे यामधून पूर्वी शिक्षणाचे, संस्कृतीचे धडे दिले जात असत. आज ती स्थिती राहिलेली नाही, आता मिळते ते केवळ पुस्तकी शिक्षण. मात्र सारस्वत विद्यालयातून जी मुले बाहेर पडतात ती पुस्तकी ज्ञानाबरोबरच अनुभवाचे ज्ञानही मिळवून समाजात येतात. संस्था निर्माण करणे व ती शंभर वर्षे चालविणे हे काम अवघड आहे.सारस्वत विद्यालयाने दशकपूर्ती करून एक ऐतिहासिक टप्पा पार केला आहे,असे गौरवोद्गार खासदार श्रीपाद नाईक यांनी काढले. यावेळी व्यासपीठावर सारस्वत विद्यालयाचे अध्यक्ष विवेक केरकर, डॉ.दिपक गायतोंडे, सुरेश कोलवाळकर, गिरीश भरणे आदी मान्यवर उपस्थित होते. सोहळा समितीचे अध्यक्ष सुरेश कोलवाळकर यांनी प्रास्ताविक केले. श्रुती कामत दलाल यांनी सूत्रनिवेदन केले, तर विवेक केरकर यांनी आभार मानले.
आज सकाळी सारस्वत विद्यालयाच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी शहरातून प्रभातफेरी काढली. संध्याकाळी मुख्य सोहळ्यानंतर विद्यार्थ्यांनी नृत्याचा कार्यक्रम सादर केला.

आता गृहमंत्रालय देणार संगीत पार्ट्यांना परवाने!

पणजी, दि. २ (प्रतिनिधी): राज्यातील किनारपट्टीवर आणि सार्वजनिक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यासाठी आवश्यक परवाने देण्याचा जिल्हा प्रशासनाचा अधिकार गृहमंत्रालयाने एका आदेशाद्वारे आज काढून घेतला असून यापुढे हे आदेश गृहखात्यातूनच दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या या आदेशाचे समर्थन करताना, पार्ट्यांमध्ये सर्रासपणे होत असलेल्या अमली पदार्थांच्या वापराला लगाम घालण्यासाठीच सदर आदेश देण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
पारंपरिक लोकनृत्य आणि महोत्सव तसेच विवाहादी प्रसंगांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. मात्र, संगीत पार्ट्यांसारख्या कार्यक्रमांसाठी आता संबंधितांना गृहमंत्रालयाकडून परवानगी घ्यावी लागणार असल्याचे या आदेशात अवर सचिव सिद्धिविनायक नाईक यांनी म्हटले आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी व अमली पदार्थांच्या वापरावर प्रतिबंध यावा यासाठी सदर आदेश देण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हे आदेश आत्तापर्यंत अशा कार्यक्रमांना परवानगी देत असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे आता असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संबंधितांना थेट गृहमंत्रालयाचा उंबरठा झिजवावा लागणार आहे. राज्य सरकारने हा निर्णय नुकत्याच अमली पदार्थांमुळे घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे. अशा पार्ट्यांना वा कार्यक्रमांना परवानगी जरी उपजिल्हाधिकाऱ्यांकडून दिली जात असली तरी एखादी घटना घडल्यास त्यास विधानसभेत उत्तर देण्याची पाळी गृहमंत्रालयावर येत असे. विरोधी पक्षाने किनारी भागांत वाढत चाललेल्या अमली पदार्थाच्या व्यवसायाविषयी सरकारला वेळोवेळी चांगलेच धारेवर धरले होते. दरम्यान, गृहमंत्रालयाच्या या आदेशामुळे अनेकांची चिरीमिरी बंद होणार असल्याचीही चर्चा आहे.

डॉ. कलाम, रतन टाटा सर्वांत विश्वासार्ह!

'रीडर्स डायजेस्ट'ने केलेल्या पाहणीतील निष्कर्ष
नवी दिल्ली, दि. २ : देशातील सर्वांत विश्वासार्ह व्यक्ती कोण, असा प्रश्न जर उपस्थित झाला तर प्रत्येकाचे उत्तर आपल्या विवेकबुद्धीला स्मरून वेगवेगळे असेल. येथील "रीडर्स डायजेस्ट'या प्रकाशन संस्थेने केलेल्या पाहणीनुसार माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व टाटा उद्योग समूहाचे प्रमुख रतन टाटा हे सर्वाधिक विश्वासार्ह व्यक्ती ठरले आहेत. वादग्रस्त चित्रकार मकबूल फिदा हुसेन व उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री श्रीमती मायावती यांना या यादीत ९१ वा क्रमांक मिळाला आहे. विद्यमान पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना सातवा तर विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याला सहावा क्रमांक मिळाला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आठव्या तर नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन, विप्रो उद्योग समूहाचे प्रमुख अझीम प्रेमजी व इस्त्रोचे चेअरमन एम. माधवन नायर यांना या यादीत संयुक्तरीत्या दहावे स्थान मिळाले आहे. कॉंग्रेसचे युवा नेते राहुल गांधी २९ व्या स्थानावर आहेत. "रीडर्स डायजेस्ट'ने आपल्या चालू महिन्याच्या आवृत्तीत ही यादी प्रसिद्ध केली आहे. धडाडीच्या माजी पोलिस अधिकारी किरण बेदी यांना या यादीत तिसरे, इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांना चौथे, संगीतकार ए. आर. रेहमान यांना पाचवे व जगप्रसिद्ध हास्यचित्रकार आर. के. लक्ष्मण यांना नववा क्रमांक मिळाला आहे.
यासंदर्भात आम्ही पाच हजार जणांची मते मागवली होती. त्यातील ७६१ जणांनी आपली मते नोंदवली आणि त्यानुसार ही यादी तयार करण्यात आली, अशी माहिती "रीडर्स डायजेस्ट'चे संपादक मोहन शिवानंदन यांनी मुंबईहून फोनवरून दिली. क्रिकेट हा देशातील सर्वांत लोकप्रिय खेळ असला तरी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला ४२ व्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. त्यापेक्षा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याने २५ वे स्थान मिळवून अचूक "नेमबाजी' केली आहे. टेनिसपटू तथा मॉडेल म्हणून प्रसिद्ध असलेली सानिया मिर्झा थेट ८१ व्या क्रमांकावर ढकलली गेली आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना ९४ वा, रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांना ९६ वा तर केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना चक्क ९७ वा क्रमांक मिळाला आहे. त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांना शेवटून दुसरा म्हणजे ९९ वा क्रमांक मिळाला आहे! आयपीएलचे सर्वेसर्वा ललित मोदी यांना ९३ व्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार अमिताभ बच्चन याला १४ वा तर आमीर खान याला १८ वा क्रमांक मिळाला आहे. टीव्ही कॉमेडियन जसपाल भट्टी यांना ४३ वा, पटकथा लेखर जावेद अख्तर यांना ४६ वा, शाहरूख खानला ५३ वा, सुष्मिता सेनला ६४ वा, कमल हसनला ७१ वा, दिग्दर्शक अनुराग कश्यप याला ७८ वा, मल्याळी अभिनेता मोहन लाल याला ८० वा, ऐश्वर्या राय बच्चनला ८२ वा तर टीव्ही मालिकांची निर्माती एकता कपूर हिला थेट ९५ वा क्रमांक मिळाला आहे. रजनीकांतने या यादीत ६७ वे स्थान मिळवले आहे. राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील यांना ६७ वा, नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष मॉंटेकसिंग अहलुवालिया यांना ४१ वा, केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना ५० वा, कादंबरीकार खुशवंतसिंग यांना ५१ वा पर्यावरणवादी आर. के. पचौरी यांना ६१ वा, श्रीमती सोनिया गांधी यांना ७२ वा तर केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांना थेट ७३ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरूर यांचा क्रमांक आहे ८३, आता बोला..!

