Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 20 March, 2010

"जी - ७'चा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार


वित्त विधेयकालाही विरोध करण्याची धमकी


पणजी, दि. १९ (प्रतिनिधी) - "जी - ७' गटाने आघाडी सरकारच्या विरोधात पुकारलेल्या बंडाची तीव्रता वाढवली असून, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच बहिष्कार टाकत येत्या दोन दिवसांत आपल्या "मागण्या' मान्य झाल्या नाही तर महिनाअखेरीस विधानसभेत सादर होणाऱ्या वित्त विधेयकालाही विरोध करू, अशी धमकी आज या गटाचे प्रमुख तथा वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सरकारला दिली. दुसऱ्या बाजूने आम्ही मुदतपूर्व निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कोणत्याही क्षणी तयार आहोत, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी घोषित केले. केरळ येथे गेलेल्या श्री. राणे यांनी पत्रकार परिषद सुरू असताना सुदिन ढवळीकर यांच्या मोबाईलवर संपर्क साधून हे विधान केले.
आम्ही मुख्यमंत्र्यांना जे निवेदन दिले होते त्यासंदर्भात आम्हांला अद्याप काहीही कळवण्यात आले नसल्याने आम्ही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला गेलो नाही, असे या गटाने सांगितले. दोन दिवसांपूर्वी मडगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांना आमच्या मागण्यांचे एक निवेदन दिले होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन नेत्यांनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबतीत अपशब्द वापरल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव व उपसभापती माविन गुदिन्हो यांनी माफी मागावी, अशीही मागणी केली होती, असे श्री. ढवळीकर म्हणाले. आल्तिनो येथील त्यांच्या सरकारी बंगल्यावर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी "जी - ७' गटातील सदस्य, शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात, महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा, पर्यटनमंत्री मिकी पाशेको, आमदार दीपक ढवळीकर व नीळकंठ हळर्णकर उपस्थित होते. आत्तापर्यंत आम्ही कॉंग्रेसच्या "हाय कमांड'बद्दल कुठेही अपशब्द वापरलेले नाहीत. मग, कॉंग्रेसचे मंत्री आमच्या "हाय कमांड'बाबत अपशब्द कसे वापरतात, असा सवालही श्री. ढवळीकर यांनी यावेळी केला.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी आमच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवलेल्या होत्या आणि त्यांना या मागण्यांवर विचार करण्यासाठी दोन दिवसांची मुदतही दिली होती. ते दोन दिवस उलटून गेले तरी मुख्यमंत्र्यांकडून कुठलेही ठोस पाऊल उचलण्यात आले नसल्याचे वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी यावेळी सांगितले. मात्र आपण केलेल्या मागण्यांचे स्वरूप स्पष्ट करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. आज आम्ही मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कारच घातला आहे; परंतु, जर आमच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी त्वरित पावले उचलली नाहीत तर आगामी अधिवेशनात अर्थसंकल्पाला आमचा पाठिंबा त्यांना लाभेल, असा विचारही त्यांनी करू नये, अशी गर्भित धमकीही ढवळीकर यांनी यावेळी दिली.
कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत "जी-७ ' गटाविरोधात काही मंत्र्यांनी भूमिका घेतल्यामुळे हा गट आक्रमक झाला आहे. गोव्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव आणि पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांच्यात सुरू झालेल्या या वादावादीमुळे आता सरकारचे भवितव्यच पणाला लागले आहे. चर्चिल आलेमाव यांनी या प्रकरणी माफी मागावी अशी "जी-७ ' गटाची मागणी आहे. मात्र या विषयी बांधकाम मंत्र्यांशी संपर्क साधला असता, "मी माफी कोणाची व का माफी मागायची ?' असा उलट सवाल त्यांनी केला. आपण माफी मागावी असे आपणाला मुख्यमंत्र्यांनीही सांगितले नसल्याचे ते म्हणाले. मंत्रिमंडळ बैठकीत आपण काहीच केले नाही; उलट सरकारातून बाहेर पडण्याचा इशारा पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनीच दिला होता, असे त्यांनी यावेळी सांगितले.



"त्या' मागण्या कोणत्या?

"जी ७' हे काय प्रकरण आहे? माझे सरकार आहे ते युतीचे. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि अपक्ष यांचा समावेश आहे. "जी - ७' काय आहे ते मला माहिती नाही, असे आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना पत्रकारांनी विचारले असता त्रासून सांगितले. काही मंत्र्यांनी त्यांच्या मागण्या माझ्याकडे दिल्या असून मी त्या "हाय कमांड'कडे पाठवल्या आहेत, असे त्या मंत्र्यांना मी कळवले आहे, असे ते म्हणाले. त्या मागण्या कोणत्या आहेत, असे विचारता, त्या मी जाहीर करून शकत नाही, असे श्री. कामत यांनी सांगितले. त्यामुळे अशा कोणत्या मागण्या या "जी - ७' गटाने केलेल्या आहेत, याबद्दल शंका आणि कुतूहल निर्माण झाले आहे.

ही तर पोकळ डरकाळी!

"जी - ७'च्या धमकीवर मनोहर पर्रीकर यांची प्रतिक्रिया

पणजी, दि. १९ (विशेष प्रतिनिधी) - "जी- ७' गटाने सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची जी धमकी दिली आहे, त्यात अजिबात दम नसून ती केवळ एक पोकळ डरकाळी आहे. कामत सरकारला कोंडीत पकडून "आपापल्या अडून पडलेल्या फाईल्स' सोडवून घेण्यासाठी व "कमिशनाचे साटेलोटे' साधण्यासाठी वापरलेली ती एक क्लृप्ती आहे. या आधी याच गटाने मोठे आकांडतांडव करून सरकारला दिलेल्या धमक्यांचे नंतर काय झाले ते गोव्यातील जनतेने पाहिलेलेच आहे. त्यामुळे अशा पोकळ गोष्टींची मी अजिबात दखल घेत नाही, अशी प्रतिक्रिया देत आज विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकरांनी "जी - ७'च्या बंडाचा जणू काही पर्दाफाश करून त्यातली हवाच काढून टाकली.
पर्वरीतील सचिवालयात आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पर्रीकर बोलत होते.
आल्तिनो येथील मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरील हालचाली, "जी - ७' गटाने घेतलेली पत्रकार परिषद, पाच जणांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर घातलेला बहिष्कार व त्यातून निर्माण झालेली दोलायमान परिस्थिती पाहून पत्रकारांनी पर्रीकरांच्या पत्रकार परिषदेला एकच गर्दी केली होती. ती पाहून पर्रीकर मिस्कीलपणे म्हणाले, "जी - ७ चे तथाकथित बंड संपेपर्यंत माझ्या केबिनमध्ये पत्रकारांसाठी आणखी खुर्च्या वाढवा!'
"जी - ७' गटाने घेतलेल्या आक्रमक पवित्र्याविषयी पत्रकारांनी त्यांना विचारले असता, ते म्हणाले, "अशा गोष्टींची दखल घेण्याचे मी आता सोडून दिले आहे.' कॉंग्रेस - राष्ट्रवादीच्या संसाराबाबत मिस्कील टिप्पणी करताना ते उत्तरले, "नवरा - बायकोच्या भांडणात मी का पडू? यदाकदाचित त्यांचा काडीमोड झालाच, तर आम्ही पुढे काय करायचे ते बघू. सत्तारूढ सरकारला पाडण्याचा पहिला प्रयोग हे सरकार सत्तेवर आल्यानंतर सुमारे ५० दिवसांनी झाला. त्यानंतर असे दिखाव्यासाठीचे अनेक प्रयोग झाले.आजवर हे सरकार टिकले ते राज्यपाल जमीर यांच्या कृपेमुळेच. त्यामुळे तमाम कॉंग्रेसजनांनी त्यांच्या पायांचे तीर्थच घेतले पाहिजे. अशाप्रकारे अटी घालून दिलेल्या धमक्यांत काहीच तथ्य नसते. मी एवढेच सांगेन की, भाजप आणि आमचे सर्व आमदार निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी पुरेपूर सज्ज आहेत.

"त्या' निलंबित पोलिसांना ७ दिवसांची पोलिस कोठडी

आणखी ८ पोलिसांवर निलंबनाची कुऱ्हाड?

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी) - अमली पदार्थ प्रकरणात अडकलेले निलंबित पोलिस निरीक्षक आशिष शिरोडकर आणि त्यांचे अन्य पाच पोलिस साथीदार यांच्या विरोधात भक्कम पुरावे गुन्हा अन्वेषण विभागाच्या हाती लागले आहेत. आज या सर्वांना प्रथम वर्ग न्यायालयात हजर करून सात दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली. दरम्यान, या प्रकरणात अजून एक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक व सहा पोलिस शिपाई निलंबित होण्याची शक्यता असून येत्या दोन दिवसांत या अधिकाऱ्यांना निलंबित केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गुन्हा अन्वेषण विभागाने सुरू केलेल्या चौकशीत ही नावे पुढे आली आहेत. अटालाच्या व्हिडिओ चित्रीकरणामुळे अडचणीत आलेल्या या पोलिस निरीक्षकांचे संबंध "दुदू' या ड्रग माफियाशीही असल्याची माहिती या विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
या प्रकरणात पोलिसांना हवा असलेला संजय परब हा पोलिस शिपाई अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. गेली कित्येक वर्षे गुन्हा अन्वेषण विभागात आणि त्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकात सेवा बजावलेला संजय पोलिसांना चकवा देत असल्याने त्याला ताब्यात घेण्याचे एक आव्हानच गुन्हा अन्वेषण विभागासमोर उभे ठाकले आहे.
दरम्यान, पोलिस कोठडी घेण्यात आलेल्या पोलिस निरीक्षकांसह अन्य पोलिस शिपायांची रवानगी आगशी पोलिस स्थानकाच्या कोठडीत करण्यात आली आहे. मात्र, याठिकाणी त्यांना बरीच मोकळीक मिळत असल्याचेही सांगितले जात आहे.
निलंबित पोलिस निरीक्षक आशिष शिरोडकर यांचे व अन्य संशयित पोलिस शिपायांचे ड्रग व्यवसायात गुंतल्याचे ठोस पुरावे हाती लागल्याने "एनडीपीएस' कायद्याचे ८(सी) २८, २९, ३० व ३१ ही कलमेही लावण्यात आली आहेत. या कलमांनुसार त्यांना किमान दहा वर्षे शिक्षा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्याचप्रमाणे, आशिष शिरोडकर याच्या मालमत्तेची तपासणी करण्याचे कामही सुरू झाले असून अमली पदार्थ विरोधी पथकात असताना त्याने किती "माया' जमवली आहे, याचा तपास लावला जाणार आहे. त्याचप्रमाणे, ड्रग पॅडलरकडून हप्ता म्हणून घेतलेले पैसे थेट आशिष यांच्याकडेच दिले जात होते की, अन्य कोणाच्या स्वाधीन केले जात होते, याचाही पोलिस शोध घेत आहेत. तथापि, हे पैसे थेट त्याच्या घरापर्यंत पोचत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महिन्याचा हप्ता वेळेवर पोचला नाही तर काही पोलिस शिपायांना दूरध्वनी येत होते. हे "फोन'कोण करीत होते, याचाही तपास केला जात आहे.

चर्चिल यांना कॉंग्रेसमधूनच फूस!