पंचवाडीतील खारफुटीची कत्तल करण्याची तयारी

वनखात्याच्या हस्तक्षेपाची
बचाव समितीकडून मागणी

पणजी, दि. २ (प्रतिनिधी): पंचवाडी गावात होऊ घातलेल्या खनिज कंपनीच्या "विजर खाजन' बंदर प्रकल्पाच्या जागेतील खारफुटीची कत्तल करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती पंचवाडी बचाव समितीने दिली आहे. या जागेची पाहणी करण्यासाठी कंपनीतर्फे काही लोक याठिकाणी आले होते व त्यांनी ही खारफुटी नष्ट करण्याचे ठरवल्याने राज्य सरकारच्या वनखात्याने तात्काळ हस्तक्षेप करून हा प्रकार रोखावा, अशी मागणी समितीने केली आहे.
पंचवाडी गावात सध्या एका खनिज कंपनीच्या नियोजित कोडली ते पंचवाडी खनिज रस्ता व विजर खाजन बंदर प्रकल्पावरून वातावरण बरेच तापले आहे. कंपनीकडून काही लोकांना हाताशी धरून या प्रकल्पाला समर्थन मिळवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असतानाच या प्रकल्पामुळे पंचवाडी गावच नष्ट होईल, या भीतीने पंचवाडी बचाव समितीही चिंतीत आहे. राज्य सरकारच्या महसूल खात्याने या खाजगी प्रकल्पासाठी सरकारच्यावतीने सार्वजनिक प्रकल्पाच्या नावाने भूसंपादन केले व अत्यंत कवडीमोल दराने पंचवाडीवासीयांच्या जमिनी खरेदी करण्याचाही प्रकार घडला आहे. मुळात गावाबाहेर स्थायिक झालेल्या व प्रत्यक्षात या प्रकल्पात जागा न जाणाऱ्या लोकांकडूनच या प्रकल्पाचे समर्थन केले जात असल्याचे समितीने म्हटले आहे. काही लोकांना कंपनीतर्फे ट्रक व्यवसाय व इतर रोजगाराची आमिषे दाखवण्यात आल्याने त्यांच्याकडून कंपनीची तळी उचलून धरण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशात खारफुटीच्या रक्षणाबाबत ठोस निर्देश दिले असतानाही आता छुप्या मार्गाने येथील खारफुट नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत,अशी खबर समितीने दिली आहे. या प्रकरणाची वनखात्याने तात्काळ दखल घ्यावी व हा प्रयत्न हाणून पाडावा, असे आवाहनही समितीतर्फे करण्यात आले आहे.

Tuesday 2 March, 2010

...तर मंत्र्यालाही अटक करा!

ड्रग माफिया 'डुडू' प्रकरणात
आग्नेल फर्नांडिस यांची मागणी

पणजी, दि. १ (प्रतिनिधी): डेव्हिड द्रिहाण ऊर्फ"डुडू' या आंतरराष्ट्रीय ड्रग माफियाला संरक्षण देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ अटक करा अशी संतप्त मागणी कळंगुटचे आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी केली असून जर "डुडू' याला एखाद्या मंत्र्याकडून संरक्षण दिले जात असल्याचे तपासात आढळून आले तर त्या मंत्र्यालाही त्याच कलमानुसार अटक करण्यात यावी अशी आक्रमक भूमिकाही त्यांनी घेतली आहे.
गोव्याच्या किनारी भागांत व खास करून कळंगुट व कांदोळी भागांत चालणाऱ्या अंमलीपदार्थ व्यवहारांविरुद्ध आवाज उठवणाऱ्या श्री. फर्नांडिस यांनी "डुडू' प्रकरणी सध्या आक्रमक पवित्रा घेतला आहे. "गोवा अमली पदार्थांचा अड्डा बनण्यात "डुडू'सारख्या ड्रग माफियाएवढेच त्याला संरक्षण देणारे पोलिस आणि राजकारणीही जबाबदार असून सहआरोपी म्हणून "त्या' तिन्ही पोलिसांना अटक केली जावी, असे श्री. फर्नांडिस "गोवादूत'शी बोलताना म्हणाले. आत्तापर्यंतच्या पोलिस तपासात एक पोलिस निरीक्षक आणि दोन पोलिस हवालदार "डुडू' याच्याशी घनिष्ठ संबंध ठेवून होते आणि पोलिस खात्याची गुप्त माहिती त्याच्यापर्यंत पोहोचवत होते, अशी माहिती उघडकीस आली आहे. दोन वर्षापूर्वी "डुडू' याला अटक करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याने काढलेल्या एका आदेशाची प्रतही "डुडू' याच्या बंगल्यावर आढळून आली होती. त्यामुळे सध्या या प्रकरणी चांगलाच वाद निर्माण झाला आहे. त्या अनुषंगाने कळंगुटचे सत्ताधारी आमदार बोलत होते.
अमली पदार्थ व्यवसायामुळे किनारपट्टी क्षेत्रातील तरुणांची स्थिती एकदम बिकट झाली आहे. त्यांना व्यसनाधीन करण्यात आले आहे. "इझी मनी'च्या नावाखाली अनेक तरुण नकळत या व्यवसायात ओढले जात आहेत. गेल्या दोन वर्षांपासून आपण विधानसभेत या घातक व्यवसायाविरोधात आवाज उठवत आहोत. परंतु, या संदर्भात कोणतीही शासकीय यंत्रणा ठोस पावले उचलायला तयारच नसल्याची खंत यावेळी आमदार फर्नांडिस यांनी व्यक्त केली.
पोलिस संरक्षण मिळाल्याशिवाय कोणताही अनैतिक धंदा चालू शकत नाही. पोलिसांच्या मदतीनेच "डुडू'ने गेली बारा वर्षे अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात तस्करी केली आहे. एका बाजूने राज्याचे गृहमंत्री गोव्यात अमली पदार्थ नसल्याचे वक्तव्य करतात आणि दुसरीकडे किनारपट्टी क्षेत्रात ड्रग्सचा व्यवसाय दिवसेंदिवस फोफावत असल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. यातला विरोधाभास अनाकलनीय असल्याचे ते म्हणाले. पोलिस खात्याने केवळ पोकळ वल्गना करून गप्प न बसता "डुडू'ला पकडण्यासाठी दाखवलेली हिंमत आजही राजरोसपणे अमली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या अशा कित्येक "डुडू'ना जेरबंद करण्यासाठी दाखवावी, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या व्यवसायात प्रचंड पैसा असल्याने पोलिस अशा ड्रग माफियांच्या सहज आहारी जातात. त्यासाठी ते केवळ छोट्या मोठ्या माशांना अटक करून आपण कारवाई करीत असल्याचे भासवतात. गेल्या काही वर्षात अमली पदार्थ विरोधी पथकाने केवळ नेपाळी व्यक्तींना अटक करून केवळ तीच व्यक्ती अमली पदार्थाचा व्यवसाय करीत असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ही व्यक्ती कोणत्या ड्रग माफियांना हा ड्रग पुरवण्यासाठी आली होती, किंवा कुठून हा अमली पदार्थ आणला होता, याचा कोणताही तपास त्यांनी केला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काही प्रकरणात तर, पकडण्यात आलेले "ड्रग्स' बनावट असल्याचेही सिद्ध झाले आहे. त्यामुळे अमली पदार्थ विरोधी पथकात अनेक त्रुटी असल्याचे त्यांनी सांगितले.

'जी सेव्हन'च्या डावपेचांमुळे प्रदेश कॉंग्रेसमध्ये तीव्र संताप

..मुख्यमंत्री फिके पडत असल्याचा ठपका
..कामत सरकारची शेंडी पवारांच्या हाती!

पणजी, दि. १ (प्रतिनिधी): विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारवर पूर्ण वर्चस्व प्राप्त करून आपल्या इशाऱ्यावर हे सरकार चालावे, याची व्यवस्थित मांडणी "ग्रुप ऑफ सेव्हन' अर्थात "जी-७' गटाने केली असून महाराष्ट्राप्रमाणे आता गोव्यातही कॉंग्रेसप्रणित सत्तेचा लाभ उठवून कॉंग्रेसलाच नामोहरम करण्याची व ते करताना आपले वर्चस्व वाढविण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसची ही योजना असल्याचे समजते. सरकारवर आपले वर्चस्व कायम ठेवताना पुढील विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या दृष्टीनेही त्यांचा प्रवास सुरू असल्याचे खात्रीलायकरीत्या कळते. या डावपेचांमुळे मात्र प्रदेश कॉंग्रेसची कोंडी होत असून "जी - ७' गटाच्या डावपेचांबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकरही या हालचालींनी त्रस्त झाले आहेत.
कॉंग्रेसप्रणित सरकारात सत्ता भोगायची परंतु, नेतृत्व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे मान्य करायचे. ते करताना कॉंग्रेसला सतत दबावाखाली ठेवून सरकारचे तारू आपल्या शिडानुसार पुढे हाकायचे अशी ही एकंदर योजना आहे. "जी - ७' गटाचा दबाव झुगारण्यासाठी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मंत्रिमंडळातून ढवळीकर यांचा पत्ता कापण्याची तयारी केली आणि नव्या मंत्र्याच्या रूपात कुंभारजुव्याचे आमदार पांडुरंग मडकईकर यांचा शुक्रवारी शपथविधी करण्याचे जवळपास निश्चित केले तेव्हा दबावाचा प्रभाव काय असतो हे शरद पवार यांच्या माध्यमातून या गटाने दाखवून दिले. "ढवळीकर हे आमच्या गटातले आहेत आणि त्यांना हात लावण्याचा प्रयत्न कराल तर सरकार घालवून बसाल', अशी सणसणीत तंबी शरद पवार यांनी दिली काय आणि कामत यांचे उधळलेले घोडे क्षणात जमिनीवर आले काय? याचा चांगलाच अनुभव या निमित्ताने सर्वांनी घेतला. कामत यांनी यावेळी घेतलेली माघार "जी - ७' ला इतका आत्मविश्वास देऊन गेली आहे की आज मनात आणले तर विद्यमान सरकारला केव्हाही घरी बसवता येते याची स्पष्ट जाणीव त्यांना झालेली आहे. त्या अर्थाने कामत यांच्या सरकारची शेंडी खऱ्या अर्थाने "जी - ७' च्या अर्थात अर्थात शरद पवारांच्या हाती आली आहे.
खरे तर कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर व हळदोण्याचे आमदार ऍड. दयानंद नार्वेकर यांना मंत्रिमंडळात समावेश करण्यास कॉंग्रेस श्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखवला होता. पण या दोघांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर व शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्यावर येऊ घातलेले गंडांतर मात्र शरद पवार यांनी दिलेल्या गर्भित धमकीमुळे टळले हीच वस्तुस्थिती आहे. कॉंग्रेस श्रेष्ठींचा हिरवा कंदील गोव्यातील कॉंग्रेस आघाडी सरकारसाठी लाल बत्ती ठरू शकेल, असे सुतोवाच पवार यांनी केल्याने ऐनवेळी शपथविधी सोहळ्याची तयारी करूनही मुख्यमंत्री कामत यांना माघार घेणे भाग पडले. मात्र मडकईकर "फियास्को'चे खापर पुन्हा मुख्यमंत्री कामत यांच्यावरच फोडले जात असल्याने सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, अशी त्यांची स्थिती झाली आहे.
कॉंग्रेस विधिमंडळ गट व प्रदेश कार्यकारिणी यांचा मगोचे आमदार तथा वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांना तीव्र विरोध आहे. पण "जी-७' च्या मदतीने ढवळीकर यांनी आपले स्थान बळकट करून कॉंग्रेसला चांगलीच चपराक दिली आहे. विद्यमान "जी-७' गटाने नेतृत्व बदलाच्या मागणीवर ठाम राहण्याचे ठरवले असले तरी यासाठी आता त्यांनी खुद्द कॉंग्रेस आमदारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून दिगंबर कामत यांच्यावर शरसंधान करण्याचे ठरविले आहे. नेतृत्व बदलाचा निर्णय हा कॉंग्रेस श्रेष्ठींनी घ्यावयाचा आहे, त्यामुळे त्यात हस्तक्षेप करू इच्छित नाही, अशी साळसूद भूमिका आता या गटाने घेतली असल्याने नेतृत्व बदलात "जी - ७' ला "इंटरेस्ट' नाही हे त्यांचे म्हणणे खोडून काढणेही मुख्यमंत्री कामत यांना शक्य नाही. त्या संदर्भात "जी - ७' वर थेट दोषारोपही करता येत नाही. काल परवापर्यंत नेतृत्व बदलावर ठाम असलेले आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनीही आता या विषयावर "डिप्लोमॅटिक' विधाने करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, "जी-७' गटाच्या संपर्कात आणखीनही काही कॉंग्रेस आमदार आहेत; त्यांच्या मदतीने कामत यांचे पाय खेचण्याचेही प्रयत्न केले जाणार असल्याचे समजते. कॉंग्रेस व भाजप यांना पर्याय म्हणून राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी स्थापन करणे हा सुद्धा या राजकारणाचा भाग असून या नव्या योजनेचा सर्वांत जास्त फटका कॉंग्रेसला बसणार असल्याने सध्या प्रदेश कॉंग्रेसमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, या नव्या राजकीय समीकरणांमुळे कॉंग्रेसच्या भवितव्याच्या दृष्टीने दिगंबर कामत यांचे नेतृत्व फिके पडत असल्याचे कॉंग्रेसमध्ये ठाम मत बनत चालले असल्याने आता त्यांच्याकडूनही नेतृत्व बदलाची मागणी पुढे आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे समजते.