सुदिन ढवळीकर यांचा संशय

मडगाव, दि. १९ (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस वा "जी - ७' संदर्भात केलेली वक्तव्ये सर्वथा आक्षेपार्ह व सरकारसाठी अत्यंत हानिकारक आहे. त्यांच्या या बेजबाबदार वक्तव्यांबाबत कॉंग्रेसची प्रतिक्रिया अजून स्पष्ट होऊ नये, यावरून त्या पक्षातील कोणाची तरी त्यांना फूस नसावी ना, असा संशय आल्याशिवाय राहत नाही, असे प्रतिपादन आज सकाळी मडगाव येथे वाहतूक तथा समाजकल्याण मंत्री रामकृष्ण ऊर्फ सुदिन ढवळीकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना केले.
समाजकल्याण खात्याच्या इंदिरा बालरथ योजनेखाली मिनिबसेसचे वितरण करण्यासाठी आयोजित कार्यक्रमासाठी येथील रवींद्र भवनात ढवळीकर आले असता त्यांची भेट घेऊन सध्याच्या राजकीय घटनांबाबत त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी हे उत्तर दिले.
ते म्हणाले की, राष्ट्रवादी असो वा म. गो. असो, हे सरकारातील घटक पक्ष आहेत व म्हणूनच कोणाबाबतही जाहीर वक्तव्य करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. हे भान चर्चिल यांनी युतीबाबतचे निवेदन करताना बाळगले नाही व त्यामुळे संपूर्ण सरकारबाबतच चुकीचा संकेत निर्माण झाला आहे. त्यांच्या निवेदनाबाबत अजून कॉंग्रेसने कोणतेही निवेदन देऊ नये हे तर अधिकच आक्षेपार्ह आहे.
परवा "जी- ७' ने मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या भेटीबाबत विचारले असता, आम्ही सर्वांनी मुख्यमंत्र्यांकडे शरद पवार यांचा संदेश पोहोचता केला आहे. आपण दिलेली मुदत संपल्यानंतर हायकमांडच्या निर्णयानुसार पुढील पावले उचलली जातील, असे त्यांनी सांगितले.
या भेटीसंदर्भात मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया काय होती असे विचारता, ते तुम्ही मुख्यमंत्र्यांनाच विचारा असे ते उत्तरले. मात्र "जी- ७' गटातील सर्वजण संघटित व आपल्या भूमिकेशी ठाम आहेत, असे ते म्हणाले.
हा कार्यक्रम आटोपल्यावर मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भेट घेऊन सरकारच्या स्थैर्याबाबत प्रतिनिधीने सवाल केला असता, इंदिरा बाल रथाप्रमाणेच सरकारही भक्कम आहे, असे सांगून ते मंत्रिमंडळ बैठकीसाठी पणजीला रवाना झाले.

मलेरिया कर्मचारी संघाचे आजपासून आमरण उपोषण

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी) ः आरोग्य खात्यात मलेरिया सर्वेक्षक म्हणून नोकरीला असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आज पणजी शहरात मोर्चा काढून आपल्यावर झालेला अन्याय दूर करण्याची मागणी केली. उद्या दि. १९पासून पणजी जेटी येथे हे सर्व कर्मचारी आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्याप्रमाणे, दि. २४ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता विधानसभेवर मोर्चा नेण्यात येणार असल्याची माहिती आज मलेरिया कर्मचारी संघाचे अध्यक्ष प्रेमदास शांबा गावकर यांनी सांगितले.
गेल्या चौदा वर्षांपासून आरोग्य खात्यात सेवा बजावलेल्या या कामगारांना अचानक काढून टाकण्यात आले आहे. मंत्र्यांनी आपल्या मर्जीतील लोकांची भरती करण्यासाठी ८७ कर्मचाऱ्यांना एकाएकी कामावरून काढून टाकण्यात आल्याची टीका या कर्मचाऱ्यांनी केली आहे. या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून आमरण उपोषण करण्याचा निर्धार या कामगारांनी केला आहे.
मध्यंतरी या कामगारांनी सेवेत नियमित करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाला अधिकृतपणे प्रत्येकी ४० हजार रुपयांची देणगीही दिली होती व त्याद्वारे ३१ लाख रुपये जमवण्यात आले होते. मात्र हे पैसे कुणाकडे पोचले याचा मात्र अजूनही थांगपत्ता लागलेला नाही आणि कामगारांच्या नशिबी उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे.

Friday 19 March, 2010

अखेर शिरोडकरसह पाच पोलिसांना अटक

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): ड्रग माफियांशी साटेलोटे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर निलंबित करण्यात आलेले अमली पदार्थ विरोधी पथकाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक आशिष शिरोडकर यांच्यासह पोलिस हवालदार हुसेन शेख (बक्कल क्रमांक ३५०७), पोलिस शिपाई साईश पोकळे (६१५८), संदीप परब ऊर्फ "कामीण'(४९४६) व रामचंद्र काणकोणकर ऊर्फ "बिल्डर' (५४९६) यांना आज गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केली. भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी स्वरूपाचे कटकारस्थान रचल्याप्रकरणी ही अटक करण्यात आल्याचे पोलिस खात्याचे प्रवक्ते तथा "स्पेशल ब्रांच'चे पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी सांगितले. गोवा पोलिस खात्यातील ही अशा प्रकारे पोलिस निरीक्षकांसह पाच पोलिस शिपायांना अटक होण्याची ही पहिलीच घटना आहे. दरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती बरीच मोठी असून आणखी २३ पोलिस यात गुंतले असल्याची शक्यता वरिष्ठ पोलिस सूत्रांनी व्यक्त केली आहे.
रामचंद्र काणकोणकर याला काल रात्री अटक करण्यात आली होती. त्याला आज प्रथम वर्ग न्यायालयात हजर करून पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली आहे. अन्य एक पोलिस शिपाई संजय परब हा अद्याप हाती लागलेला नसून तो सापडताच त्यालाही अटक केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. "बिल्डर' या पोलिस शिपायाला आगशी पोलिस स्थानकाच्या कोठडीत ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर, निरीक्षक शिरोडकर यांच्यासह अन्य चार पोलिस शिपायांना कुठल्या कोठडीत ठेवले गेले आहे याची माहिती देण्यात आली नाही.
"अटाला' या इस्रायली ड्रग माफियाची गुप्तपणे काढण्यात आलेल्या "व्हिडिओ क्लिप'मध्ये वरील पोलिस कशा पद्धतीने त्याला अमली पदार्थ व्यवहारात सहकार्य करीत होते, याची सर्व माहिती उघड झाली आहे. ही व्हिडिओ क्लिप उघडकीस येताच मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन निरीक्षक शिरोडकर यांच्यासह अन्य पाच जणांना निलंबित केल्याचे जाहीर केले होते. परंतु, गेल्या एका आठवड्यापासून या संशयित पोलिसांना अटक केली जात नसल्याने गुन्हा अन्वेषण विभागाच्या कार्यपद्धतीवर टीका केली जात होती. अखेर आज गुन्हा अन्वेषण विभागाने एका पोलिस शिपायाला वगळता अन्य सर्वजणांना अटक केली. उद्या सकाळी त्यांना पोलिस कोठडी मिळवण्यासाठी न्यायालयात उपस्थित केले जाणार आहे.
न्यायालयाच्या लॉकरमध्ये ठेवण्यात येणारा अमली पदार्थ चोरून शिरोडकर आपल्याला देत होता याची कबुली अटाला याने दिली आहे. हा कबुली जबाब गुप्त कॅमेऱ्याद्वारे टिपण्यात आला आहे. त्यामुळे २००० सालापासून न्यायालयाने किती अमली पदार्थ विल्हेवाट लावण्यासाठी दिला आणि सध्या न्यायालयाच्या ताब्यात किती अमली पदार्थ आहे, याची माहिती गुन्हा अन्वेषण विभागाने मागितली आहे. ही माहिती येत्या आठ दिवसांत हाती येण्याची शक्यता या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर यांनी व्यक्त केली आहे.
शिरोडकर व साईश पोकळे यांनी जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. मात्र गुन्हा अन्वेषण विभागाने त्यापूर्वीच आपले म्हणणे न्यायालयासमोर मांडले असून, न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे २००० पासून अमली पदार्थ नष्ट करणाऱ्या समितीद्वारे अमली पदार्थ कधीच नष्ट करण्यात आले नसून, सारा माल गोदामात पडून असल्याचे सांगितले. पोलिसांना जर गोदामातील अमली पदार्थ गायब झाले असल्याचे आढळून आले तर शिरोडकर यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची गरज भासू शकते, असे संकेतही दिले गेले आहेत.
"सील्ड्' पार्सलना खोलून पुन्हा पार्सल सील करताना बनावट सीलचा वापर झाला असण्याची शक्यता पोलिस उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर यांनी न्यायालयात व्यक्त केली आहे. जामीन अर्जाला विरोध करताना या प्रकरणातील चौकशी अद्याप प्राथमिक स्तरावर असल्याचे गुन्हा अन्वेषण विभागातर्फे कळविण्यात आले आहे. व्हिडिओ क्लिपिंग्जच्या आधारे विविध अधिकाऱ्यांकडून गुप्त माहिती मिळवण्यात येत असल्याचे साळगावकर यांनी यावेळी न्यायालयात सादर केलेल्या उत्तरात स्पष्ट केले आहे.
या प्रकरणात अटक झालेल्या हुसेन, संदीप ऊर्फ "कामीण' व संजय परब यांची अमली पदार्थ विरोधी पथकातून बदली करण्यात आल्यानंतर एका पोलिस निरीक्षकाने त्यांना बरेच जवळ केले होते. त्याचप्रमाणे त्यांना आपल्याबरोबर काम करायला द्यावे म्हणून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे साकडे घातले होते. त्यासाठी हा पोलिस निरीक्षक स्वतः त्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या कार्यालयात हेलपाटे घालत होता. तर, "बिल्डर' याला जुने गोवे पोलिस स्थानकात नेण्यासाठी आशिष शिरोडकर यांनी जोरदार प्रयत्न चालवले होते. मात्र त्यांना यश आले नाही.
-------------------------------------------------------------------
अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधीक्षक वेनू बन्सल यांनी या पथकाचा ताबा सांभाळताच निरीक्षक आशिष शिरोडकर यांच्यासह अन्य पोलिस शिपायांची बदली केली होती. त्यावेळी या सर्व पोलिस शिपायांनी शिवोली येथे एका ठिकाणी जंगी पार्टीचे आयोजन केले होते. यात महागड्या पार्टीत "कॉल गर्ल्स'नांही नाचवण्यात आले होते. त्याचप्रमाणे, या पार्टीत अन्य पोलिस अधिकारी आणि पोलिस मंडळी तसेच, ड्रग व्यवसायातील पॅडलर सहभागी झाले होते, अशी माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या पार्टीत सहभागी झालेले ते अन्य पोलिस अधिकारी कोण, याचा शोध सध्या गुन्हा अन्वेषण विभाग घेत आहे.
--------------------------------------------------------------------
"बिल्डर' हा ड्रग माफियांशी साटेलोटे ठेवून हप्ता गोळा करणारा मोहरा होता. याची माहिती गुन्हा अन्वेषण विभागालाही यापूर्वी होती. यामुळे दि. ९ मार्च रोजी या विभागाने त्याच्यावर छापा टाकला होता. मात्र त्यानंतर त्याच्याकडे काहीही सापडले नसल्याचे सांगण्यात आले होते.