पेडणे किनारी भागांत स्थानिक बनले गुलाम

विदेशी नागरिकांच्या मनमानीपणाकडे
प्रशासकीय अधिकाऱ्यांचा कानाडोळा

पणजी, दि. १ (प्रतिनिधी): पेडणे तालुक्यातील मोरजी, मांद्रे, हरमल व केरी भागांत विदेशी नागरिकांच्या वर्चस्वाला प्रशासकीय अधिकाऱ्यांचा लाळघोटेपणा जेवढा कारणीभूत आहे तेवढाच भूखंड विक्री व पर्यटनामुळे स्थानिक लोकांसाठी निर्माण झालेल्या व्यवसायाच्या व रोजगाराच्या संधी याही जबाबदार आहेत. मोरजीतील टॅक्सीचालक रोहिदास शेटगांवकर यांच्या मृत्यूमुळे मोरजीवासीयांनी विदेशींविरोधात व विशेषतः रशियन नागरिकांच्या दादागिरीबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या खऱ्या, पण या गावातील बहुतांश स्थानिकांची आर्थिक मदार ही याच विदेशी नागरिकांवर अवलंबून असल्याने पुढील काळात त्याचे गंभीर परिणाम दिसून येतील, अशी भीतीही व्यक्त होते आहे.
पेडणे तालुक्यातील मोरजी व मांद्रे भागात मोठ्या प्रमाणात विदेशी नागरिकांनी आपले बस्तान बसवले आहे. या विदेशी नागरिकांनी विशेषतः रशियन लोकांनी स्थानिकांकडून त्यांचे व्यवसाय भाडेपट्टीवर घेतले आहेत व या संपूर्ण किनारपट्टीत आपले जाळे पसरवले आहे. व्यवसायाचा हा करार अलिखित असल्याने कायदेशीर कारवाई करण्यासही अनेक अडथळे निर्माण होतात. आश्वे मांद्रे येथील स्काय बार अँड रेस्टॉरंट चालवणारा विदेशी नागरिक कॉस्ता याने या भागात इतरही अनेक शॅक्स व भाडेपट्टीवरील खोल्या घेतल्या आहेत. मुळात हा व्यवसाय स्थानिकांच्या नावावरच चालतो, त्यामुळे पर्यटन खात्याला कारवाई करणे शक्य होत नाही. पर्यटन खात्याचे भरारी पथक किनारी भागातील शॅक्सची पाहणी करतात, त्यावेळी स्थानिक शॅक्स मालक तिथेच हजर असतात. अशावेळी कारवाई करावी तरी कशी, असा सवाल पर्यटन खात्याचे संचालक स्वप्निल नाईक यांनी उपस्थित केला.
मांद्रे येथील स्काय बार अँड रेस्टॉरंटचे पक्के बांधकाम लुईस डिसोझा या स्थानिक नागरिकाचे आहे. मुळात हे बांधकाम "सीआरझेड' क्षेत्रात येते, अशी माहिती स्थानिक पंचायतीने दिली. हे बांधकाम "सीआरझेड' क्षेत्रात असूनही त्याला पर्यटन खात्याकडून व्यवसायाचा परवाना देण्यात आला व त्यामुळे पंचायतीलाही ना हरकत दाखला देणे भाग पडले, असे सांगण्यात आले. दरम्यान, पर्यटन खात्याने मात्र याचे खापर स्थानिक पंचायतीवर फोडले असून हे बांधकाम "सीआरझेड' कक्षेत येत असल्यास त्यावर कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार स्थानिक पंचायतीला आहेत, असे त्यांनी सांगितले आहे.
स्काय बार ऍँड रेस्टॉरंटच्या बाजूलाच किनाऱ्याला टेकून कॉस्ता याने काही काळापूर्वी मातीचा भराव टाकून पार्टीसाठी जागा तयार केली. याबाबत "सीआरझेड' कडे तक्रारही दाखल झाली असली तरी त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. "सीआरझेड' बाबत कारवाई करण्याचे अधिकार उपजिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे "सीआरझेड' ची पायमल्ली केलेल्या या बांधकामावर कारवाई करण्याचे सोडूनच द्या, पण त्यांना संगीत पार्टीसाठी परवाना देण्याचे काम उपजिल्हाधिकारीच करीत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. स्काय बार ऍँड रेस्टॉरंट हे मुख्य रस्त्यालाच टेकून आहे. तिथे पार्किंगची व्यवस्थाही नाही, असे असूनही उपजिल्हाधिकारी कोणत्या आधारावर याठिकाणी पार्टी करण्यास परवानगी देतात, असा सवालही करण्यात आला.
दरम्यान, या विदेशी लोकांकडून प्रशासकीय परवान्यांसाठी मोठ्या प्रमाणात पैसे मोजले जातात, त्यामुळे स्थानिकांच्या तक्रारींना हे अधिकारी केराची टोपली दाखवतात, अशीही नाराजी काही लोकांनी केली. स्थानिकांनी तक्रार केल्यास तक्रारदाराचे नावही उघड केले जात असल्याने मग तक्रारदाराला धमक्या देण्याचे सत्र सुरू होते. उपजिल्हाधिकारी व पोलिस याकामी विदेशी लोकांचे दलाल या नात्यानेच काम करतात व त्यामुळे स्थानिकांना संरक्षण देण्याचे सोडून हे लोक विदेशी लोकांचेच हित जपतात, असा आरोपही करण्यात आला आहे.

'विशेषओळखपत्र योजने'चा जागृतीअभावी उडाला बोजवारा

पणजी, दि. १ (प्रतिनिधी): केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या राष्ट्रीय विशेष ओळखपत्र योजनेची राज्यातील किनारी भागांत अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु, या योजनेसंबंधी जनतेला अजिबात माहिती नसल्याने त्यांच्याकडून सरकारी अधिकाऱ्यांना सहकार्य मिळत नाही व त्यामुळे या योजनेचा बोजवारा उडण्याचीच जास्त शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
केंद्र सरकारने २८ जानेवारी २००९ रोजी ही योजना राबवण्यासाठी नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय विशेष ओळखपत्र प्राधिकरणाचीही स्थापना केली आहे. केंद्राने घेतलेल्या निर्णयानुसार नऊ राज्ये व चार संघप्रदेशांत पहिल्या टप्प्यात ही योजना राबवण्याचे ठरवले आहे. त्यात गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, ओरिसा ही राज्ये आणि पश्चिम बंगाल व दादरा आणि नगर हवेली, लक्षद्वीप, पॉंडीचरी, अंदमान आणि निकोबार आदी संघप्रदेशांचाही समावेश आहे. या राज्य व संघप्रदेशांतील किनारी भागांतील लोकांना ही ओळखपत्रे २०१० च्या प्रारंभी देण्याची ही योजना आहे.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी या योजनेअंतर्गत गोव्याचा समावेश करावा, असा पाठपुरावा केला खरा, पण आता प्रत्यक्षात या योजनेची कार्यवाही सुरू झाली असली तरी जनजागृतीबाबत मात्र सरकारकडून काहीच केले जात नसल्याने या योजनेबाबत लोक अनभिज्ञ असल्याचीही माहिती मिळाली आहे.
राज्यात ही योजना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राबवली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व किनारी भागांतील मामलेदारांना किनारी भागातील लोकांच्या सर्वेक्षणाचे काम सोपवले आहे. मामलेदार कार्यालयातून या कामासाठी विविध सरकारी खात्यातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पण या कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मुळात या योजनेची स्थानिकांना काहीही कल्पना नाही. पेडण्यातील किनारी भागांत सध्या या कर्मचाऱ्यांना स्थानिकांचे सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. राज्य सरकारने या योजनेची माहिती जाहिरातींव्दारे किंवा अन्य माध्यमांव्दारे जनतेला करून देणे गरजेचे होते. पण तसे काहीही करण्यात आले नसल्याने या योजनेची विश्वासार्हताच पुन्हा वादात सापडली आहे.
या योजनेची परिस्थिती निवडणूक ओळखपत्र किंवा इतर ओळखपत्रांप्रमाणे होता कामा नये, असे सांगून प्रत्यक्षात सर्वेक्षणावेळी घरातील एकही व्यक्ती जर चुकली तर हे ओळखपत्र तयार करण्यासाठी तालुका मुख्यालयात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल व त्यामुळे या योजनेचा मूळ उद्देशच नष्ट होईल, असेही बोलले जात आहे.

बिंबल-शिगाव खाणीवर आजपासून बेमुदत 'बंद'

कुळे, दि. १ (प्रतिनिधी): बिंबल-शिगाव येथील मे. जी. एन. अगरवाल खाणीवर गेल्या अनेकवर्षांपासून पिळवणूक होत असल्याचा आरोप करून, मागण्या मान्य होईपर्यंत सर्व कामगारांनी उद्यापासून बेमुदत "बंद' पुकारला आहे. याविषयी आज सायंकाळी शिगाव येथील रंगाई मंदिरात झालेल्या एका सभेत स्थानिक सरपंच संदीप देसाई, कामगार नेते नरेश शिगावकर, माजी सरपंच आणि शिगाव नागरिक समितीसह अन्य ग्रामस्थांनी या कामगारांच्या संपाला पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. कामगारांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोवर खाण सुरू करायला देणार नसल्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.
"बेनिफिकेशन' प्लांटवर २५०० ते २८०० टन खनिज दिवसाआड दर दोन पाळ्यांमध्ये काढण्यात येते. वर्षाकाठी सव्वा लाख टन दर्जेदार माल काढून त्याची वाहतूक येथून केली जाते. सोन्याच्या किमतींत निर्यात केला जाणारा हा खनिज माल काढणाऱ्या कामगारांना मात्र वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात, अशी खंत या खाणीवरील कामगारांनी व्यक्त केली आहे.
सुमारे २५ कामगार या खाणीवर काम करीत असून गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या वेतनात वाढ करण्यात आलेली नाही. १ जून २००८ मध्ये ४५०० रुपये वाढ करण्याची मागणी या कामगारांनी केली होती. त्यावेळी खाण व्यवस्थापनाने ती मान्यही केली होती. परंतु, काही दिवसांनंतर ती मागणी फेटाळून लावण्यात आली. तसेच काही कामगारांना कामावर घेतले जाणार नसल्याचेही फर्मान खाण व्यवस्थापनाने काढले. तब्बल २३ वर्षे या खाणीवर व्हील लोडर म्हणून काम करणाऱ्या कामगाराला केवळ ४५०० रुपये वेतन दिले जाते. कोणत्याही कामगाराला कामावर दुखापत झाल्यास त्याला योग्य भरपाईही दिली जात नाही, तसेच रजाही दिली जात नसल्याची तक्रार या कामगारांनी केली आहे.
या सर्व अन्यायी प्रकाराला पुन्हा एकदा येथील कामगारांनी वाचा फोडली असून आपल्या मागण्या मान्य होत नाहीत, तोवर कोणत्याही परिस्थितीत खाण सुरू करायला देणार नसल्याचा निर्धारही व्यक्त केला आहे. "सीटू' या केंद्रीय संघटनेमार्फत हा इशारा देण्यात आला आहे. या संपाला सरपंच तसेच माजी सरपंच सुधाकर गावकर, जयदेव वेळीप यांनी आपला संपूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. शिगाव येथे घेण्यात आलेल्या सभेत सूत्रसंचालन नीलेश प्रभू यांनी केले तर आभार भागो पांढर मिसाळ यांनी मानले.
------------------------------------------------------------------------
'पप्पूची' दादागिरी...
सदर खाणीवर "पप्पू' या नावाने ओळखला जाणारा अधिकारी स्थानिक पोलिसांना हाताशी धरून कामगारांना धमकावत असल्याची माहिती मिळाली आहे. कोणीही आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवल्यास त्याच्याविरुद्ध पोलिस तक्रार केली जाते. गेल्या काही दिवसांत दोन कामगारांविरुद्ध पोलिस तक्रार करून त्यांना गप्प करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. पोलिस या "पप्पू'च्याच तालावर नाचत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

शिमोगा गोळीबारात दोन ठार,चार जखमी

शिमोगा, दि. १ : वादग्रस्त बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी एका कानडी वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखावरून येथे हिंसक पडसाद उमटून त्यात दोघांचा बळी गेला तर अन्य चार जण जखमी झाले.
दगडफेक करणाऱ्या जमावावर पोलिसांनी गोळीबार केला, त्यावेळी एक जण ठार झाला, त्यामुळे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या शिमोगा या शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सुमारे दीड हजार जणांनी मोर्चा काढून बुरख्यासंबंधी तस्लिमा यांनी लिहिलेल्या लेखाचा निषेध केला. जमावातील लोकांनी बसगाड्यांवर दगडफेक केली, जमाव नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागल्याने पोलिसांना गोळीबार करावा लागला,असे पोलिस सूत्रांनी सांगितले. यावेळी जखमी झालेला आणखी एक नंतर मरण पावला,असे सांगण्यात आले.

Monday 1 March, 2010

बस्तोडा परिसरात दोन गटांत मारामारी; तिघे जण जखमी

म्हापसा, दि. २८ (प्रतिनिधी): जिवंत मारण्याची सुपारी घेतलेल्या संशयितांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या बेलीवीस्तावाडा येथील दोन गटांत मारामारी होण्याची घटना काल रात्री घडली असून यात तीन व्यक्ती जखमी झाल्या असल्याची माहिती कळंगुट पोलिसांनी दिली.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार २७ रोजी रात्री बलोविस्तावाडा येथे राहणारा पवन होबळे याने आपल्याला जिवंत मारण्याची सुपारी घेतली असल्याचा संशय बेलोविस्तावाडा येथे राहणारा उमेश नाईक याला आल्याने तो आपला भाऊ रवींद्र नाईक व कोलंडराज नायडू हे तिघे पवन याच्या घरी गेले. यावेळी दोन्ही गटांत झालेल्या बाचाबाचीनंतर भांडण जुंपले व हातघाईवर प्रकार आला. यात पवन होबळ, प्रीती होबळे, प्रितेश होबळे व प्रकाश राठोड हे जखमी झाले. या विषयीची तक्रार कळंगुट पोलिस स्थानकात नोंद झाल्यानंतर उपनिरीक्षक गौरीश परब याने जखमीला कांदोळी येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठवून घरी पाठवले आणि संशयित उमेश, रवींद्र आणि कोलंडराज यांना अटक केली. यानंतर रात्री उशिरा पवन होबळेच्या गटाने सुमारे १५ ते २० गुंड आणून दुसऱ्या गटातील सुमारे ५ ते ७ जणांना घरात जाऊन दांडा आणि लोखंडी सळयांनी अन्नमा गौडा, सुशील नायडू, मोहनी नायडू, लक्ष्मी नाईक व रेखा नाईक यांना मारहाण करून जखमी केले,अशी तक्रार पोलिस स्थानकांवर नोंद झाली आहे.
स्थानिक सरपंच नीळकंठ नाईक म्हापसेकर यांनी जखमी अन्नामा गौडा, मिराली नाईक व आरक्या नायडू या महिलांना १०८ मधून उपचारासाठी बांबोळी येथे पाठविले तर इतर जखमींना कळंगुट पोलिस स्थानकात तक्रार सादर केली. या वादामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला असून राजकीय वादातून हे भांडण जुंपले असल्याचा संशय व्यक्त केली जात आहे.