चर्चिलचे 'जी ७'ला जोरदार प्रतिआव्हान

'माफी मागणार नाहीच; हे तर राष्ट्रवादीचे "मच्छर"
मडगाव दि. १८ (प्रतिनिधी): गोव्यात सध्या विलक्षण गुंतागुंतीच्या बनलेल्या राजकीय परिस्थितीत आणखी तेल ओतण्याचे काम करताना सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी राष्ट्रवादीशी असलेली युती कॉंग्रेसने तोडावी, या भूमिकेशी आपण अजूनही ठाम असल्याचे सांगितले व त्या संदर्भातील निवेदनाबद्दल आपण कोणाची माफी मागण्याचा प्रश्र्नच उद्भवत नसल्याचे ते म्हणाले. "जी-७' ने वाट्टेल ते करावे, असे म्हणत त्यांनी या गटाची खिल्ली उडविली.
आपण याआधी कधीच कोणाची माफी मागितलेली नाही व यानंतरही मागणार नाही, असे स्पष्ट करून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केवळ पोकळ धमक्या देण्यापेक्षा हिंमत असेल तर सरळ राजीनामे द्यावेत व स्वबळावर निवडून येऊन दाखवावे असे उघड आव्हानही चर्चिल यांनी दिले.
"जी - ७' गटाने काल मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चिल यांनी राष्ट्रवादीच्या केलेल्या अपमानाबद्दल माफी मागण्यासाठी जी दोन दिवसांची मुदत दिली होती त्या संदर्भात चर्चिल यांनी आज हे नवे आव्हान दिले व त्यामुळे एकंदर राजकीय वातावरण आणखीनच गढूळ झाले आहे.
आज दुपारी येथील टूरिस्ट हॉटेलमध्ये तातडीने बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना बांधकाममंत्री "जी - ७' गटाच्या कालच्या मुख्यमंत्र्यांकडील भेटीबाबत आजच्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताबाबत बरेच संतप्त झालेले दिसून आले. त्यांनी काही इंग्रजी व एका मराठी दैनिकाचा अंक यावेळी दाखवला व सांगितले की, आपण माफी मागावी म्हणून सांगणारे हे कोण लागून राहिले आहेत? आपण कधीच कोणाकडे माफी मागितलेली नाही; एक देव सोडला तर आपण अन्य कोणासमोर नमते घेत नाही; आपण जनतेचा माणूस आहे व वेळ आली तर त्यांच्यासमोरच नमते घेईन. परंतु, अशा कंगाल नेत्यांसमोर आपण कदापि झुकणार नाही, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादीच्या तिन्ही नेत्यांची संभावना त्यांनी "मच्छर' या शब्दांत केली व त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा व पुन्हा एक तरी जागा स्वबळावर निवडून आणून दाखवावी असे उघड आव्हान दिले.
या लोकांनी आपल्याकडून माफी मागितली जावी अशी मागणी केली हे वाचूनच आपणाला धक्का बसला, असे सांगून राष्ट्रवादी युतीतून वा सरकारातून बाहेर पडली तरी सरकारला त्याचा कोणताच फरक पडणार नाही, असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी आपण कोणत्या परिस्थितीत कॉंग्रेसमध्ये आलो तेही स्पष्ट केले. आपल्या त्या प्रवेशाबाबत आपण थेट सोनिया गांधींशी बोलणी केली होती व त्याही वचनाला जागल्या. आपणाला मिळालेले खाते हा त्याचाच परिपाक आहे. कॉंग्रेस सरकारने केलेला विकास व जनसामान्यांना मिळालेला त्याचा लाभ यामुळेच जिल्हा पंचायत निवडणुकांत मतदार कॉंग्रेसबरोबर राहिला व दक्षिण गोव्यात १९ पैकी १६ जागा या पक्षाला मिळाल्या, असे त्यांनी सांगितले.
चर्चिल आलेमाव बॅकफूटवर?
मडगावः आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसकडील युतीबाबत केलेले निवेदन हे फक्त जिल्हापंचायत निवडणुकांपुरते होते, विधानसभेसाठी नव्हते,अशी सारवासारव आजयेथे सावर्र्जनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांनी केली व क्षणभर पत्रकारही चक्रावले. नंतर त्यांनी आपल्या या निवेदनाची सारवासारव करताना उलटसुलट उत्तरे दिली तर काही प्रश्र्नांवर पत्रकारांनाच प्रतिप्रश्न केले. त्यामुळे सध्या चालू असलेल्या राजकीय वावटळीत ते बॅकफूटवर तर गेले नाहीत ना, अशी कुजबुज पत्रकारांमध्ये सुरू झाली.
आजच्या पत्रकार परिषदेतील त्यांचा सारा रोख राष्ट्रवादीवर व प्रामुख्याने मिकी पाशेकोंवर होता. "जी -७' मधील अन्य कोणाचा त्यांनी उल्लेख देखील केला नाही. नंतर तर त्यांनी राष्ट्रवादीच्या तिघाही आमदारांना सरळ "मच्छर' असे संबोधले व राजीनामा देऊन युतीविना निवडून येण्याचे आव्हान दिले.
राष्ट्रवादी बाबत आपण केलेल्या विधानामुळे एवढे वादळ उठलेले असताना कोणीही कॉंग्रेस नेता वा मंत्री तुमच्या समर्थनासाठी का पुढे येत नाही, असे विचारता ते त्यांनाच विचारा, असे ते उत्तरले. तसेच युतीबाबतचे निवेदन पक्षाने करावयाचे होते ते तुम्ही का केले, तसेच पक्ष त्याचे अजून का समर्थन करत नाही, या प्रश्र्नाचे सरळ उत्तर देण्याचे त्यांनी टाळले व आपण लोकांचा माणूस आहे हे पालुपद ते घोळवत राहिले.
राष्ट्रवादीच्या माजोर्डा येथील अधिवेशनात पी. ए. संगमा यांनी थेट प्रधानमंत्र्यांची खिल्ली उडविली होती. पण कॉंग्रेसने त्याची दखल घेतली नाही उलट त्याकडे दुर्लक्ष केले होते. खरे म्हणजे कॉंग्रेसला त्याचे भांडवल करून राष्ट्रवादीला नामोहरम करून सोडता आले असते असेही ते म्हणाले.

प्रदेश भाजपची कार्यकारिणी घोषित

सात उपाध्यक्षांमध्ये तीन महिलांचा समावेश
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): माजी मंत्री प्रकाश वेळीप, दत्तप्रसाद खोलकर, मडगावच्या माजी नगराध्यक्ष कमलिनी पैंगीणकर, माजी मंत्री डॉ. विल्फ्रेड मिस्किता, सौ. कुंदा चोडणकर, केशव प्रभू व सौ. मुक्ता नाईक यांची भाजप कार्यकारिणीवर उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. गोविंद पर्वतकर, ऍड. नरेंद्र सावईकर व अविनाश कोळी हे सरचिटणीस तर आनंद शिरोडकर, माजी मंत्री विनय तेंडुलकर, आमदार दयानंद सोपटे, सौ. शिल्पा नाईक, माजी आमदार सदानंद शेट तानावडे, माजी सभापती विश्वास सतरकर व सौ. नीना नाईक यांची या कार्यकारिणीवर सचिवपदी नियुक्ती झाली आहे. संजीव नारायण देसाई यांची खजिनदारपदी निवड करण्यात आल्याचे पक्षाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आज येथे घोषित केले.
नव्या राज्य कार्यकारिणीच्या माध्यमातून राज्यातील सत्ता संपादनाचा मार्ग अधिक सुकर बनेल, असा विश्वास व्यक्त करतानाच त्यांनी यावेळी पक्षाच्या १०४ सदस्यीय राज्य कार्यकारिणीची निवडही जाहीर केली.
पार्सेकर यांच्या अध्यक्षतेखालील नव्या राज्य कार्यकारिणीत सात उपाध्यक्ष, तीन सरचिटणीस, सात सचिव व एक खजिनदार असे पदाधिकारी आहेत. नवी समिती ही २०१० ते २०१२ या तीन वर्षांसाठी असून आमदार, खासदारांचा या समितीत कायम निमंत्रित म्हणून समावेश करण्यात आला आहे. नवी कार्यकारिणी ही समाजातील सर्व घटकांना आणि विशेष करून महिलांना प्रतिनिधित्व करण्याची संधी देणारी असल्याचे श्री. पार्सेकर यांनी कार्यकारिणी घोषित करण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितले.
माजी आमदार राजेंद्र आर्लेकर यांची राज्य कार्यकारिणीवर मुख्य प्रवक्ते म्हणून नेमणूक करण्यात आली असून आमदार दामोदर नाईक यांची प्रवक्ते म्हणून निवड करण्यात आली आहे. कायम निमंत्रितांमध्ये खासदार श्रीपाद नाईक, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, आमदार फ्रान्सिस डिसोझा, दयानंद मांद्रेकर, राजेश पाटणेकर, विजय पै खोत, वासुदेव गावकर, महादेव नाईक, अनंत शेट, दिलीप परूळेकर, रमेश तवडकर, मिलिंद नाईक, माजी उपसभापती उल्हास अस्नोडकर, रूपेश महात्मे, मंगलदास गावस, नरहरी हळदणकर व पांडुरंग नाईक यांचा समावेश आहे. कार्यकारिणीवरील विशेष निमंत्रितांमध्ये डॉ. शेखर साळकर, मनोहर आडपैकर, सिद्धनाथ बुयांव, विवेक पडियार, नवनाथ नाईक, शिवराम लोटलीकर, माधव धोंड, डॉ. व्यंकटेश प्रभुदेसाई, दत्ताराम बर्वे, गजेंद्र राजपुरोहित, मनोदय फडते, पक्षाच्या विविध मोर्चांचे अध्यक्ष व विविध कक्षांचे निमंत्रक यांचा समावेश करण्यात आला आहे. तर एकूण पंचावन्न जणांची या कार्यकारिणीवर सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
गोव्यातील सध्याचे राजकीय चित्र हे भारतीय जनता पक्षासाठी पूरक असून आपल्या नेतृत्वाखालील नवी कार्यकारिणी सध्याच्या सरकारची कुकर्मे आणि भ्रष्टाचार जनतेसमोर उघड करण्यासाठी झटणार असल्याचे प्रतिपादन लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आज येथे केले. नव्या कार्यकारिणीवर समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात आली असून पक्षाच्या घटनेनुसार पंचवीस टक्के नवोदितांचा या समितीत समावेश केल्याचे पार्सेकर म्हणाले.
नव्या कार्यकारिणीत महिलांना योग्य संधी दिल्याचे सांगून विविध तालुक्यांनाही राज्य कार्यकारिणीवर प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्याचे त्यांनी सांगितले. गोव्याच्या चाळीसही मतदारसंघांत महागाई विरोधातील आंदोलनाचा कार्यक्रम नेला जाणार असून त्याची सुरुवातही झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. हे आंदोलन पंचायत, पालिका पातळीवर राबविले जाणार असून जाहीर कार्यक्रमही आयोजिण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
या दरम्यान महागाईबाबत राष्ट्रपतींना सादर करण्यासाठी एक छापील निवेदन तयार करण्यात आले असून त्यावरही सह्या गोळ्या केल्या जातील. त्यासाठी अडीच लाख सह्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून घरोघर फिरून त्याबाबत जागृती केली जाणार आहे. १० एप्रिलपर्यंत हे अभियान समाप्त होईल. त्यानंतर २१ एप्रिल रोजी पक्षाने "चलो दिल्ली, चलो संसद'ची हाक दिली असून त्याला गोव्यातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. महागाई व भ्रष्टाचार विरोधातील हे अभियान अभूतपूर्व असेच होईल, असा विश्वास श्री. पार्सेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला प्रकाश वेळीप, डॉ. विल्फ्रेड मिस्किता, ऍड. नरेंद्र सावईकर, दयानंद सोपटे, राजेंद्र आर्लेकर, विश्वास सतरकर, कमलिनी पैंगीणकर व अविनाश कोळी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
कार्यकारिणी सदस्य :
अशोक मोगू नाईक, अनिल रघुवीर होबळे, कृष्णी कृष्णा वाळके, ऍड. सोमनाथ वसंत पाटील, संजय पुंडलीक हरमलकर, दिपाजी राणे सरदेसाई, राजाराम ऊर्फ सतीश अर्जुन गावकर, अरुण नवसो बांधकर, डॉ. पुष्पा कालीदास अय्या, वासुदेव ऊर्फ मनोज लक्ष्मण कोरगावकर, नामदेव शंभू फडते अडकोणकर, रत्नाकर अनंत वेर्लेकर, आग्नेलो मारीयानो सिल्वेरा, ऍड. गणपत पांडुरंग गावकर, रोहिणी प्रेमानंद परब, प्रदीप पुंडलीक शेट, अनिल चोडणकर, दिना बेतू बांदोडकर, उमेश गावस, अर्चना किशोर कोचरेकर, विजयन मेनन, लिंकन आरावजो, दुर्गादास दामू नाईक, देमू दुलो गावकर, शरद गाड, छाया विजय पै खोत, परेश रायकर, राजन (सुभाष) काशीनाथ नाईक, शेख जीना नबी, सुरेश केपेकर, उल्का उल्हास गावस, चंदन नारायण नायक, सुभाष शंकर मळीक, ज्योकीम मॅन्यूएल डी'क्रूझ, कालीदास कुष्टा कवळेकर, कोसेंसांव डायस, जोसेफीन आलेक्स डी'क्रूझ, केशव पुतू नाईक, दिगंबर हरी आमोणकर, विलास केशव शेट्ये, मारुती देवप्पा देसाई, शुभदा लक्ष्मीकांत कुंडईकर, पीटर वाझ, पांडुरंग राजाराम नाईक, वैदेही विवेक नाईक, उत्तम खुशाली फडते, विठू मोरजकर, छाया गाड, गिरीश पुंडलीक उसकईकर, महानंद गजानन असनोडकर, चंद्रकांत के. गावस, शिवाजी गावडे, प्रसाद ऊर्फ अनंत लक्ष्मण प्रभुगावकर, प्राजक्ता प्रकाश कान्नाईक, शेख इब्राहिम मूसा.

'पंतांच्या आशीर्वादानेच यशस्वी होईन'

...आणि लखोबा लोखंडेच्या पंचरंगी भूमिकेत डॉ. गिरीश ओक
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या पंचरंगी भूमिकेने अजरामर झालेले फिरत्या रंगमंचावरील ""तो मी नव्हेच'' हे नाटक पुन्हा एकदा नाट्यरसिकांच्या मनोरंजनासाठी रंगभूमीवर नव्या रूपात येत असून त्यात लखोबा लोखंडेची पंचरंगी भूमिका डॉ. गिरीश ओक साकारणार आहेत. "या नाटकामुळे एका "लिजंड'ची भूमिका मी करणार आहे. "पंत' आणि "ओक' अशी तुलनाही रसिक करणार आहेत आणि तो धोका मी स्वीकारलेला आहे. परंतु, स्वतः पणशीकरांनीच मला या भूमिकेसाठी आशीर्वाद दिले असल्याने ही पंचरंगी भूमिका सहीसही वठवण्यात मी यशस्वी ठरेन', असा विश्वास आज डॉ. गिरीश ओक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. ते आज पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी नाटकाचे निर्माते विजय जोशी व अन्य मंडळी उपस्थित होती.
या नाटकाच्या पटकथेत आणि वाक्यरचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. परंतु, एका फिरत्या रंगमंचाऐवजी दोन फिरते रंगमंच वापरण्यात आले आहेत. संगीत आणि नेपथ्यामध्येही थोडे फेरफार करण्यात आले आहेत. प्रभाकरपंतांची भूमिका पाहूनच मी प्रभावित झालो आहे. या नाटकाचे सर्वत्र प्रयोग झाल्याने अगदी खेड्यापाड्यांतल्या लोकांनाही ते माहिती आहे. तरीही या नाटकाला आजही रसिकांची "हाउसफुल्ल' उपस्थिती असते', असे ते पुढे म्हणाले.
लखोबा लोखंडे गुन्हेगार आहे; तो आता या भूमिकेसाठी कशा प्रकारची वेषभूषा करून येणार तेही प्रेक्षकांना माहिती असते. पण, ती भूमिका तो कोणत्या शैलीत वठवतो हेच रसिकांना या नाटकात पाहायला जास्त आवडते. आणि म्हणूनच हे नाटक अजरामर ठरले असल्याचे डॉ. ओक बोलताना म्हणाले.
एखाद्या चित्रपटात आणि नाटकात दोनपेक्षा अधिक भूमिका करणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आपण सीरिअल आणि चित्रपटांपेक्षा नाटके करणारा "नाटकी कलाकार' असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचे ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. "१९८५च्या दरम्यान याच नाटकात मी "अग्निहोत्री' या एका साक्षीदाराची भूमिका केलेली आहे. त्यामुळे मी हे नाटक बाहेरून आणि आतूनही पाहिलेले आहे. त्यामुळे माझ्यावर अपेक्षांचे, तुलनेचे आणि जबाबदारीचे ओझे आहे. ते मी यथाशक्ति पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार', असेही ते शेवटी म्हणाले.
आचार्य अत्रे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या या नाटकाचे संवाद आणि भाषाशैली झेलण्याचा वकूब असलेले खूपच कमी नट आहेत. पंतांनी या नाटकातून निवृत्ती स्वीकारल्यानंतर ही भूमिका करण्यासाठी केवळ डॉ. ओक यांचेच एकमेव नाव पुढे आले, असे या नाटकाचे निर्माते विजय जोशी यांनी सांगितले. गोव्यात जाणते आणि संगीतप्रेमी प्रेक्षक आहेत. त्यामुळे गोव्यात आणि महाराष्ट्रात नाटक सादर करण्यात फार मोठा फरक आहे; आणि याचीच आम्हांला नेहमी भिती वाटत आली आहे, असेही श्री. जोशी यांनी मिस्कीलपणे सांगितले.
दरम्यान, गोव्यात या नाटकाचे पाच प्रयोग होणार असून दि. १७ रोजी एमपीटी सभागृह वास्को येथे, तर, उद्या दि. १९ रोजी रात्री ९ वाजता हीराबाई झांट्ये सभागृह डिचोली येथे प्रयोग होणार आहे. दि. २० रोजी सायंकाळी ७.३० वाजता दीनानाथ मंगेशकर सभागृह, पणजी येथे प्रयोग होणार असून दि. २१ रोजी ९ वाजता रवींद्र भवन मडगाव व दि. २२ रोजी ९ वाजता रवींद्र भवन कुडचडे येथे या नाट्यप्रयोगांचे आयोजन करण्यात आले आहे.

Thursday 18 March, 2010

कामत सरकार धोक्यात

'जी-७' गटाने नाड्या आवळल्या
मडगाव, दि. १७ (प्रतिनिधी): मुख्यमंत्री दिगंबर कामत सरकारच्या अकार्यक्षम आणि गचाळ नेतृत्वाबद्दल नाराज असलेल्या आणि कॉंग्रेसमधील सहकारी मंत्र्यांच्या दादागिरीने सहनशक्ती गमावून बसलेल्या "जी-७' गटाने आता अतिशय आक्रमक भूमिका घेतली असून सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा विचार या गटात बळावत चालल्याची स्पष्ट चिन्हे दिसून लागली आहेत. आज रात्री या गटाने विद्यमान सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचे वृत्त राज्यात वाऱ्यासारखे पसरल्याने सर्वच भागांतून वृत्तपत्र कार्यालयांना दूरध्वनी येत होते. तथापि, अद्याप असे काही झालेले नसले तरी कोणत्याही क्षणी सरकार अल्पमतात येऊ शकते, असे राजकीय निरीक्षकांना वाटते आहे.
कॉंग्रेस व "जी ७' गटाकडील संबंध आता सुधारण्यापलीकडे पोहोचले असून आज सकाळी जेव्हा या गटाने मडगावात येऊन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची त्यांच्या मालभाट येथील निवासस्थानी भेट घेतली तेव्हा या बिघडलेल्या संबंधांची पुरेपूर प्रचिती आली. काल या गटाने पुण्यात जाऊन गोव्यातील एकूणच परिस्थितीबाबत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना इत्थंभूत माहिती दिली होती. तिथे शरद पवार यांनी "जी-७' गटाला जो संदेश दिला होता तो संदेश आज या गटाने मुख्यमंत्र्यांना पोहोचता केला.
नंतर या मंडळींनी पत्रकारांशी बोलण्याचे टाळले तर त्यांच्या पाठोपाठ बाहेर पडलेले मुख्यमंत्रीही पत्रकारांना टाळून लगेचच निघून गेले. मात्र, मुख्यमंत्री व "जी - ७'मधील सर्वांचे दुर्मुखलेले चेहरे "ऑल इज वेल' नसल्याचेच दर्शवत होते.
मुख्यमंत्र्यांच्या निवासातून सर्वांत अगोदर बाहेर आलेले पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी सवयीनुसार उलट पत्रकारांनाच तुम्ही कशासाठी इथे जमला आहात, असा सवाल केला तर त्यांच्या पाठोपाठ बाहेर आलेले सुदिन ढवळीकर व बाबूश मोन्सेरात यांनी आपण कामत यांची भेट घेऊन पवारांनी दिलेला संदेश त्यांच्याकडे पोहोचता केल्याचे सांगितले. तो संदेश काय होता, युती तोडणार का, सरकारचा पाठिंबा काढून घेणार का, या प्रश्र्नांना उत्तरे देण्याचे त्यांनी टाळले. सर्वांत शेवटी बाहेर आले ते आरोग्यमंत्री विश्वजित राणे. त्यांनी यावेळी, आम्ही सातही जण संघटित असून जो काही निर्णय घ्यायचा असेल तो एकमतानेच घेऊ , हे रोजचेच वाक्य पत्रकारांसमोर फेकले. नंतर ही सर्व मंडळी तीन गाड्यांत बसून निघून गेली.
तथापि, मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसशी असलेल्या युतीबाबत काढलेल्या अपशब्दांची गंभीर दखल राष्ट्रवादीच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतली असून त्याबाबत आजच्या भेटीत मुख्यमंत्र्यांना दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सदर उद्गारांबाबत चर्चिल यांनी जाहीर माफी मागावी किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिमंडळातून वगळावे, असा निर्वाणीचा इशारा "जी -७' गटाकडून मुख्यमंत्र्यांना दिला गेला आहे. या मुदतीत मुख्यमंत्र्यांकडून योग्य ती पावले उचलली गेली नाहीत तर पुढील कृती करण्यास "जी -७' मोकळा असेल व त्यासाठी शरद पवार यांनी या गटाला मोकळीक दिली आहे.
आलेमाव बंधूंनी काल कुंकळ्ळी व नावेली येथील दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांत राष्ट्रवादीचा उल्लेख करून मध्यावधी निवडणुकांबाबत जी निवेदने केली आहेत त्याला प्रत्युत्तर देताना आपली केव्हाही लोकांसमोर जाण्याची तयारी आहे, असे या गटाने स्पष्ट केल्याचे कळते.
आज सकाळी ९ वा. मुख्यमंत्र्यांबरोबर या गटाची भेट ठरली होती. पण त्यापूर्वीच हा गट घोळक्याने मालभाटात दाखल झाला. ढवळीकर बंधू व त्यापाठोपाठ मिकी पाशेको, त्यानंतर जुझे फिलिप व नीळकंठ हळर्णकर व सर्वांत शेवटी बाबूश मोन्सेरात व विश्वजित राणे आले. त्यांची मुख्यमंत्र्यांशी खलबते साधारण अर्धा तास चालली. खाली प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी व पोलिसांनी गर्दी केली होती. बाहेर येताना मिकी पाशेको सर्वप्रथम तर सर्वांत शेवटी विश्वजित राणे आले. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री आले व कोणाशीही न बोलता गाडीत बसून निघून गेले. त्यावेळी पत्रकार सुदिन ढवळीकर व विश्वजित राणे यांच्याशी बोलण्यात गुंग असल्याने मुख्यमंत्र्यांकडे कोणाचेच लक्ष गेले नाही.
नंतर "जी - ७' गटही एकत्रितपणे निघून गेला. पण त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, मडगावलगत असलेल्या एका हॉटेलात बसून त्या सर्वांनी चहा घेतला व आपला पुढील पवित्रा पक्का केला. दरम्यान, मिळत असलेल्या संकेतानुसार सोमवारी सुरू होत असलेल्या विधानसभा अधिवेशनापूर्वी राज्यात महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी अपेक्षित आहेत.