"जी सेव्हन' गट अधिक आक्रमक

मुंबईत शरद पवारांशी भेट
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी) - गोव्यातील राजकीय अस्थिरतेने आता शिखर गाठले असून, कामत हटाव मोहीम पुन्हा एकदा नव्याने तीव्र होत चालली आहे. कॉंग्रेसमधील असंतुष्टांना आता सात जणांच्या गटाचा पाठिंबा मिळण्याची शक्यता अधिक गडद झाली असल्याने नेतृत्वबदल अटळ असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांचे खाते काढून ते कुंभारजुव्याचे आमदार पांडुरंग मडकईकर यांना देण्याचा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा डाव उधळून लावल्यानंतर "ग्रुप ऑफ सेव्हन'आता अधिक आक्रमक झाला असून आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेऊन या सात जणांनी आपली एकी अभेद्य असल्याची ग्वाही पवार यांना दिली. शिवाय कॉंग्रेसलाही आपल्या गटाच्या हातात सरकारची शेंडी असल्याची जाणीव करून दिली. नेतृत्वबदल हा कॉंग्रेसचा अंतर्गत मामला असल्याची प्रतिक्रिया मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसने व्यक्त केली असली तरी गोव्यातील सद्यस्थिती आणि जनतेमधील सरकारबद्दलचा वाढता असंतोष यामुळे सात जणांचा गट या मागणीच्या समर्थनार्थ पुढे येण्याची शक्यता वाढली आहे.
गेल्या पंधरवड्यात कॉंग्रेसच्याच सहा ते सात आमदारांनी दिगंबर कामत यांना हटविण्याचे प्रयत्न चालविले होते, त्यांना या गटाचा छुपा पाठिंबा मिळाल्याने मुख्यमंत्री दिगंबर कामत हादरले होते. गेले काही महिने पांडुरंग मडकईकर यांना मंत्रिपदाचे गाजर दाखविण्यात येत आहे; त्यातच दयानंद नार्वेकर यांनीही आपले घोडे पुढे दामटले आहे. या दोघांपैकी मडकईकर यांना मंत्रिपद देण्याचे कामत यांनी निश्चित केले खरे, पण ढवळीकर यांना हटविणे कॉंग्रेसला महागात पडेल, अशी धमकीच राष्ट्रवादीचे केंद्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच दिल्याने आयत्यावेळी मडकईकरांचा शपथविधी रद्द करण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली होती. मिळालेल्या माहितीनुसार अपक्ष आमदार विश्वजित राणे या गटाचे नेते असून त्यांच्या सल्ल्यानेच आज सात आमदारांचा गट शरद पवार यांना भेटला. या गटाला गृहीत धरू नका,असा इशारा नुकताच पटेल यांनी दक्षिण गोव्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या अधिवेशानात दिला होता. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस, म.गो व अपक्ष अशा सात जणांचा गट गोव्यातील राजकारणात सध्या प्रभावी ठरला असला तरी सरकारच्या कार्यपद्धतीत बदल घडवून जनतेचे समाधान करणे या गटाला शक्य झालेले नाही. त्यामुळे नेतृत्त्वबदलाच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे.

राजकीय आशीर्वादानेच "डुडू' चा धंदा फोफावला!

गेली १२ वर्षे राजरोस अमली पदार्थांची विक्री

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी) - हणजुण येथे भाड्याने बंगला घेऊन तब्बल बारा वर्षे अमली पदार्थाचा व्यवसाय करणारा "डुडू' याचे राजकीय संबंधही उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांचा त्या दिशेने तपास सुरू झाला असून गेले १२ वर्षे "डुडू'याला कोणी आणि का संरक्षण पुरवले, याची माहिती सध्या अमली पदार्थविरोधी पथक गोळा करायला लागले आहे. आत्तापर्यंतच्या चौकशीत "डुडू' याचे आंतरराष्ट्रीय ड्रग माफियांची संबंध असल्याचे उघड झाले असून त्याचे नाव इंटरपोल पोलिसांच्या यादीवरही "वॉन्टेड' म्हणून असल्याची माहिती या पथकाचे अधीक्षक वेनू बंसल यांनी दिली.
काही भ्रष्ट पोलिसांच्या मदतीने त्याने बिनधास्तपणे अमली पदार्थाची तस्करी सुरू ठेवली होती. तो वारंवार ड्रगची तस्करी करण्याची पद्धत बदलत होता. जकात अधिकारी आणि पोलिस यांच्याशी घनिष्ठ मैत्री करून त्यांना हवे हवे ते तो पुरवत होता. "ड्रग'ची ने-आण तसेच ग्राहकांना पुरवठा सदानंद चिमुलकर ऊर्फ "भुई' याच्याद्वारे केला जात होता, अशी माहिती तपासात उघडकीस आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून भुई याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याच्याकडून मिळवलेल्या माहितीनुसार "डुडू' याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली होती.
"डुडू' याच्या "कॉल्स डिटेल' वरून पोलिसांनी किनारपट्टी भागात अमली पदार्थाचा व्यवसाय करणाऱ्यांची नावे हाती लागलेली असून त्यावर पोलिसांनी कडक नजर ठेवली आहे. "डुडू' आपला व्यवसाय वाढवण्यासाठी तरुणींचाही वापर करीत होता. एखादा मोबाईल बदलावा तसा तो आपल्या मैत्रिणी बदलत होता, अशी माहिती तपासात उघडकीस आली आहे. कोणी मोठा व्यापारी किंवा मोठ्या घराण्यातला तरुण त्याच्या संपर्कात येताच "डुडू' त्याला आपल्या बंगल्यावर नेत असे. त्यानंतर त्याच्यासाठी खास पार्टीचे आयोजन करून अमली पदार्थाचे फुकटात वाटप केले जात असे. "तरुणी आणि ड्रग' हे दोन्ही दिल्यावर ती व्यक्ती त्याची कायमची ग्राहक बनत असल्याची खात्री असल्याने हेच तंत्र त्याने अनेकांना अमली पदार्थाचे व्यसन लावण्यासाठी वापरल्याचेही स्पष्ट झाले आहे.