अखेर कंटक यांचे नमते

ऍड. आयरिश यांच्यावरील मानहानीचा खटला मागे घेतला
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): गोव्याचे वादग्रस्त ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांनी ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांच्यावर दाखल केलेल्या मानहानी खटल्यात स्वतःचीच मानहानी होत असल्याचे लक्षात येताच अखेर नमते घेतले व आज सदर मानहानी खटला मागे घेत असल्याचा विनंती अर्ज न्यायालयात सादर केला. त्यामुळे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एडगर फर्नांडिस यांनी सदर याचिका निकालात काढताना आयरिश यांना मानहानी खटल्यातून दोषमुक्त केले. दरम्यान, आजच्या उलटतपासणीसही ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक अनुपस्थित राहिले व त्यांच्या वकिलाने फौजदारी खटला संहितेच्या कलम २५६ नुसार सदर मानहानी खटल्याची सुनावणी थांबविण्याचा विनंती अर्ज न्यायालयात सादर केला.
या मानहानी खटल्यातून ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांना दोषमुक्त करतानाच, ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांची गेल्या सुनावणीवेळी व आजही असलेली अनुपस्थिती ही हेतुपुरस्सर असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचा शेरा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एडगर फर्नांडिस यांनी आपल्या आदेशात मारला आहे. या खटल्यामुळे न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचा मौलिक वेळ खर्ची पाडल्याचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात नोंदविताना या खटल्यामुळे इतर खटल्यांतील अनेक साक्षीदार परत पाठवावे लागल्याचेही नमूद केले आहे.
दरम्यान, कंटक यांनी नमते घेतले असले तरी ऍड. आयरिश यांनी हे प्रकरण धसास लावण्याचा निर्धारच केला असून या खटल्यातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर त्यांनी फौजदारी खटला संहिता कलम २५० अंतर्गत न्यायालयात अर्ज सादर केला आहे. सुबोध कंटक यांनी निराधार मुद्द्यांवर खोटा व असद्भावपूर्वक खटला न्यायालयात दाखल करून आपल्याला त्रस्त केल्याबद्दल नुकसान भरपाईचे आदेश देण्याची मागणी ऍड. रॉड्रिगीस यांनी अर्जाद्वारे न्यायालयात केली.
राज्याचे ऍडव्होकेट जनरल यांनी असे बेजबाबदारपणे वागता कामा नये होते. त्यांनी केलेल्या बेजबाबदार वर्तणुकीबद्दल त्यांना मोठ्या प्रमाणात दंड सुनावण्यात यावा अशी मागणी ऍड. रॉड्रिगीस यांनी न्यायालयाकडे केली. त्यांच्या या अर्जावर आपले म्हणणे मांडण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एडगर फर्नांडिस यांनी एजी सुबोध कंटक यांना दिले आहेत व सुनावणीसाठी २६ मार्च हा दिवस मुक्रर केला आहे.
आपली झालेली निर्दोष मुक्तता हा सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया ऍड. आयरिश यांनी व्यक्त केली. सुबोध कंटक हे स्वतःचाच खटला व्यवस्थितपणे चालवू शकत नाहीत ते राज्याच्या कायदा हिताची सुरक्षितता कशी काय राखू शकतील? यावर गोवा सरकारने गंभीर विचार करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
ऍडव्होकेट जनरलसारख्या अतिमहनीय पदावर राहण्याचे सर्व नैतिक अधिकार सुबोध कंटक हरवून बसले आहेत. त्यामुळे त्यांनी यापुढे या पदावर राहणे गोवा तसेच आम आदमीसाठी अहितकारक असल्याचे मत ऍड. रॉड्रिगीस यांनी नोंदवले.
सुबोध कंटक हे सरकारी तिजोरी लुटत असल्याच्या आरोपाचा ऍड. रॉड्रिगीस यांनी पुनरुच्चार करताना त्यांनी ऍडव्होकेट जनरल म्हणून सादर केलेल्या सर्व बिलांच्या चौकशीची मागणी आयरिश यांनी केली असून कंटक यांना फेडण्यात आलेल्या दुप्पट तथा अतिरिक्त शुल्काची रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. सुबोध कंटक यांनी गोव्याचे ऍडव्होकेट जनरल म्हणून केलेल्या सर्व गैरकृत्यांची तसेच ऍडव्होकेट जनरलांच्या कार्यालयाच्या केलेल्या गैरवापराची सखोल चौकशी करण्याची मागणीही ऍड. आयरिश यांनी केली आहे. गोव्याच्या ऍडव्होकेट जनरलांचे शुल्क महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक यांच्या ऍडव्होकेट जनरलांच्या तुलनेत येईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

'विश्वस्त'चे दिमाखदार जलावतरण

गोवा शिपयार्डच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा
वास्को, दि. १७ (प्रतिनिधी): गोवा शिपयार्डने बांधलेल्या व अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेल्या "विश्वस्त' या गस्तीनौकेचे आज येथे एका दिमाखदार सोहळ्यात अनावरण करण्यात आले. त्यामुळे भारतीय किनारा रक्षक दलाची ताकद आणखी वाढली आहे.
प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित असलेले संरक्षणमंत्री ए.के अँटनी यांच्या हस्ते "विश्वस्त'चे जलावतरण झाले.
मुख्यमंत्री दिगंबर कामत, भारतीय किनारा रक्षक दलाचे महासंचालक व्हाईस ऍडमिरल अनिल चोप्रा, गोवा शिपर्यांडचे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक रिअर ऍडमिरल व्ही.बक्षी, गोवा नौदलाचे ध्वजाधिकारी सुधीर पिल्ले, गोवा किनारा रक्षक दलाचे प्रमुख एम.एस.डांगी आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
श्री अँटनी यांनी याप्रसंगी सांगितले की, या नौकेमुळे भारतीय किनारपट्टीची सुरक्षा भक्कम होण्यात अधिक मदत होणार असून टेहळणीच्या कामात सुलभता येणार आहे. किनारा रक्षक दलाला भेडसावणाऱ्या सर्व अडचणींची पूर्तता करण्यास सरकार वचनबद्ध आहे. त्यांच्या मागण्या अग्रहक्काने पूर्ण केल्या जातील अशी ग्वाही आपण याप्रसंगी देतो.
लवकरच अशा प्रकारच्या आणखीन दोन नौका किनारा रक्षक दलात सामील केल्या जाणार आहेत.
भारतीय किनारा रक्षकाच्या माध्यमातून किनाऱ्यांची सुरक्षा मजबूत केली जाईल. त्यासाठी नवीन जहाजे, लढाऊ विमाने उपलब्ध केली जातील. तसेच देशातील किनारी भागांत एकूण १४ किनारा रक्षक स्थानके उभारण्याचे सरकारने मान्य केले आहे.
भारतीय नौदल ताकदही वाढवण्यात येणार आहे. नौदल व किनारा रक्षक दल यांनी यापुढेही हातात हात घालून देशाच्या रक्षणासाठी कार्यरत राहावे, असे अँटनी यांनी सांगितले.
गोवा शिपर्याडने "विश्वस्त' गस्ती नौका अत्यंत चांगल्या पद्धतीने बांधल्याबद्दल त्यांनी शिपयार्डचे खास अभिनंदन केले.
किनारा रक्षक दलाचे महासंचालक श्री. चोप्रा यांनी आजचा दिवस आमच्या दलासाठी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे प्रतिपादन केले. बुडत असलेल्यांना जीवदान देण्यासाठी सदर नौका अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.१ फेब्रुवारी १९७७ साली छोटेखानी स्वरूपात स्थापन करण्यात आलेल्या किनारा रक्षक दलाचा आता प्रचंड विस्तार झाला आहे."विश्वस्त'सह ४४ जहाजे, १७ इंटरसेप्टर नौका,, ६ हॉवरक्राफ्ट व ४५ हवाई जहाजे अशी आमची ताकद असल्याचे श्री चोप्रा यांनी सांगितले. आगामी काळात ही ताकद दुप्पट होणार असल्याचे त्यांनी अभिमानपूर्वक नमूद केले.
यावेळी या जहाजाचा ताबा सोपवण्यात आलेला तटरक्षक दलाचे अधिकारी कमांडंट प्रमेश शिवमणी यांना उत्कृष्ट सेवा बजावण्यासाठी संरक्षणमंत्र्यांनी याप्रसंगी शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री कामत, शिपर्यांडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बक्षी व मान्यवरांची यावेळी भाषणे झाली.
ही नौका बांधण्याकामी भरपूर परिश्रम घेतलेल्या विविध गटांच्या अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा या कार्यक्रमादरम्यान गौरव करण्यात आला. अक्षय जैन यांनी सूत्रसंचालन केले.

योग्यवेळी पाकिस्तानातील दहशतवादी तळ उखडणार

संरक्षणमंत्री अँटनींची निःसंदिग्ध ग्वाही
वास्को, दि. १७ (प्रतिनिधी): पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील ४२ दहशतवादी छावण्या उखडण्यासाठी भारत योग्यवेळी पावले उचलणार आहे, अशी निःसंदिग्ध ग्वाही संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
आज सकाळी गोवा शिपयार्डात झालेल्या "विश्वस्त' या गस्तीनौकेचे भारतीय किनारा रक्षक दलाकडे हस्तांतर झाल्यानंतर ते बोलत होते.
भारताला पाकिस्तानसोबत सौहार्दाचे संबंध निर्माण झालेले हवे आहेत. तथापि, तो देश भारताच्या या प्रयत्नांना कसल्याही प्रकारे प्रतिसाद देण्यास तयार नाही. त्यामुळे दिवसेंदिवस या द्विपक्षीय संबंधांत कटुता येत चालली आहे, असे त्यांनी सांगितले.
देश सुरक्षित ठेवण्यासाठी आमचे लष्कर पूर्ण सक्षम असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत झालेल्या २६/११ च्या घटनेनंतर देशाच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. याकामी मच्छीमार बांधवांकडून लष्कराला उत्तम सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
काश्मिरात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून तुलनात्मकदृष्ट्या शांतता नांदत आहे. त्यामुळेच दहशतवाद्यांचा पोटशूळ उठला आहे. तेथे तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने होत आहे. मात्र निधड्या छातीने आमचे जवान त्यांना तोडीस तोड उत्तर देत आहेत, असे त्यांनी अभिमानाने सांगितले.
दाबोळी विमानतळ विस्तारीसंदर्भात ते म्हणाले, आमच्याकडून सर्व सोपस्कार पूर्ण करण्यात आले आहेत. आता विमानतळ प्राधिकरणाने पुढची पावले उचलण्याची गरज आहे.
लष्कराकडून वेळोवेळी केल्या जाणाऱ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आता भारतातील खाजगी तसेच इतर व्यवस्थापनांचे सहकार्य घेतले जात आहे. अशा महत्त्वाच्या प्रकरणी अन्य देशांवर अवलंबून राहणे धोकादायक असते. त्यामुळे हा मार्ग अवलंबण्यात आल्याचे संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Wednesday 17 March, 2010

भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीत वसुंधरा, वरुण, हेमामालिनी

- रविशंकर प्रसाद, मुंडा नवे सरचिटणीस
- श्रीपाद नाईक, पर्रीकर कायम निमंत्रित
- महिला व युवा नेत्यांना प्राधान्य

नवी दिल्ली, दि.१६ : भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी पक्षाचे नवे पदाधिकारी व राष्ट्रीय कार्यकारिणी यांची घोषणा केली असून, सर्वश्री शांताकुमार, कलराज मिश्रा, विनय कटियार, भगतसिंग कोशारी, मुख्तार अब्बास नकवी, पुरुषोत्तम रूपाला, श्रीमती करुणा शुक्ला, डॉ. नजमा हेपतुल्ला, हेमा मालिनी, बिजोया चक्रवर्ती, किरण घई यांना पक्षाचे उपाध्यक्ष नियुक्त केले आहे.
सर्वश्री अनंतकुमार, थावरचंद गहलोत, वसुंधरा राजे, विजय गोयल, अर्जुन मुंडा, रविशंकर प्रसाद, धर्मेंद्र प्रधान, नरेंद्रसिंह तोमर, जगत प्रकाश नड्डा यांना सरचिटणीस नेमण्यात आले आहे. रामलाल संघटन महामंत्री, तर व्ही. सतीश व सौदानसिंह सहसंघटन महामंत्री राहतील.
गडकरी यांनी १५ सचिवांची नियुक्ती केली असून, यात संतोषकुमार गंगवार, स्मृती इराणी, सरोज पांडे, किरण माहेश्वरी, अशोक प्रधान, वरुण गांधी, किरीट सोमय्या, मुरलीधर राव, कॅ. अभिमन्यू, भूपेंद्र यादव, डॉ. लक्ष्मण यांचा समावेश आहे. पीयूष गोयल पक्षाचे कोषाध्यक्ष असतील.
पक्षाच्या संसदीय मंडळात सर्वश्री नितीन गडकरी अध्यक्ष, तर सर्वश्री अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, व्यंकय्या नायडू, राजनाथसिंग, सुषमा स्वराज, अरुण जेटली, बाळ आपटे, अनंतकुमार, थावरचंद गहलोत, रामलाल यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
कार्यकारिणी सदस्यांमध्ये सर्वश्री अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, बंगारू लक्ष्मण, व्यंकय्या नायडू, राजनाथसिंग, सुषमा स्वराज, बाळ आपटे, यशवंत सिन्हा, गोपीनाथ मुंडे, एस. एस. अहलुवालिया, अरुण शौरी, बलबीर पुंज, चंदन मित्रा, श्रीमती मृदुला सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, कप्तानसिंग सोळंकी, सुमित्रा महाजन, जयवंतीबेन मेहता, विनय सहस्रबुद्धे, शेषाद्री चारी, अनिता आर्य, डॉ. सी. पी. ठाकूर, दिलीपसिंग जुदेव, सुधा यादव, रामपाल चौधरी, मनेका गांधी, योगी आदित्यनाथ, लालजी टंडन, हुकूमदेव नारायण यादव, डॉ. जे. के. जैन, डॉ. अनिल जैन, अरुण सिंग, नलिन कोहली, जयप्रकाश अग्रवाल, श्रीमती पूनम आझाद, श्रीमती पिंकी आनंद, हरिबाबू, शांता रेड्डी, सुखदा पांडे, भुपेंद्रसिंह चुडासामा, बुलाभाई शुक्ला, ओमप्रकाश धनकड, विनोद खन्ना, श्रीमती किरण खेर, अर्जुन मेघवाल, सुभाष मेहरिया, श्रीमती सुमन श्रीरंगी, मनवेंद्रसिंग, ओंकारसिंह लखावत, एच. राजा, श्रीमती ललिता कुमार मंगलम्, एम. टी. रमेश, सी. एस. विजयशंकर, श्रीमती गौरी चौधरी, बिजोय महापात्रा, श्रीमती सुदामा पाढी, शोभाताई फडणवीस, महेश जेठमलानी, श्रीमती शायना एन. सी., श्रीमती मनीषा चौधरी, नाना शामकुळे, कांताताई नलावडे, श्रीमती लुईस मरांडी, सुनीलसिंग, फग्गनसिंग कुलस्ते, वीरेंद्र खाटिक, निर्मला भुरिया, सतपाल मलिक, डॉ. विजय सोनकर शास्त्री, मनोज सिन्हा, श्रीमती सरला सिंग, रामबक्ष वर्मा, हुकूमसिंग, सुधांशु त्रिवेदी, साध्वी निरंजन ज्योती, श्रीमती शांती मेहरा, श्रीमती रंजना साही.
कायम निमंत्रित
सर्वश्री नरेंद्र मोदी, शिवराजसिंह चौहान, डॉ. रमणसिंह, प्रेमकुमार धुमळ, बी. एस. येदियुरप्पा, रमेश पोखरियाल निशंक (भाजपाशासित राज्यांचे सर्व मुख्यमंत्री), उपमुख्यमंत्री सुशील मोदी, रघुवर दास, माजी राज्यपाल सर्वश्री केदारनाथ साहनी, कैलासपती मिश्र, व्ही. रामाराव, माजी मुख्यमंत्री- सुंदरलाल पटवा, केशुभाई पटेल, मदनलाल खुराणा, बी. सी. खंडुरी, नित्यानंद स्वामी, कैलाश जोशी, बाबुलाल गौर, मनोहर पर्रीकर
विधिमंडळ पक्षाचे नेते
श्री. गंगाप्रसाद, डॉ. व्ही. एस. आचार्य, विजयकुमार मल्होत्रा, एकनाथराव खडसे, भाऊसाहेब फुंडकर, घनश्याम तिवारी, नेपालसिंग, ओमप्रकाश सिंग, चमनलाल गुप्ता, मिशन रंजनदास, मनोरंजन कालिया, अनिल वीज, तामीगो तागा, के. व्ही. सिंगदेव.
संसदेतील मुख्य प्रतोद
श्री. रमेश जैन, श्रीमती माया सिंग
संसदीय पक्षाचे सचिव- संयुक्त सचिव
रामकृपाल सिंह, शनमुगन नाथन्
अन्य सदस्य
श्री. ओ. राजगोपाल, डॉ. सत्यनारायण जतिया, केशरीनाथ त्रिपाठी, देवदास उपाख्य बाळासाहेब आपटे, सदानंद गौडा, तनवीर हैदर उस्मानी, डॉ. हर्षवर्धन, विद्यासागर राव, बंदारू दत्तात्रया, विनोद पांडे, भारोतसिंग, राजन गोहिन, रमन डेका, निलमणी देव, विष्णुदेव साय, नरेश बन्सल, हरेंद्र प्रताप, रामबिलास शर्मा, महेश्वरसिंग, डॉ. निर्मलसिंग, राजेंद्र भंडारी, सत्यपाल जैन, गुलाबचंद कटारिया, रामदास अग्रवाल, एल. गणेशन्, सी. के. पद्मनाभन्, तथागत राय, श्रीपाद नाईक, रामप्यारे पांडे, अनंत नायक, विनोद तावडे, अमित ठाकर, सुरेश पुजारी, आर. रामकृष्णा, ओमप्रकाश कोहली, रमापती राम त्रिपाठी, अशोक खजुरिया, मांगेराम गर्ग, जगदीश मुखी.
विशेष निमंत्रित
अजय संचेती, उदयभास्कर नायर, पद्मनाभ आचार्य, सुकुमार नंबियार, बलदेवप्रकाश टंडन, विजय कपूर, अरुण साठे, नंदकिशोर गर्ग, डॉ. वामन आचार्य, जगदीश शेट्टीगार, आलोकुमार, अरुण अडसड, एस. सुरेशकुमार, गजेंद्र चौहान, श्रीमती आनंदीबेन पटेल, अमित शाह, किशनसिंह सांगवान, गोविंद करनाल, बनवारीलाल पुरोहित, हरिभाऊ बागडे, हृदयनारायण दीक्षित, तनवीर अहमद, राजेश शाह, राजेंद्र अग्रवाल, भूपेंद्र ठाकूर, हरजितसिंग ग्रेवाल, रविकांत गर्ग, कर्नल बैंसला, सुवर्ण सालेरिया, सिद्धार्थनाथसिंग, श्रीमती कविता खन्ना, अमिताभ सिन्हा, आशुतोष वर्षेनिया.
प्रवक्ते
सर्वश्री रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, राजीव प्रताप रुडी, शहनवाज हुसैन, रामनाथ कोविंद, तरुण विजय, श्रीमती निर्मला सीतारामन्.

खनिजवाहू ट्रकांच्या धडकेत तिघेजण ठार

पिंपळगाव वागुस पाळी येथे अपघात; दोघे गंभीर
पाळी, तिस्क उसगाव, दि.१६ (प्रतिनिधी): पिंपळगाळ वागुस पाळी येथे आज सायंकाळी दोन खनिज मालवाहू टिपर ट्रकांची समोरासमोर धडक बसून झालेल्या भीषण अपघातात तिघे जागीच ठार व दोघे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर वाहतुकीची जबरदस्त कोंडी झाली. दरम्यान, या दुर्घटनेमुळे बेदरकार खनिज वाहतुकीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे पुन्हा एकवार सिद्ध झाले आहे.
आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पिंपळगाळ वागुस पाळी येथे खनिज माल घेऊन वागुसच्या दिशेने जाणारा टिपर ट्रक क्र. जीए ०४ टी ८९६२ व वागुसहून उसगावच्या दिशेने येणारा रिकामा टिपर ट्रक क्र. जीए ०४ टी १४६० यांची समोरासमोर जोरदार धडक एकमेकावर बसली. या अपघातात टिपर ट्रक क्र. जीए ०४ टी १४६० मधील रवी देसाई (वय २१ वर्षे, रा. भामई पाळी), गिरीश मांद्रेकर (वय २५ वर्षे, रा. भामई पाळी) व टिपर ट्रक क्र.जीए ०४ टी ८९६२ मधील प्रवासी महमद सफीक इस्माईल (वय ३८, रा. झारखंड) जागीच ठार झाले. टिपर ट्रक क्र. ८९६२ मधील चालक गंभीर जखमी अवस्थेत ट्रकच्या केबिनमध्ये अडकून पडला होता. त्याची फोंडा अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली.
याच ट्रकमधील आणखी एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.
दोन गंभीर जखमींना रुग्णवाहिका १०८ वाहनातून बांबोळी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. महंमद इसाक अन्सारी (२२) व महंमद अब्बास अली (३५) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांवर त्यापूर्वी साखळी आरोग्य केंद्रात डॉ. रुपचंद गावडे व अन्य कर्मचाऱ्यांनी उपचार केले. मात्र त्यांची अवस्था गंभीर असल्याने त्यांना गोमेकॉत पाठवून देण्यात आले. या अपघातात दोन्ही ट्रकांची पूर्णपणे मोडतोड झाली आहे.अतिवेगाने वाहने हाकल्याने हा अपघात झाल्याची माहिती देण्यात आली.
या अपघाताचे वृत्त समजताच पाळी, वेळगे, उसगाव व आजूबाजूच्या ग्रामस्थांनी अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अपघाताचे वृत्त समजताच डिचोली पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक श्री. वाझ यांनी घटनास्थळी येऊन अपघाताचा पंचनामा केला. तिन्ही मृतदेह बांबोळी इस्पितळात पाठवण्यात आले आहेत.
---------------------------------------------------------------
जादा फेऱ्या मारण्याची हाव
ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी सांगितले की, जास्त फेऱ्या मारून अधिकाधिक पैसा कमावण्याची हाव हे अशा दुर्घटनांचे मुख्य कारण आहे. खनिज मालाच्या या बेफाम वाहतुकीमुळे सामान्य माणसाला तर रस्त्यावरून चालणेही कठीण बनले आहे. केव्हा कोणाला या ट्रकांकडून दगाफटका होईल हेही सांगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी या अनिर्बंध खनिज वाहतुकीला लगाम घालणे कधी नव्हे एवढे गरजेचे बनले आहे.

आशिषला मोकळा सोडलेल्या तपास अधिकाऱ्याला अटक करा

विरोधी पक्षनेते पर्रीकर यांची मागणी
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): ड्रग व्यवसायात गुंतलेला निलंबित पोलिस निरीक्षक आशिष शिरोडकर याला अटक न करणाऱ्या तपास अधिकाऱ्याचेही या प्रकरणात साटेलोटे असल्याने त्याला अटक केली जात नसल्याचा आरोप करून "त्या' तपास अधिकाऱ्याला त्वरित अटक केली जावी, अशी मागणी आज विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केली. ड्रग व्यवसायात गुंतलेल्या या अधिकाऱ्याला कशी अटक होत नाही याचे कारण शोधणे गरजेचे आहे, असेही श्री. पर्रीकर यावेळी म्हणाले.
दरम्यान, आशिष शिरोडकर यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी केलेल्या अर्जावर उद्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. ड्रग व्यवसायात गुंतल्याचे आरोप झाले असले तरी, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी स्वरूपाचे कटकारस्थान केल्याचा गुन्हा नोंद झालेल्या आशिष शिरोडकर याला अटक केली जात नसल्याने श्री. पर्रीकर यांनी आज आश्चर्य व्यक्त केले.
सामान्य नागरिकाला मिळेल ती कलमे लावून अटक करण्यासाठी टपलेले हे पोलिस आपल्या अधिकारी सहकाऱ्याला मात्र पाठीशी घालीत आहेत. याच्या जागी कोणी सामान्य व्यक्ती असला असता तर त्याला त्वरित अटक केली असती. जामीन अर्ज न्यायालयात मिळवण्यासाठी वेळ मिळू नये यासाठी हे पोलिस सामान्य व्यक्तीला ठरवून शनिवारीच अटक करतात, अशीही टीका त्यांनी यावेळी बोलताना केली. संशयित आशिष शिरोडकर याला सध्या गुन्हा अन्वेषण विभागातर्फे "रॉयल ट्रिटमेंट' दिली जात आहे. उद्या सकाळी पोलिसांनी त्याला एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन त्याची चौकशी केली म्हणून कोणी नवल वाटून घेऊ नये, असे ते पुढे बोलताना म्हणाले. आशिष याला आपल्या विरोधातील पुरावे मिटवण्यासाठी योग्य वेळ दिली जात आहे.
ड्रग माफियांशी साटेलोटे ठेवणारे हे केवळ पाचच पोलिस नसून यात सुमारे २५ पोलिस गुंतलेले असण्याची शक्यता आहे. तपास अधिकाऱ्याचेच संबंध त्यांच्याशी चांगले असल्याने त्याला अटक केली जात नाही. मुळात पोलिस अधिकारीच ड्रग व्यवसायात गुंतलेल्या प्रकरणाची चौकशी त्यांचेच सहकारी करीत असल्याने त्यातून काय बाहेर निघेल हे जनतेला पुरेपूर माहिती आहे. या प्रकरणाची केंद्रीय तपास संस्थेमार्फत चौकशी केली जावी, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