"ज्ञानोबा माझा'ला दणकेबाज प्रतिसाद

पणजी, दि. २८ - विश्वकल्याणाचा संदेश आपल्या पसायदानाद्वारे देणारे संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज हे महाविष्णूंचे अवतार मानले जातात. तरुण वयात घेतलेल्या संजीवन समाधीपर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास हा नाट्यपूर्ण व विस्मयजनक होता. या जीवनचरित्रावर आधारित "ज्ञानोबा माझा' या नाटकाचा प्रयोग नुकताच पैंगीण येथे झाला व त्याला रसिकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे, श्री माऊली आणि त्यांच्या भावंडांची कामे करणारी मुले शालेय वयातीलच ( ८ ते १४ वर्षे) असूनही, त्यांच्यासह सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका मोठ्या ताकदीने पेलल्या आहेत. श्रीज्ञानेश्वर महाराजांचा जीवनपट माहीत असतानाही हे नाट्य प्रेक्षकांना जागीच खिळवून ठेवते.
नाथसंप्रदाय, भागवत संप्रदाय व दत्तसंप्रदायाचे अध्वर्यू श्रीसंत प. पू. श्री. द. ऊर्फ मामासाहेब देशपांडे हे ज्ञानेश्वरी व संतवाङ्मयाचे गाढे अभ्यासक. ते ज्ञानेश्वर माऊलींचे अनन्य भक्त होते. चैतन्य चक्रवर्ती व कैवल्याचा पुतळा अशी दोन नाटके त्यांनी माऊलींच्या जीवनावर लिहिली.
१९ नाटकांचे दिग्दर्शन करणाऱ्या प. पू. मामांना रंगमंचावरील बारकावे ज्ञात होते. त्यामुळेच श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनातील नाट्य त्यांना खुणावत राहिले आणि त्यातून श्री चैतन्य चक्रवर्ती हे ४ अंकी नाटक त्यांनी लिहिले. प. पू. मामांच्या वाङ्मयाचा पैलू लोकांसमोर यावा म्हणून "श्रीपाद सेवा मंडळ' या संस्थेने या नाट्याची निर्मिती केली. आजच्या काळाची गरज लक्षात घेता मूळ ४ अंकी नाटकाचे पुनर्लेखन संहितेला धक्का न लावता तसेच दिग्दर्शन ज्येष्ठरंगकर्मी अशोक समेळ यांनी केले आहे. याला साजेल अशी नेपथ्यरचना केली आहे राजन भिसे यांनी. ७०० वर्षांपूर्वीच्या रागदारी संगीताची झलक इंडियन फ्युजनच्या धर्तीवर वेळेची मर्यादा लक्षात घेऊन डॉ. विद्याधर ओक यांनी गाण्यातून दाखवली आहे. यासाठी त्यांनी पार्श्वगायक निवडले तेही आजच्या संगीत क्षेत्रातील मातब्बर राहुल देशपांडे व अमोल बावडेकर. प्रकाशनाची जबाबदारी स्वीकारली आहे ती आपल्या यशस्वी कलाकारांना घेऊन "ऋग्वेद' या प्रथितयश संस्थेने.
माऊलींचे विचार जनमानसात अधिक प्रभावीपणे रुजविण्यासाठी आणि संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हे नाटक पाहावे अशी श्रीपाद सेवा मंडळाची संकल्पना आहे. याचा शुभारंभी प्रयोग श्री श्रद्धानंद विद्यालय पैंगीण या संस्थेसाठी झाल्यानंतर आता दुसरा प्रयोग शाळा संकुल कुडचडेकरिता होत आहे. गोमंतकातील इतर प्रयोगांसाठी काही जागा विद्यार्थ्यांकरिता राखीव ठेवण्यात आल्या आहेत. श्रीपाद सेवा मंडळाचे कार्य व उद्दिष्ट लक्षात घेऊन अनेक प्रथितयश उद्योजक मदतीसाठी पुढे आले आहेत. साहजिकच नाट्य व संगीतप्रेमी प्रेक्षकांसाठी "ज्ञानोबा माझा' ही खास पर्वणीच.

पेट्रोल, डिझेल दरवाढीचे "राष्ट्रवादी'कडून समर्थन

नवी दिल्ली, दि. २८ - पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीविषयी अंदाजपत्रकात करण्यात आलेल्या प्रस्तावावर द्रमुक आणि तृणमूलसारखे संपुआचे महत्त्वाचे घटक पक्ष सरकारवर हल्ला चढवत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने मात्र या प्रस्तावांना आज समर्थन जाहीर केले. केंद्रातल्या कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारची स्थिरता धोक्यात येईल अशाप्रकारचे कोणतेही पाऊल आम्ही उचलणार नाही असे स्पष्ट करीत अंदाजपत्रकामध्ये अनेक चांगले निर्णय घेण्यात आल्याचे प्रशस्तीपत्रक शरद पवार यांनी प्रणव मुखर्जींना देऊन टाकले आहे. पवारांनी पाठराखण केल्याने अर्थमंत्र्यांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे.
आम्ही निर्णयप्रक्रियेत सहभागी असतो. त्यामुळे सरकारच्या स्थिरतेवर परिणाम होईल अशाप्रकारचा कोणताही निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष घेणार नाही. या मुद्याबाबत भिन्न मते असणाऱ्या सहाकाऱ्यांना समजावून व्यापक देशहिताबद्दल त्यांना राजी करू, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
२०१०-११ च्या बजेटमध्ये टॅक्स स्लॅब वाढविण्यासारखे अनेक चांगले निर्णय असल्याचे सांगत पवार म्हणाले की समाजातील कमजोर तसेच मध्यम वर्गाच्या हिताचे सरकार संरक्षण करू इच्छित आहे. प्रणव मुखर्जी यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकाचे समर्थन करीत पवार म्हणाले, शेतकरीवर्गाला लाभ होईल असे अनेक निर्णय यात आहेत. ग्रामीण विकास, प्राथमिक शिक्षण तसेच शहरीकरणाची समस्या सोडवण्यासाठी भरघोस तरतूद करण्यात आलेली आहे. लोकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सरकारने स्त्रोत निर्माण केले पाहिजे असेही ते म्हणाले.
द्रमुक आणि तृणमूल कॉंग्रेस हे घटक पक्ष भाववाढ मागे घेण्यासाठी केंद्रावर दबाव टाकत असताना ९ खासदार असलेल्या राष्ट्रवादीसारख्या महत्त्वाच्या घटक पक्षाकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. भाववाढ मागे घेण्याची मागणी करत तृणमूल कॉंग्रेसने काल, शनिवारी कोलकात्यात रॅली काढली होती. शिवाय तृणमूलच्या नेत्या, रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी यासंदर्भात पंतप्रधान मनमोहन सिंह आणि यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. द्रमुकचे नेते करुणानिधी यांनीही पंतप्रधान मनमोहन सिंह आणि संपुआ अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून पेट्रोल-डिझेलची भाववाढ मागे घेण्याची विनंती केली आहे. दरम्यान, तृणमूल आणि द्रमुक हे पक्ष क्रमशः पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूत विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जात असल्याने भाववाढीला त्यांचा नैसर्गिक विरोध असल्याचे बोलले जात आहे.