'इस्रो'च्या सुरक्षा रक्षकांवर गोळीबार दोन हल्लेखोर फरार

बंगलोर, दि. १६ : बंगलोर शहराबाहेर असलेल्या इस्रोच्या प्रमुख केंद्राच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांवर संशयित स्थितीत वावरणाऱ्या दोघांनी आज पहाटे गोळीबार केला. या गोळीबाराला सुरक्षा रक्षकांनीही प्रत्युत्तर देताच हल्लेखोर पळून गेले.
यासंदर्भात इस्रो सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इस्रोच्या केंद्राभोवती संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या या दोघांना इस्रोच्या सुरक्षारक्षकांनी हटकले. त्यावर या दोघांनी सुरक्षारक्षकांवर लहानशा पिस्तुलातून गोळीबार केला. त्याला सुरक्षारक्षकांनीही लगेचच प्रत्युत्तर दिले. ही घटना पहाटे ३.३० ते ४ च्या दरम्यान घडली.
इस्रोच्या या केंद्रात अवकाश कार्यक्रम व इस्रोने अवकाशात सोडलेल्या उपग्रहांचा मागोवा घेण्याचे काम केले जाते. इस्रोच्या प्रवक्त्याने पीटीआयला सांगितले की, इस्रोच्या सुरक्षा रक्षकांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला, परंतु तो हाणून पाडण्यात आला. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून चौकशी सुरू झाली आहे.
केंेद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानेही या घटनेला दुजोरा दिला असून आमच्या जवानांनी या दोन संशयितांना ललकारले असता या दोघांनी गोळीबार केला. आमच्या जवानांनीही दोन राऊंड गोळीबार करून प्रत्युत्तर दिले असता हे दोघे हल्लेखोर पळून गेले. या नंतर आमच्या जवानांनी या पळून जाणाऱ्या दोघांवर आणखी काही राऊंड गोळीबार केला. आणखी काही जवान मदतीला येण्यापूर्वीच हे दोघे हल्लेखोर पसार झाले, असे या अधिकाऱ्याने सांगितले. घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली.
इस्रोच्या स्थानांवर दहशतवादी हल्ले होऊ शकतात, असा गुप्तचर अहवाल असल्याच्या पार्श्वभूमीवर आज ही घटना घडली, हे विशेष. हल्ला करणाऱ्या दोघांचे दहशतवादी संघटनांशी संबंध असू शकतात. या दोघांनी हल्ल्यापूर्वी प्रारंभिक चाचणी केली असावी. अन्यथा एवढ्या पहाटे तेही इस्रोच्या स्थानाभोवती रमतगमत फेरफटका मारण्याचे कारणच काय, असा सवाल इस्रोच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या घटनेची चौकशी करण्याचे काम आता पोलिस व गृहमंत्रालयाचे आहे.
सुरक्षेचा फेरआढावा घेणार
बंगलोर शहराबाहेरील इस्रोच्या केंद्रावर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांवर आज पहाटे दोन जणांनी गोळीबाराचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यामुळे अशा अतिशय संवेदनशील स्थानांना देण्यात आलेल्या सुरक्षेचा फेरआढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे असे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी सांगितले.
आज येथे पत्रकारांशी बोलताना केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, देशी पिस्तुलातून दोन जणांनी गोळीबाराचा प्रयत्न केला आहे, हे सिध्द होत आहे. इस्रोच्या स्थानांची सुरक्षा पाहणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या प्रमुखांना यासंदर्भात सुरक्षेचा नव्याने आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे. आज पहाटे घडलेल्या या घटनेची एक पथक चौकशी करीत आहे.
केंद्राने अहवाल मागविला
इस्रोच्या सुरक्षेसाठी तैनात सुरक्षारक्षकांवर आज पहाटे गोळीबार करण्याचा जो प्रयत्न झाला, त्यासंदर्भात केंद्र सरकारने कर्नाटक सरकारकडून अहवाल मागितला आहे. या घटनेची सविस्तर माहिती कर्नाटक सरकारने द्यावी. इस्रोची सुरक्षा व्यवस्था तशी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सांभाळीत आहे. या घटनेची पोलिसात तक्रार करण्यात आली असून पोलिस चौकशी प्रारंभ झाली आहे.
मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
इस्रोच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांवर गोळीबार करण्याच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदुयुरप्पा यांनी दिले आहेत. इस्रोच्या या शाखेत चांद्रयान-१ मोहिमेवर लक्ष ठेवण्यात येत असते, हे येथे उल्लेखनीय.
यासंदर्भात आपण वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात असून सर्व काही चौकशीनंतरच कळेल. आज पहाटे घडलेल्या घटनेसंदर्भात आताच काही निष्कर्ष काढणे बरोबर नाही. आमच्या अधिकाऱ्यांना याची चौकशी करू द्या, असे मुख्यमंत्री म्हणाले. पोलिसांकडून मिळणारा अहवाल मग आम्ही केंद्र सरकारला पाठवून देऊ. केंद्राने यासंदर्भात अहवाल मागितला आहे. या मुद्यावर चर्चा करण्यासाठी उद्या आपण वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली आहे, असे मुख्यमंत्री येदीयुरप्पा यांनी म्हटले.

पेडण्याचे प्रसिद्ध युवा गायक फ्रान्सिस रॉड्रिगीस यांचे निधन

पेडणे, दि. १६ (प्रतिनिधी): पेडणे येथील प्रसिद्ध युवा शास्त्रीय गायक फ्रान्सिस रॉड्रिगीस यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने आज दि. १६ रोजी बांबोळी इस्पितळात निधन झाले. ते ३५ वर्षांचे होते.
उगवे - पेडणे येथील गुणी गायक फ्रान्सिस रॉड्रिगीस यांनी भारतीय शास्त्रीय गायन व नाट्यगीत गायन क्षेत्रात अल्पावधीतच अमाप लोकप्रियता संपादित केली होती. केवळ पेडणे तालुक्यातच नव्हे तर सबंध गोव्यात व राष्ट्रीय पातळीवरही त्यांनी आपली कला सादर केली होती. गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, विविध ठिकाणचे सार्वजनिक गणेशोत्सव व विविध संगीत संमेलनात त्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. मराठी नाट्यगीत, भक्तिगीत, भावगीत व कोकणी गीते आपल्या सुरेल आवाजात सादर करून त्यांनी आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केला होता. श्री. रॉड्रिगीस यांनी नाट्यगीत गायनावर विशेष भर दिला होता. त्यासाठी त्यांनी पं. प्रभाकर कारेकर, पं. अजित कडकडे व संगीततज्ज्ञ भाई शेवडे यांच्याकडून तालीम घेतली होती.
गेले चार दिवस फ्रान्सिस रॉड्रिगीस आपल्या तुये येथे राहत असलेल्या विवाहित बहिणीकडे आले होते. काल दि. १५ रोजी रात्री उशिरा पोटात तीव्र कळा आल्याने ते बाथरूममध्ये चक्कर येऊन पडले. त्यावेळी त्यांना प्रथम तुये येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने नंतर त्यांना बांबोळीला हालवण्यात आले. तिथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे आज पहाटे निधन झाले. आज संध्याकाळी त्यांचा मृतदेह उगवे येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आला असून उद्या दि. १७ रोजी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येतील. फ्रान्सिस रॉड्रिगीस यांच्या पश्चात मोठा विवाहित भाऊ, तीन विवाहित बहिणी, "माय' व भावजय असा परिवार आहे
दरम्यान, फ्रान्सिस रॉड्रिगीस यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून गोमंतकीय गायक व सध्या मुंबई येथे वास्तव्य असलेले पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य महादेव पेडणेकर तसेच भाई शेवडे, विनोद पालयेकर यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. फ्रान्सिस रॉड्रिगीस यांच्या निधनाने गोव्यातील एक गुणी कलाकार हरपला असल्याची प्रतिक्रिया पंचायतमंत्री बाबू आजगावकर यांनी व्यक्त केली आहे.

लाच घेतल्याप्रकरणी वाहतूक पोलिस निलंबित

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी) : पणजी वाहतूक पोलिस स्थानकात असलेल्या वाहतूक हवालदाराला लाच घेत असताना चित्रीकरण करून उघड पाडल्याने आज त्याला निलंबित करण्याचे आदेश वाहतूक खात्याचे अधीक्षक अरविंद गावस यांनी दिले. पोलिस हवालदार सागर साळगावकर याचे काल सकाळी पणजी शहरात एका वाहनधारकाकडून लाच घेत असताना एका वृत्त वाहिनीच्या प्रतिनिधीने चित्रीकरण केले होते. तसेच ही बाब खात्याचे अधीक्षक अरविंद गावस यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्या चित्रीकरणाची सत्यता पडताळून पाहिल्यानंतर आज सदर हवालदाराला निलंबित केल्याचा आदेश जारी करण्यात आला. गेल्या वर्षी वेर्णा येथे वाहतूकदारांकडून लाच घेत असताना पाच पोलिसांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर तब्बल सहा महिन्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते.
दरम्यान, पणजी शहरात वाहतूक पोलिस वाहतूक सुरळीत करण्यासाठी कमी व लाच घेत असतानाच अधिक प्रमाणात दिसून येतात, अशा प्रतिक्रिया सर्रास व्यक्त केल्या जात आहेत. शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीमुळे कोंडी होत असते. परंतु, त्याठिकाणी केवळ एक होमगार्ड उभा केला जातो. तर, "तालांव' देण्यासाठी एकाच ठिकाणी दोन साहाय्यक उपनिरीक्षक आणि अन्य वाहतूक पोलिस उभे राहतात, असे अनेकांनी सांगितले आहे.

५ कोटींच्या हाराची चौकशीची मागणी

लोकसभेत तीव्र पडसाद
नवी दिल्ली, दि. १६ : उत्तरप्रदेशची राजधानी लखनौमध्ये बहुजन समाज पार्टीने सोमवारी आयोजित केलेल्या महारॅलीत पक्षाच्या सर्वेसर्वा व राज्याच्या मुख्यमंत्री मायावती यांना स्वागतापोटी १ हजार रुपयांच्या नोटांनी तयार केलेला ५ कोटी रुपये किमतीचा महाकाय हार घालण्यात आला. नोटांच्या हाराचे मायावतींनी घडविलेल्या या दर्शनाचे आज संसदेत तीव्र पडसाद उमटलेत. भाजपा, कॉंग्रेस आणि समाजवादी पार्टीने मायावतींवर या प्रकाराबद्दल सडकून टीका करताना या उधळपट्टीची चौकशी करण्याची मागणी केली.
"मायावती नही दौलत की बेटी' अशा शब्दात कॉंग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी लोकसभेत टीका केली. "बसपाच्या महारॅलीत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या उधळपट्टीचे स्पष्टीकरण द्यावे,'अशी मागणी भाजपाने केली, तर "या बसपाच्या या उधळपट्टीची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी,' अशी मागणी समाजवादी पार्टीने केली. शून्य प्रहरात यावरून गदारोळ झाल्याने लोकसभा अध्यक्ष मीराकुमार यांनी सभागृहाचे कामकाज ४५ मिनिटांसाठी तहकूब केले.
""मायावती सरकारने बरेलीमध्ये पीडितांसोबत अन्याय केला व आपल्या महारॅलीवर मात्र कोट्यवधींचा चुराडा केला. आयकर विभागानेही या खर्चाची चौकशी करायला पाहिजे,''अशी मागणी कॉंग्रेस सदस्यांनी केली.
बसपाचे संस्थापक कांशीराम यांचा जन्मदिवस आणि पक्षाचा २५ वा स्थापनादिवस असा संगम साधून बसपाने १५ मार्चला महारॅलीचे आयोजन केले होते.

Monday 15 March, 2010

नास्नोडा येथे बिबट्याचा हल्ला; एकजण जखमी

केबलच्या फासांत अडकून बिबटा ठार
डिचोली, दि. १४ (प्रतिनिधी)- डिचोली तालुक्यातील नास्नोडा येथे आज (दि.१४) बिबट्याने हल्ला केल्याने पांडुरंग तुळसकर (५०) हे जखमी झाले तर रानटी जनावरांना लावलेल्या केबलच्या फासांत अडकल्याने सुमारे साडेचार वर्षाच्या बिबट्या मादीचा मृत्यू झाला. सदर दोन्ही घटना एकाच जागी पिस्तवाडा नास्नोडा येथे घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
आज सकाळी नास्नोडा येथील पांडुरंग हे आपल्या घरामागे अवघ्या १५ ते २० मीटर अंतरावर असलेल्या जंगली परिसरात नैसर्गिक विधीसाठी गेले असता तेथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. बिबट्याने त्यांच्या उजव्या हाताचा चावा घेतला तसेच हाताला खोलवर दात खुपसले. तसेच डाव्या हातालाही नखांनी ओरबडून जखमा केल्या. यावेळी त्यांची वाघाबरोबर बरीच झटापटही झाली. तुळसकर यांनी बिबट्याला आवरण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी झालेल्या गडबडीमुळे घरांतील लोक व कुत्रे धावून आले. त्यामुळे बिबट्याने जंगलात पळ काढला. जखमी अवस्थेतील तुळसकर यांना डिचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, नंतर त्यांना म्हापसा येथील आझिलो इस्पितळात हलविण्यात आले.
दरम्यान या हल्ल्याची माहिती मिळताच नास्नोडा येथे वनखात्याचे साहाय्यक वनपाल सुभाष हेन्रीक, विभागीय वन अधिकारी एस. आर. प्रभू, अनिल शेटगावकर व इतर कर्मचारी दाखल झाले. बिबट्याने हल्ला केलेल्या ठिकाणी पोहोचले असता केबलच्या फासात मृत बिबटा मादी आढळली. त्याची तपासणी डॉ. राजेश केणी यांनी केली असता सदर बिबटा १२ तासांपूर्वी उपासमारीने मरण पावल्याचे समजले. बिबटा फासांत अडकल्यानंतर त्याने सुटकेसाठी केलेल्या धडपडीत तो अधिक जखमी होऊन त्याला मृत्यू आला असावा,असा अंदाज आहे. सध्या या बिबट्याला वन खात्याने ताब्यात घेतले असून चौकशी चालू असल्याचे श्री. प्रभू यांनी सांगितले.

"ज्ञानपीठ' पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर निवर्तले

विंदास
माझ्या मराठीस। तुमचे चैतन्य।
निघून गेले दैन्य। शब्दांचे।। १।।
शब्दांची भावना। रंग शब्दांचे।
शब्द मराठीचे। गिरविले।।२।।
काव्याची सोबत। सोबत विरुपिका।
शब्दात तुका। डोकावितसे।।३।।
होती सखे सोबती। बालगोपाळ छोटे।
प्रतिभेला फुटे। नवांकुर।।४।।
माय मराठीस। शतकी परंपरा।
आपुला आसरा। वृद्धीसाठी।।५।।
मराठीचा मान। कविता ही वीज।
अमृताशी पैज। नाही कुणाची।।६।।
ज्ञानपीठाचे रूप। झाले विस्तीर्ण।
विंदा तुमचे चरण। थोर थोर।।७।।
असाच घडावा। प्रतिभेचा हुंकार।
शब्द होती थोर। तुमच्या हस्ते।।८।।
माझ्या मराठीस तुम्ही। केले पुन्हा जिंदा।
त्रैलोक्यात विंदा। नव गर्जेल।।९।।
अंतःकरणात आमुच्या। ठेवो तुम्हा देव।
मराठीची ठेव। विंदा तुम्ही।।१०।।

संदीप मणेरीकर
९४२३८१२४३२


मुंबई, दि. १४ - कविता, बालसाहित्य, समीक्षण, अनुवादित साहित्य अशा नानाविध साहित्य प्रांतात मुशाफिरी करणारे आणि मराठी साहित्य विश्वाला तिसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर यांचे आज सकाळी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. मुंबई येथील भाभा हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. विंदा करंदीकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी उद्या (सोमवारी) सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत साहित्य सहवासमधील त्यांच्या घरी ठेवण्यात येणार असून त्यांच्या इच्छेनुसार देहदान करण्यात येणार आहे.
गेल्या महिनाभरापासून त्यांना भाभा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. विंदांच्या निधनामुळे साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाबद्दल अनेक मान्यवर साहित्यिकांनी शोक व्यक्त केला आहे. गोविंद विनायक करंदीकर ऊर्फ विंदा यांनी मराठी साहित्य विश्व समृद्ध केले. त्यांच्या "अष्टदर्शने' या साहित्यकृतीसाठी त्यांना साहित्य क्षेत्रात सर्वोच्च समजला जाणारा ३९ वा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन २००६ साली गौरवण्यात आले होते. वि. स. खांडेकर आणि कुसुमाग्रज यांच्यानंतर ज्ञानपीठ मिळवणारे ते तिसरे साहित्यिक ठरले. त्याशिवाय कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार, कोणार्क सन्मान, केशवसूत पुरस्कार तसेच विद्यापीठांच्या डी.लिटस् अशा पदव्यांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
जीवनप्रवास
विंदांचा जन्म २३ ऑगस्ट १९१८ रोजी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला. विंदाचे वडील विनायक करंदीकर कोकणात पोंभुर्ला येथे असत. विंदांनी त्यांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते संवेदनशील होते. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्वीकारले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय, मुंबई, एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. इ.स. १९७६ मध्ये व्यावसायिक आणि इ.स. १९८१ सालामध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती पूर्ण लेखनासाठी घेतली. विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले आहे. त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्वीकारले नाही. काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली आहे. विंदा करंदीकर यांच्या पत्नी सुमा करंदीकर आणि मुलगी सौ.जयश्री विश्वास काळे हे सुद्धा सामाजिक कार्यात सक्रिय असतात. तसेच त्यांना नंदू आणि उदय असे दोन मुलगे आहेत.

पणजी महापालिकेतील घोटाळ्यांची मालिका

सरकारला खडसावून जाब विचारणार
पर्रीकर यांची पत्रपरिषदेत घोषणा


पणजी, दि. १४ (प्रतिनिधी) - "घोटाळेबाज' पणजी महापालिकेतील आर्थिक भानगडींवर कोणती कारवाई करण्यात आली याचा जाब सरकारला येत्या विधानसभा अधिवेशनात खडसावून विचारला जाईल, असे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज येथे पत्रपरिषदेत स्पष्ट केले. गेल्या विधानसभा अधिवेशनात नगरविकास मंत्र्यांनी या घोटाळ्यांची सहा महिन्यांत दक्षता खात्यामार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या संदर्भात अद्याप कोणतीही कारवाई केली झालेली नसल्याचेही पर्रीकर यांनी निदर्शनास आणून दिले. विरोधी गटाचे प्रमुख नगरसेवक मिनीन डिक्रूज याप्रसंगी उपस्थित होते.
पणजी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी फक्त घोटाळे करून विकासकामांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
संबंधितांनी "कमिशन' घेऊन स्वतःचे खिसे भरले आहेत. महापालिकेची गेल्या चार वर्षे कारर्कीद ही अनेक प्रकाराच्या घोटाळ्यांनीच भरलेली आहे, असा आरोप विरोधी गटाचे प्रमुख नगरसेवक मिनीन डिक्रूज यांनी केला. या घोटाळ्यांची माहिती येत्या एप्रिल महिन्यात लोकांना दारोदारी जाऊन दिली जाणार आहे, असे डिक्रूजयांनी सांगितले. यावेळी नगरसेविका वैदेही नाईक, ज्योती मसुरकर, हर्षा हळर्णकर, दीक्षा माईणकर, भाऊ चोपडेकर व रुपेश हर्ळणकर उपस्थित होते.
गेली चार वर्षे महापालिकेने पणजी शहरात नाव घेण्यासारखे एकही विकासाचा प्रकल्प राबवलेला नाही. मात्र विरोधी गटाने लोकांना सांगण्यासारखी अनेक कामे केली असल्याचा दावा श्री. डिक्रुज यांनी केला. पे पाकिर्ंग घोटाळा, बाजार संकुलात गाळे वाटप, कचरा विल्हेवाट प्रकल्प, सुरक्षा रक्षक, कॅसिनो परवानगी, पालिका उद्यान, अशा अनेक प्रकरणातील घोटाळे या सत्ताधारी गटाच्या नावावर आहेत. त्याची चौकशी करण्याचे आश्वासन देऊनही काहीच केले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
नागेश करीशेट्टी या नगरसेवकाने बनावट तिकिटे छापून "पे पार्किंग' घोटाळा केल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याची रीतसर पणजी पोलिस स्थानकात तक्रार करण्यात आली. त्याची चौकशी अजूनही सुरू करण्यात आलेली नसून हे प्रकरण मिटवण्याचे प्रयत्न सुरू झाले असल्याचा आरोप श्री. डिक्रूज यांनी केला. नव्या बाजार संकुलात एका नगरसेवकाने तिसऱ्या मजल्यावर बेकायदा दुकान सुरू केले असून त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. अनेकांनी आपल्या मर्जीनुसार गाळे वाटप केले आहे. शहरातील गाळेधारकांना हटवल्यानंतर तेथे ग्राहक फिरकत नाहीत. त्यामुळे व्यवसाय करणेही त्यांच्यासाठी कठीण होऊन बसल्याचे ते म्हणाले.
पालिका उद्यानाचा प्रकल्प तर लंगड्या घोड्याप्रमाणेच झाला आहे. कारोलिना पो यांनी महापौर म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून महापालिका उद्यान बांधले जाणार असल्याची बतावणी त्या करत आहेत. मात्र अजूनही तो प्रकल्प पूर्ण करण्यात त्यांना यश आलेले नाही, असेही डिक्रूज यांनी सांगितले.
या वर्षी होणारी महापौरपदाची निवडणुकीत तुम्ही उतरणार का, असा प्रश्न केला असून गुप्त मतदान झाल्यास विरोधी गट नक्कीच या निवडणुकीत उतरणार असल्याचे श्री. डिक्रूज यांनी सांगितले. गेल्यावेळीही अनेक सत्ताधारी गटातीलही नगरसेवक आमच्याबरोबर होते. मात्र खुलेआम मतदान असल्याने ते मागे हटले. यावेळी गुप्त मतदान घेण्यासाठी पालिका आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवला असल्याचेही त्यांनी सांगितले.
कॅसिनोंना विरोध होत असतानाही महापौरांनी आधीची तारीख टाकून या कॅसिनोंना पालिकेने परवानगी दिला असल्याचा आरोप डिक्रूज यांनी केला. तसेच ओला कचरा आणि टॅंकर घोटाळा येत्या काही दिवसात उघड केली जाणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

त्या महिलेने अनुभवला साक्षात मृत्यू

- मांडवी पुलावरून उसळून थेट नदीत
- बोटीवरील कर्मचाऱ्यांनी दिले जीवदान


पणजी, दि. १४ (प्रतिनिधी) - "काळ आला होता, पण वेळ आली नव्हती,'
या म्हणीचा जीवघेणा प्रत्यय आज बेलिझा सांगेकर या (२८) वर्षीय महिलेने प्रत्यक्ष अनुभवला. जीवावर आलेले महासंकट एका पायावर निभावले आणि तिच्या नवऱ्याने सुटकेचा सुस्कारा सोडला. आपल्या नवऱ्याबरोबर दुचाकीवरून जाणारी ही महिला एका अपघातात सापडली आणि दुचाकीवरून उसळून मांडवी नदीत फेकली गेली. यात तिचा पाय फ्रॅक्चर झाला असून सध्या ती "गोमेकॉ'त उपचार घेत आहे. तिचा नवरा प्रवीण आणि तीन वर्षांचा मुलगा किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावरही गोमेकॉत उपचार सुरू आहेत.
झाले असे की, आज सकाळी प्रवीण सांगेकर हा आपला तीन वर्षीय मुलगा व पत्नीसह सांगोल्डा येथे मोटरसायकलवरून निघाला होता. तो मांडवी पुलावर पोहोचला असता समोरुन ओव्हरटेककरून येणाऱ्या झेन क्रमांक जीए ०१ सी ६२९८ ने त्यांना जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील मुलगा रस्त्यावर कोसळला तर, दुचाकीच्या मागे बसलेली बेलिझा पुलावरून उसळून थेट मांडवी नदीत कोसळली. त्याठिकाणी नदीत असलेल्या पॅराडाईझ क्रुज व सांतामोनिका बोटीवरील कर्मचाऱ्यांनी वेळ न दवडता पाण्यात उडी टाकून तिला वर काढले. त्यानंतर ताबडतोब उपचारासाठी "गोमेकॉ'त दाखल करण्यात आले. एखाद्या चित्रपटात शोभावा, अशा या प्रसंगामुळे पुलावर तेव्हा उपस्थित असलेले लोकही हादरले. सुदैवानेच प्रवीण व त्याचा मुलगा यांचे किरकोळ जखमांवर निभावले.
पोलिसांनी, हलगर्जीपणाने वाहन हाकणारा झेन गाडीचा चालक शिवानंद रतनलाल याला ताब्यात घेऊन जामिनावर मुक्त केले.