वास्कोतील दोन्ही गोळीबार प्रकरणांतील आरोपीला अटक

चोरीच्या उद्देशानेच केले कृत्य
वास्को, दि. ३१ (प्रतिनिधी): चिखली - वास्को येथे दि. २२ मार्च रोजी करियप्पा मदार या मजुरावर झालेला गोळीबार आणि काल दि. ३० रोजी पॅट्रॉंग - बायणा येथील दिवाकर रेसिडन्सीमधील अनिता पी. अनंत या महिलेवर केलेल्या गोळीबारप्रकरणी वास्को पोलिसांनी काल उशिरा रात्री सिद्धांत एन. एल. कश्यप (१८) या संशयित आरोपीला बायणा भागातून अटक केली. सदर आरोपी मूळ उत्तरप्रदेश येथील असला तरी लहानपणापासून तो बायणा वास्को येथेच राहतो.
काल संशयित आरोपी जेव्हा अनिता पी. अनंत यांच्या घरी आला होता तेव्हा त्याने तिच्या पतीचे नाव घेतले होते व त्यांनीच आपल्याला कामानिमित्त पाठवल्याचे सांगितले होते. या धाग्यावरून वास्को पोलिसांनी आपल्या तपासाची सूत्रे हालवली. शिवाय सदर महिलेच्या लहान मुलीने हल्लेखोराचे केलेले वर्णनही त्यांच्या कामी आले.
सदर आरोपीचे वडील आणि जखमी महिलेचे पती हे एकाच जहाजावर काम करतात. काल रात्री उशिरा पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले व त्याच्याकडून ". १२ बोअर देशी कट्टा' पिस्तूल हस्तगत केले. गोळीबाराच्या दोन्ही प्रकरणांत हेच पिस्तूल वापरण्यात आले होते. शिवाय जखमी महिलेच्या गळ्यातून नाहीसे झालेले मंगळसूत्र व सोनसाखळी मिळून सुमारे ९८,०००चा मुद्देमालही त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. चोरीच्या उद्देशानेच सदर तरुणाने ही कृत्ये केली असल्याचे सूत्रांकडून समजते.
आज संध्याकाळी आरोपीला वास्को येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले असता त्याला १३ दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली.
दरम्यान, वास्को पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीच्या या प्रकरणात एखादी टोळी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाचा आणखीही प्रकरणांत हात असण्याची शक्यता असून त्या दिशेने तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, गोळीबारात जखमी झालेल्या महिलेची प्रकृती आता स्थिर असून ती उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती मिळाली आहे.

Sunday 28 February, 2010

जनविरोधी संपुआविरूद्ध पेटून उठा!


नितीन गडकरी यांचे आवाहन


अशोक गुप्ता
साकोली, दि. २७ - महागाई आकाशाला भिडली आहे. लोकांना एक वेळचे जेवण मिळत नाही. महागाई, बेकारी यांचे देशात थैमान सुरू आहे. हा जिल्हा धान उत्पादक शेतकऱ्यांचा असून शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, मच्छिमार, मजूर, शोषित, पीडित हे सर्व कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. देशातील शेतकरी कर्जात जन्मतो, जगतो व कर्जातच मरतो. त्याची टोपी राष्ट्रीयकृत बॅंकेत व शर्ट भूविकास बॅंकेत गहाण, तर धोतर सावकाराच्या पेढीत बांधलेले आहे. यासाठी कोण जबाबदार, असा प्रश्न उपस्थित करून कॉंग्रेस शासनाच्या चुकीच्या धोरणाची लक्तरे वेशीवर टांगीत, संपुआच्या या जनविरोधी धोरणाविरूद्ध पेटून उठण्याची वेळ आली आहे, असे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केले आहे. ते आज येथे होमगार्ड परेड ग्राऊंडवर भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित विशाल विकास परिषदेला संबोधित करीत होते. सभेचे निमंत्रक भाजपा प्रदेश सचिव आ. नाना पटोले होते.
गडकरी पुढे म्हणाले की, ही सर्व कॉंग्रेसच्या ६२ वर्षाच्या कारकीर्दीची देणगी आहे. आजही खेड्यात खाली मान घालून जावे लागते. शेतकरी गरिबीमुळे शौचालयासारख्या आवश्यकतेची पूर्तता करू शकत नाही. शासनाच्या चुकीच्या धोरणाबाबत गहू स्वस्त, ब्रेड महाग, कापूस स्वस्त तर कापड महाग, टमाटर स्वस्त तर सॉस महाग, भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना दोन रु. किलोने भाजीपाला विकावा लागतो, तर तोच खरेदी करताना त्याला २० रु. मोजावे लागतात. शेतकऱ्याच्या गव्हाला शासन ९.५० रु. देण्यास तयार नाही. पण डुक्करही खाणार नाही असा लाल गहू कृषिमंत्री शरद पवार यांनी १९.५० रु. किलोप्रमाणे आयात केला आहे. १२.५० रु. किलोची साखर निर्यात करून ती ३५ रु. किलोने पुन्हा आयात केली आहे. ही कॉंग्रेस व संयुक्त पुरोगामी आघाडीच्या कॉँग्रेस सरकारची उपलब्धी आहे. हे कोणत्या गरिबाचे सरकार आहे, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
वायदे बाजारामुळे ५ लाख ५० हजार कोटी रु.ची उलाढाल कोणत्याही जिन्नसांचा प्रत्यक्ष व्यापार न होता झालेली आहे. हा सर्व पैसा तुमच्या-आमच्या खिशातून गेल्याचेही त्यांनी जनतेपुढे मांडले. यावेळी शिक्षण क्षेत्रातही चाललेल्या प्रचंड भ्रष्टाचाराकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही केंद्रात भाजपाचे राज्य असताना राबविण्यात आली. ६० हजार कोटीची रक्कम खर्च करून २ लाख १६ हजार गावे डांबरी रस्त्यांनी जोडण्यात आली. हा पैसा इच्छाशक्ती असल्यामुळे उभारण्यात आला होता. भारतीय जनता पार्टी सक्षम असून विदर्भाच्या विकासासाठी दलित, आदिवासी, मच्छिमार, मुसलमान, शेतकरी, शेतमजूर यांच्या पाठीशी समर्थपणे उभी आहे. वैनगंगा साखर कारखाना हा जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कारखाना दोन लाख लोकांचे जीवन बदलू शकतो. पूर्ती उद्योग समूह नफ्यासाठी नव्हे, तर या क्षेत्राच्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी आहे. वैनगंगा कारखाना संधी मिळाली तर चालविण्यास तयार आहे, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
आ. नाना पटोले यांनीही आपल्या भाषणातून अनेक समस्या मांडल्या व शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेची मुहूर्तमेढ येथे रोवण्याचे आवाहन नितीन गडकरी यांना केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष डॉ. प्रकाश मालगावे यांनी, तर संचालन डॉ. युवराज जमईवार यांनी केले. निशाद लांजेवार यांनी आभार मानले.
..........


खाद्यान्न सुरक्षेबाबत अंदाजपत्रकात अन्याय झाला
सुषमा स्वराज यांचा आरोप


नवी दिल्ली, दि. २७ ः देशातील अन्नधान्याची टंचाई दूर करण्याच्या उद्देशाने कृषी उत्पादन वाढवण्यासाठी अंदाजपत्रकात फक्त ४०० कोटी रुपयांची तरतूद करून सरकारने सामान्य जनतेवर मोठा अन्याय केला आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी आज केला आहे.
काल संसदेत सादर करण्यात आलेले अंदाजपत्रक दिशाहिन आणि संवेदनाशून्य आहे, असे स्वराज यांनी फिक्कीच्या ८२ व्या वार्षिक बैठकीत बोलताना सांगितले. कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी सरकारने अंदाजपत्रकात मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. परंतु त्यांच्या अंमलबजावणीसाठी कुठलाही ठोस कार्यक्रम सरकारने दिलेला नाही. शेतीची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी ४०० कोटी तसेच सिंचनासाठी फक्त ३०० कोटींची तरतूद केली आहे. याबाबत सरकार किती गंभीर आहे हे यावरून सिद्ध होते, असेही त्या म्हणाल्या.